अटलसेतू, जुवारी पूल, मोपा लिंक रोड यानंतर आता पर्वरी फ्लायओवरचे उद्घाटन होत आहे. या फ्लायओवरमुळे वाहतुकीची कोंडी कमी होण्याबरोबरच पणजी - म्हापसा मार्गावरील प्रवास आणखी जलद होणार आहे. 'डबल इंजिन' सरकारच्या कार्यकाळात राज्याची झपाट्याने प्रगती होत आहे. रस्ते, पूल, फ्लायओवर, बसस्थानके तसेच इतर प्रकल्पांमुळे विविध सुविधा निर्माण होत आहेत.
आजच्या इंटरनेटच्या युगात कोणाकडेच वेळ नाही. प्रत्येकाला कामाच्या इच्छित स्थळी लवकर पोहोचायचे असते. बसची वाट बघण्यात वेळ वाया जात असल्याने प्रत्येक जण आता स्वत:च्या वाहनाने प्रवास करत आहे. यामुळे दुचाकी तसेच चारचाकी गाड्यांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढत आहे. गोवा हे छोटेसे राज्य असले तरी आकाराच्या मानाने दुचाकींची संख्या जास्त आहे. प्रत्येकाच्या घरात दोन-तीन वाहने असल्याने माणसांपेक्षा वाहनांची संख्या अधिक झालेली आहे. वाहनांच्या संख्येच्या प्रमाणात रस्त्यांचा विस्तार झाला नसल्याने ठिकठिकाणी वाहतुकीची कोंडी होत आहे. अपघातांचे प्रमाणही वाढत आहे. अपघात व अपघाती मृत्यूंचे प्रमाण चिंताजनक आहे. रस्ते रुंद केले, वाहतुकीचे नियम कडक केले तरी अपघातांचे प्रमाण काही कमी होत नाही. रस्त्यांच्या विस्तारासोबतच नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी केली नाही, तर अपघातांचे प्रमाण बेसुमार वाढेल. यामुळे अपघातांवर नियंत्रण ठेवण्यासाठी वाहतूक नियमांची काटेकोरपणे कार्यवाही व्हायला हवी.
वाहतुकीचे वाढते प्रमाण विचारात घेता नवीन रस्त्यांबरोबर महामार्गाचे रुंदीकरण होत आहे. बायपास रस्त्यांची उभारणी होत आहे. अटलसेतूमुळे पणजीतील वाहतूक कोंडी कमी होण्यास बरीच मदत झाली. नवीन जुवारी पुलामुळे पणजी - वास्को व पणजी - मडगाव मार्गावरील वाहतुकीचा वेग वाढला. आता बोरी येथे नवीन पूल उभारण्याचा प्रस्ताव आहे. हा पूल पूर्ण झाल्यानंतर फोंडा - मडगाव मार्गावरील वाहतुकीचा वेग वाढणार आहे. चोडण पुलासह इतर अनेक पूल तसेच रस्त्यांचे प्रस्ताव आहेत. यामुळे कनेक्टिविटी वाढण्यास मदत होण्याबरोबर पर्यटनालाही लाभ होणार आहे.
वाहतूक कोंडीमुळे म्हापसा - पणजी मार्गावरील वाहतुकीला बराच वेळ लागायचा. १२ किमीचे अंतर पार करण्यासाठी पाऊण तास लागायचा. पर्वरीत तर ठिकठिकाणी वाहतुकीची कोंडी व्हायची. या फ्लायओवरमुळे या दुष्टचक्रातून सुटका होण्यास मदत होणार आहे.
पायाभूत सुविधांच्या निर्मितीबरोबर वाहतूक सुरळीत होण्यासाठी वाहतूक नियमांचे पालन होण्याची गरज आहे. शिस्त नसली तर वाहतूक कोंडीचे प्रमाण वाढण्याचीच शक्यता आहे.
रस्ते, पूल उभारण्याबरोबर बसस्थानकांचाही विस्तार व्हायला हवा. डिचोली बसस्थानकाचे काम रखडत रखडत सुरू आहे. पणजी, मडगाव बसस्थानके अद्ययावत होण्याची गरज आहे.
- गणेश जावडेकर


