काँग्रेसने गोव्यातील यावेळची विधानसभा निवडणूक फार गांभीर्याने घेतली आहे असे म्हणायला दोन कारणे आहेत. पहिले म्हणजे प्रभारी आणि सहप्रभारी म्हणून दोन नेत्यांना गोव्यातील कामासाठी जुंपणे आणि दुसरे म्हणजे वेणुगोपाल यांच्यानंतर खुद्द काँग्रेस अध्यक्षांनी गोवा दौरा करून पक्षाच्या कामाचा आढावा घेणे. या दोन गोष्टी वगळल्या, तर काँग्रेस गंभीर आहे असे म्हणायला वाव नाही. पण यापैकी कोणीच गोवा काँग्रेसमधील धुसफूस किंवा असंतोष रोखू शकला नाही, हेही तेवढेच खरे आहे. त्यामुळे काँग्रेस जरी निवडणुकांसाठी गंभीर दिसत असली तरी गोव्यातील काँग्रेसजनांमध्ये एकजूट निर्माण होईल असे दिसत नाही. अमित पाटकर यांना अचानक हटवल्यानंतर गिरीश चोडणकर यांच्याकडे पक्षाची सूत्रे दिल्यामुळे पक्षातील असंतोष आणखी वाढला. पाटकर यांनी सर्वांना कसेबसे थोपवून धरले होते, त्यामुळे त्यावेळी एवढा असंतोष दिसत नव्हता. किंबहुना काहींमध्ये नाराजी होती, पण खदखद नव्हती. पाटकर यांनी आपल्या मर्जीतील अनेकांना पक्षाच्या कामाशी जोडले आणि निवडणुकीला काही महिने आहेत असे दिसत असतानाच काँग्रेसने पाटकर यांना हटवून चोडणकर यांची पुन्हा अध्यक्षपदी निवड केली. चोडणकर यांची प्रदेशाध्यक्षपदी वर्णी म्हणजे खुद्द राहुल गांधी यांचाच आदेश आहे, हे सर्वांनाच माहीत असल्यामुळे काहींनी चोडणकर यांना स्वीकारले. काहींनी म्हणण्यापेक्षा चोडणकर यांच्या पूर्वीच्या कारकिर्दीत जे लोक काँग्रेसला घट्ट धरून होते, ते पुन्हा आनंदी झाले. पण अनेकांना या निर्णयामुळे धक्का बसला. त्यातून काँग्रेसला हादरे बसू लागले. काहीजण बंडखोरी केल्यासारखे उघडपणे काँग्रेसच्या नेतृत्वाविषयी बोलू लागले. काहीजण समांतर पक्षाच्या नावाखाली कारवाया करू लागले. पक्षाच्या नावाने मोर्चा काढू लागले. हे पटत नसल्यामुळे चोडणकर यांनी काहींची हकालपट्टीही केली. त्यामुळे काँग्रेसमधील अंतर्गत वाद उघड होऊ लागला. त्यानंतर के. सी. वेणुगोपाल यांनी पक्षातील असंतुष्टांची समजूत काढण्यासाठी गोव्यात दौरा केला. एका-दोघांच्या नियुक्त्या केल्या, पण पक्षातील असंतोषाला पूर्णपणे मूठमाती मिळाली नव्हती. आता गोव्यात पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आलेले असताना पक्षाच्या १०८ बुथ स्तरावरील प्रतिनिधींनी राजीनामा दिल्यामुळे पक्षातील असंतुष्टांनी काँग्रेसची नाचक्की करण्याचा प्रयत्न केला. खर्गे यांनी भाजपला दिलेले प्रत्युत्तर आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना केलेले मार्गदर्शन यामुळे १०८ जणांच्या राजीनाम्याचे फार दुःख काँग्रेसमध्ये दिसलेले नाही, हे विशेष. पण पक्षातील असंतुष्टांनी हा मुहूर्त साधण्याचा प्रयत्न केला आणि काही प्रमाणात काँग्रेस वरिष्ठांपर्यंत थेट संदेश पोहोचवला, यात शंका नाही.
खर्गे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना काँग्रेसशी गद्दारी करून जे लोक पळून गेले किंवा सरकारात मंत्री झाले त्यांना मतदान करू नका, असे आवाहन मतदारांना केले आहे. त्याचवेळी त्यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही फटकारले. भाजपने उत्तराखंडमध्ये केलेल्या तथाकथित 'शुद्धीकरणा'च्या मुद्द्यावर त्यांनी भाजपला पापी म्हटले. इतर धर्मियांना धर्मविरोधी ठरवणे ही धर्माची शिकवण आहे का, असा सवाल करून "पापी लोक भाजपमध्ये आहेत, त्यांचे आधी शुद्धीकरण करायला हवे," असा टोलाही लगावला. देशाच्या स्वातंत्र्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे योगदान नाही याचा पुनरुच्चारही त्यांनी केला. धर्माचा बाजार मांडून दुसऱ्यांना कमी लेखणाऱ्यांना खर्गे यांनी फैलावर घेतले, त्यामुळे 'वंदे मातरम'चे निमित्त करून त्यांच्या विरोधात निदर्शने करणारे असोत वा काँग्रेसमधील राजीनामे देणारे असोत सर्वांकडेच खर्गे यांनी दुर्लक्षच केले. खर्गे आले असले तरी गोव्यातील काँग्रेसमध्ये असलेली दरी मिटवण्यासाठी त्यांच्याकडे किंवा काँग्रेसकडे सध्यातरी कुठलेच उपाय दिसत नाहीत किंवा तसे काही धोरणही आहे असेही दिसत नाही. दुसऱ्या बाजूने गोव्यात भाजपला पराभूत करण्यासाठी काँग्रेसकडे ठोस असे काही उपाय असल्याचेही दिसत नाही. खर्गेंनी गोव्यात येऊन भाजप, संघाला फैलावर घेतले असले तरी काँग्रेसमधील असंतुष्टांना कसे रोखायचे, पक्ष कसा मजबूत करायचा, एकी कशी ठेवायची, याविषयी सध्यातरी खर्गे विशेष काही बोललेले नाहीत. खर्गे यांच्या येण्यामुळे प्रदेश काँग्रेसमध्येही उत्साह दिसलेला नाही. फक्त पक्षाचा अध्यक्ष गोव्यात आला, हेच गिरीश चोडणकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांसाठी समाधानाचे आहे असे म्हणावे लागेल.


