गोवा गेल्या काही वर्षांत भाजी उत्पादनात स्वयंपूर्ण होण्यासाठी प्रयत्न करत आहे. भाज्यांची लागवड करणाऱ्यांची संख्या वाढत असून भाजीचे उत्पादनही लक्षणीयरीत्या वाढले आहे. शासनाने हा विषय गांभीर्याने घेऊन पडीक जमिनी भाजी लागवडीखाली आणण्यासाठी गावोगावच्या शेतकऱ्यांमध्ये जागृती निर्माण केली, तर गोवा आवश्यक त्या गरजेच्या भाज्यांचे उत्पादन करू शकेल. काही ठराविक भाज्याच आयात कराव्या लागतील; मात्र रोजच्या वापरातील अनेक भाज्या गोव्यातच पिकवता येणे शक्य आहे. गोव्यातील शेती उत्पादनाखाली असलेले क्षेत्र गेल्या पाच वर्षांत फारसे बदललेले नाही, उलट ते थोडे कमीच झाले आहे. गोव्यात मुक्तीसमयी ५०,३०० हेक्टर क्षेत्र शेतीखाली होते. १९८१ पर्यंत ते ३७,९५५ हेक्टर झाले, तर २०२४-२५ पर्यंत शेतीचे क्षेत्र कमी होऊन ३२,६१३ हेक्टर झाले. हे आकडे पाहता एकूण शेतीचे क्षेत्र घटत आहे; त्यामुळे समग्र शेतीचे उत्पादन वाढले आहे असे म्हणता येणार नाही. गेल्या ३०-४० वर्षांत गावोगावची शेती पडीक झाली आहे, ते क्षेत्र भाजी लागवडीखाली आणण्याची मोठी संधी उपलब्ध आहे. कृषी खात्याने अशा क्षेत्राचा विचार भाजी लागवडीखाली आणण्यासाठी केला किंवा स्थानिक शेतकऱ्यांना एकत्र करून प्रयोग राबवला, तर गोव्यात भाजीचे उत्पादन विपुल प्रमाणात वाढू शकेल. शेती, बागायतीचे नुकसान करणाऱ्या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी वन खाते आणि कृषी खात्याने संयुक्तपणे काही उपाय केले किंवा शेतकऱ्यांना 'फेन्सिंग'सारख्या गोष्टींसाठी मदत केली, तर गोव्यातील गावोगावी शेतीचे मळे फुलू शकतात. भाजी उत्पादनापासून ते फुलांच्या लागवडीपर्यंत अनेक उपक्रम राबवणे शक्य आहे, मात्र त्यासाठी कृषी खात्याने पुढाकार घेण्याची गरज आहे. अनेक शेतकऱ्यांनी शेती सोडून दिल्यामुळे ती जागा पडीक राहिली आहे; मात्र तेथे भाज्यांची लागवड करणे सहज शक्य आहे. 'स्वयंपूर्ण मित्रां'ना त्या कामांची जबाबदारी दिली आणि लोकांमध्ये भाजी लागवडीची आवड निर्माण केली, तर गोव्यातील शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील.
गोव्यात भाजी लागवड करणाऱ्यांची संख्या दरवर्षी शंभर ते दीडशेच्या दरम्यान वाढत आहे, ही अत्यंत सकारात्मक गोष्ट आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार भाजीचे उत्पादन आणि लागवडीचे क्षेत्रही वाढत आहे. २०२४-२५ साली भाजीच्या लागवडीचे क्षेत्र होते ८,८६३ हेक्टर आणि उत्पादन होते १,१०,८८० टन. २०२५-२६ साली उत्पादन झाले १,१२,६२७ टन आणि क्षेत्र झाले ८,९३८ हेक्टर. ही वाढ थोडी दिसत असली, तरीही हे आकडे सर्व भाजीचे नसावेत. गोव्याच्या फलोत्पादन महामंडळाने २०२३-२४ मध्ये १,५०९ मेट्रिक टन गावठी भाजी खरेदी केली होती, तर २०२४-२५ साली १,६२४ मेट्रिक टन गावठी भाजी खरेदी केली. अर्थात या भाजीसाठी शेतकऱ्यांना दोन्ही वर्षी मिळून सुमारे १२ कोटी रुपये मिळाले. यावरून गावठी भाजीच्या लागवडीतही वाढ होत असल्याचे स्पष्ट होते. प्रत्यक्ष उत्पादनाचे आकडे यापेक्षा नक्कीच जास्त असू शकतात; कारण शेतकरी जेव्हा आपल्या परिसरात भाजी विकायला बसतात, तेव्हा स्थानिक भाजी आणि ताजी म्हणून लोक त्यांच्याकडून खरेदी करण्यावर भर देतात. ही सगळीच भाजी महामंडळाकडे येत नाही. त्यामुळे गोव्यात फलोत्पादन महामंडळ जो आकडा देत आहे, त्याहीपेक्षा मोठ्या प्रमाणात भाजीचे उत्पादन होत असावे.
मुख्यमंत्र्यांनी गोव्यातील शेतकऱ्यांकडून भाजी खरेदी करून ती विकण्यासाठी 'गोवा फ्रेश' नावाचा ब्रँड तयार करण्याची आणि विकसित करण्याची घोषणा केली आहे, त्यामुळे गोव्यातील भाजी लागवडीला निश्चितच प्रोत्साहन मिळेल. त्यासाठी फक्त सध्या जी भाजी लागवड होते, त्यावर अवलंबून न राहता सरकारने पुढाकार घेऊन शेतकऱ्यांचे गट स्थापन करून पडीक असलेली जमीन भाजी लागवडीखाली आणण्यासाठी योजना आखावी, जेणेकरून लोक त्याकडे फायद्याचा व्यवसाय म्हणून पाहतील. सध्या अनेक शेतकरी स्वतःच्या गरजेपुरती आणि उरलेली भाजी स्थानिक बाजारात विकण्यासाठी लागवड करतात; या मानसिकतेत बदल व्हायला हवा. सरकारने 'गोवा फ्रेश' ब्रँड विकसित केल्यास भाजी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होईल, यासाठी उत्पादन वाढवावे लागेल. याशिवाय बाहेरून येणारी भाजी आरोग्यदृष्ट्या घातक असू शकते, तर गोव्यात पिकवली जाणारी भाजी अधिक सुरक्षित असू शकते. त्यासाठी कृषी खात्याने सर्व प्रक्रियेवर योग्य नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.


