सत्तरीतील रावण, घोटेली आणि मोर्ले त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील तळेखोल गावाच्या परिसरात 'अळमो डोंगर' वसलेला आहे. केरी वनक्षेत्रात समाविष्ट होणारा हा डोंगर एकेकाळी माडत, किंदळ, जामो, असण, चांदिवडो, घोटींग, तिरफळ, कुमयो, नाणो आदी स्वदेशी वृक्षवेलींनी समृद्ध होता. येथील प्रामुख्याने पानगळतीच्या वृक्षवेलींनी संपन्न जंगलात पावसाळ्यात प्रामुख्याने तेथील वारुळांवर, माळरानावरच्या गवतात मांसल व छत्रीसारख्या अळंब्यांची मोठ्या प्रमाणात पैदास व्हायची. त्यामुळेच तेथे उभा असलेला डोंगर 'अळमो' नावाने परिचित झाला होता. जिवंत किंवा मृत वनस्पती, प्राणी यांच्यापासून अन्न घटक शोषून इथे 'कवकां'ची पैदास होते.
ब्रॅकेट कवके, स्टिंक हॉर्न, पफबॉल, शॅतरेल अशी कवके पहायला मिळतात. कवकजाल प्रजातींतील अळंबी जमिनीतील आवश्यक कर्बोदके, प्रथिने आणि विशिष्ट जीवनसत्वे तसेच इतर पोषक द्रव्ये शोषून घेतात. मृत गवत, कुथित मृदा यापासून त्यांना अन्न घटक मिळतात. इतरत्र पडलेले वृक्ष, खुंट आणि बांधकामासाठी वापरल्या जाणाऱ्या लाकडांवर त्याचप्रमाणे तृणहारी प्राण्यांच्या विष्ठेवर
अळंब्यांची पैदास होत असते. वनस्पतींच्या निकोप वाढीसाठी पदार्थाचे अपघटन करण्याच्या प्रक्रियेत उपयुक्त खनिजे मातीत मिसळण्यात 'कवके' महत्त्वाचे योगदान करत असतात.
पानगळतीच्या वृक्षांमुळे इथे खार, शेकरू यांचे वास्तव्य असून त्यांना आवश्यक अन्न, पाणी यांची इथे उपलब्धता आहे. खरे तर कीटक आणि अन्य प्राण्यांसाठी कवके अन्न घटक देत असतात. काही खारी उन्हाळ्यात अळमी गोळा करून, झाडाच्या फांदीवर सुकवण्यासाठी ठेवतात आणि हिवाळ्यात त्यांचा वापर करतात. प्राण्यांच्या याच सवयीचे अनुकरण आदिवासी जमातीने केले आणि त्यामुळे गोव्यातील वेळीप जमातीत अळंबी सुकवून ठेऊन, गरजेनुसार वापरण्याची प्रथा आहे.
अळंब्यांचा वापर अन्न म्हणून आदिम काळापासून रानातील जमाती करत आलेल्या आहेत. ग्रीक व रोमन लोक अळंबी देवाचे अन्न म्हणून खात असत. मेक्सिकोतील 'अझटेक' जमात कवकांचा उपयोग भ्रम उत्पन्न करण्यासाठी व संकेत पाहण्यासाठी करायची. समुद्र सपाटीपासून १२९.८ मीटर उंची असलेल्या 'अळमो डोंगरा'च्या पायथ्याशी पेडणेतील मोरजी, बार्देशमधील म्हापसा, महाराष्ट्रातील पारगड, कोल्हापूर, कोकणातील माईण, सत्तरीतील पर्येचे सावंत त्याचप्रमाणे वाघेरीवरून स्थलांतरित झालेल्या पशुपालक धनगर आणि अन्य कष्टकरी लोकसमुहांचे वास्तव्य आहे. अळमो डोंगराच्या दोन बाजूंना 'दाबेलाचा हरल' आणि 'गटारो' या ओहळांद्वारे जलसिंचनाची सोय उपलब्ध व्हायची. महाराष्ट्रातील तळेखोल परिसरात उगम पावणाऱ्या 'गटारो'चे पाणी 'मुतरो गुण्या'कडून बारामाही सिंचन सुविधा पुरवायचे. त्यामुळे घोटेलीतील मोरशी येथील 'पावलांची कोण' या ठिकाणी आदिम संस्कृतीशी नाते सांगणारी प्रस्तर चित्रे पहायला मिळतात. रावण, घोटेली आणि मोर्ले परिसरात राहणाऱ्या कष्टकरी समाजासाठी देवसू, करमळी, दाबेल हरल, माणूक तळे आदी भागांतील लागवडीयोग्य जमीन लोकांना भातशेती करण्यासाठी प्रवृत्त करायची. मान्सूनच्या पावसाळ्यातील पाणी अळमो डोंगराच्या माध्यमातून हिवाळ्यात आजूबाजूचे झरे प्रवाहित करायचे.
अळमो डोंगर हा आपल्या नावाप्रमाणे गोव्यातील रावण, घोटेली आणि मोर्ले, त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील दोडामार्ग तालुक्यातील तळेखोल गावातील लोकांसाठी मौसमी खाद्य-अळंब्यांच्या विविध प्रजातींसाठी ख्यात होता. 'रोयणाळी', 'खुट्याळी', 'शिरंगार' आदी खाद्यान्न म्हणून गणल्या जाणाऱ्या अळंब्यांची इथे मुबलक प्रमाणात पैदास व्हायची आणि त्यासाठी हा डोंगर 'अळमो' म्हणून नावारूपास आला. आज हा डोंगर तेथील स्वदेशी वृक्षवेलींच्या प्रजातींच्या तोडीमुळे आणि अळंब्यांच्या विविध प्रजातींच्या पैदासीचे गतवैभव गमावल्यामुळे विस्मृतीत जाण्याच्या मार्गावर आहे.
सत्तरीला सह्याद्रीच्या एकापेक्षा एक उंच अशा पर्वतशिखरांचे वैभव लाभलेले आहे. केरी ग्रामपंचायत क्षेत्रात तर वाघेरीशिवाय मोर्लेगड, बोळेरीचो टेंब, चिवारधार, मिठाशेर अशी पर्वतशिखरांची मालिकाच पसरलेली आहे. त्यातील 'वाघेरी' हे पट्टेरी वाघांच्या नैसर्गिक अधिवासासाठी, 'मोर्लेगड' थुईथुई नाचणाऱ्या मोरांसाठी, तर 'चिवारधार' हे एकेकाळी चिवार बांबूंनी समृद्ध असण्यासाठी नावारूपास आले. परंतु, केवळ अळंब्यांच्या नानाविध प्रजातींसाठी प्रसिद्ध असलेला 'अळमो डोंगर' हा जुन्या काळी वैशिष्ट्यपूर्ण ठरला होता.
हरितद्रव्यहीन असल्याकारणाने अळंबी स्वतःचे अन्न तयार करत नाही; ती 'शवोपजीवी बुरशी' असल्याने मृत वनस्पती, प्राणी किंवा विष्ठेवर तिचे भरणपोषण होते. दमट वातावरणात व पावसाळी हवामानात अळंब्यांची मोठ्या प्रमाणात पैदास होत असते. त्यांच्या विविध प्रजातींचे प्रत्यक्ष दर्शन घेण्यासाठी 'अळमो डोंगर' हा नैसर्गिक अधिवास ठरलेला होता. मात्र, सुमारे पाव शतकापूर्वी गोवा सरकारच्या
वन खात्याने सामाजिक वनीकरण योजनेअंतर्गत केलेली वृक्षलागवड आणि स्थानिकांनी केलेली काजूची लागवड यामुळे या पर्वताची अळंब्यांसाठी असलेली ख्याती हळूहळू लोप पावत चालली आहे. परंतु असे असताना अळमो डोंगरावर मान्सूनचा पाऊस सुरू झाल्यानंतर, येथे असणाऱ्या विविध प्रकारच्या बुरशीच्या प्रजातींची पैदास होऊ लागते. त्यात प्रामुख्याने वारुळांवर अळंब्यांची पैदास मात्र हमखास होते आणि त्यामुळे ही अळंबी काढण्यासाठी स्थानिक लोक आषाढ, श्रावणात अळमो डोंगरावर मार्गक्रमण करतात. एकेकाळी ही अळंबी काढताना, लोकमानसाने वारुळाचे पावित्र्य राखत आणि आपल्या कुटुंबाच्या गरजेनुसार ती काढताना लोकसंकेतांचे पालन करण्याला प्राधान्य दिले होते. त्यामुळे अळंबी काढताना त्यांनी कधी अधाशीपणा दाखवला नव्हता. आपल्यासाठी अळंबी जसे अन्न आहे, तसेच अन्य जीवांसाठी पौष्टिकता, प्रथिने, खनिजे, जीवनसत्त्वे मिळवण्याचा महत्त्वपूर्ण स्रोत आहे, याची जाणीव असल्याने त्यांनी काही अळंबी वारुळावर शिल्लक राहतील याची विशेष काळजी घेतली होती. आज ही भावना समाजातून हद्दपार होत असल्याने अळमो डोंगर आणि त्याच्यावरच्या अळंब्यांच्या प्रजाती संकटग्रस्त झालेल्या आहेत.
- राजेंद्र केरकर
(लेखक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते
असून पर्यावरणप्रेमी आहेत.) मो. ९४२१२४८५४५


