तुरुंग पोखरणारी वाळवी

तुरुंगाच्या सुरक्षेसाठी असलेले कर्मचारीच कैद्यांना ड्रग्ज, मोबाईल पुरवठा करण्यात गुंतलेले दिसतात. त्यामुळे तुरुंग प्रशासनाने तुरुंगाच्या सुरक्षेतील कर्मचाऱ्यांच्या वारंवार बदल्या करून कडक सुरक्षाकवच निर्माण करण्यासाठी ठोस उपाययोजना करायला हवी, तसेच सुरक्षा व्यवस्थेत केवळ प्रामाणिक लोकांचीच नेमणूक करणे अत्यंत गरजेचे आहे.

Story: संपादकीय |
19th August, 11:58 pm
तुरुंग पोखरणारी वाळवी

कोलवाळ कारागृह हे नेहमीच गैरप्रकारांसाठी चर्चेत असते. कधी कैद्याची हत्या, तर कधी ड्रग्जचा व्यवहार; कधी मोबाईल सापडतात, तर कधी कर्मचारीच कैद्यांना ड्रग्ज पुरवतात. अशा अनेक प्रकरणांमुळे हे कारागृह गैरकृत्यांचा अड्डाच बनले आहे. कितीही सुधारणा करण्याचा प्रयत्न केला, तरी तुरुंगात काही ना काही गैरप्रकार घडतच असतात. मागे तेलंगणा पोलिसांनी या कारागृहातील काही कैदी ड्रग्जचे रॅकेट चालवतात हे पुराव्यानिशी सिद्ध केले होते. त्यांनी छापा मारून अनेक मोबाईल फोन जप्त केले होते. या तुरुंगात असलेल्या ड्रग्ज व्यवहारातील कैद्यांकडून देशभरात ड्रग्जचा पुरवठा केला जातो, असे तेलंगणा पोलिसांचे म्हणणे आहे. 

कारागृहात कडक सुरक्षा व्यवस्था असतानाही काही कर्मचारी आणि सुरक्षा रक्षक कैद्यांना तंबाखूजन्य पदार्थ, ड्रग्ज आणि मोबाईल पुरवतात. हे प्रकार वारंवार समोर आल्यामुळे तुरुंग उपअधीक्षकांपासून ते कॉन्स्टेबल आणि जेलगार्डपर्यंत अनेक कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाली आहे. आता समोर आलेले नवे प्रकरण तर अधिकच गंभीर आहे. गोवा मनुष्यबळ विकास महामंडळामार्फत सुरक्षा रक्षक म्हणून भरती झालेल्या एका महिला कर्मचाऱ्याने कैद्यांना ड्रग्ज पुरवठ्याचा सपाटा लावला होता. त्या बदल्यात ती कैद्यांकडून पैसे उकळायची; तिच्याकडे तीन एटीएम कार्ड्स सापडली आहेत. थर्मासमधून गांजा आणि चरस घेऊन जाणारी ही महिला बऱ्याच दिवसांपासून हे करत होती यात शंका नाही. भ्रष्टाचार करून जास्त पैसे कमावण्याचा हव्यास काहींना जडला आहे. ही महिला ज्या महामंडळामार्फत भरती झाली होती ते महामंडळ सुरक्षा रक्षक, स्वच्छता कर्मचारी अशा वेगवेगळ्या पदांवर दहावीपर्यंत किंवा त्यापेक्षा कमी शिक्षण झालेल्यांना नोकरी देते. पगार कमी असला तरी हजारो लोक या महामंडळामार्फत काम करत आहेत. याच महामंडळामार्फत सुरक्षा रक्षक म्हणून भरती झालेली ही महिला कोलवाळ तुरुंगात कैद्यांना ड्रग्ज पुरवठा करण्याचे काम करत होती. या प्रकरणामुळे कोलवाळ तुरुंगातील गैरप्रकार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत. 

एप्रिलमध्ये एका कॉन्स्टेबलला दीड किलो गांजाची तस्करी करताना पकडले होते. त्यापूर्वी फेब्रुवारी २०२५ मध्ये तंबाखूजन्य आणि प्रतिबंधित वस्तूंची तस्करी तुरुंगात होत असल्याचे समोर आल्यानंतर एका उपअधीक्षकासह एका एएसआयला निलंबित करण्यात आले होते. २०२३ मध्ये रावणाचा पुतळा जाळण्याची परवानगी कैद्यांना दिली म्हणून चार कर्मचारी निलंबित झाले होते; ज्यामध्ये एक सहाय्यक अधीक्षक, दोन जेलर आणि एका सहाय्यक जेलरचा समावेश होता. २०१८ मध्येही एका जेलगार्डला आपल्या बुटात लपवून तंबाखूजन्य पदार्थ आत नेताना पकडल्यानंतर निलंबित करण्यात आले होते. अशी अनेक प्रकरणे कोलवाळ तुरुंगात घडत आहेत. ड्रग्ज, तंबाखूजन्य पदार्थ आणि मोबाईल तर हमखास तुरुंगात सापडतात. दरवेळच्या कारवाईत मोबाईल फोन मिळतात, पण हे फोन आत कसे पोहोचतात याच्या मुळाशी कोणीच जात नाही. त्यामुळे दरवेळी तेच प्रकार घडत आहेत. तुरुंग हे सुधारणागृह असायला हवे. तिथे कैद्यांचे वर्तन सुधारावे आणि चांगल्या वागणुकीमुळे त्यांची लवकर सुटका व्हावी, अशी अपेक्षा असते. त्यासाठी कोलवाळ तुरुंगात कैद्यांच्या सुधारणेसाठी विविध उपक्रम राबवले जातात. कैद्यांच्या पुनर्वसनासाठी आता नवे उपक्रमही मार्गी लागत आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार खुल्या आणि निमखुल्या कारागृहाची संकल्पनाही देशभर लागू होत आहे. कोलवाळ येथेही निमखुल्या कारागृहाची उभारणी होणार असून इमारतीच्या आराखड्याचे काम वेगाने सुरू आहे. एका बाजूने कैद्यांमध्ये सुधारणा व्हावी यासाठी सरकार खर्च करत असताना, दुसऱ्या बाजूला तुरुंगात दरवेळी मोबाईल आणि तंबाखूजन्य पदार्थ सर्रास सापडतात. तुरुंगाच्या सुरक्षेसाठी असलेले कर्मचारीच कैद्यांना ड्रग्ज, मोबाईल पुरवठा करण्यात गुंतलेले दिसतात. त्यामुळे तुरुंग प्रशासनाने तुरुंगाच्या सुरक्षेतील कर्मचाऱ्यांच्या वारंवार बदल्या करून कडक सुरक्षाकवच निर्माण करण्यासाठी ठोस उपाययोजना करायला हवी, तसेच सुरक्षा व्यवस्थेत केवळ प्रामाणिक लोकांचीच नेमणूक करणे अत्यंत गरजेचे आहे.