नवरात्र : उत्सव शक्तीचा, जागर स्त्रीशक्तीचा

भारतीय संस्कृतीतील सण जीवनदृष्टी देतात. ११ ऑक्टोबरपासून सुरू होणारा नवरात्रोत्सव हा आदिशक्तीच्या उपासनेसोबतच आपल्यातील सुप्त शक्तीची जाणीव करून देणारा श्रद्धा, भक्ती आणि शक्तीचा अनोखा संगम आहे.

Story: नवरात्र |
16th October, 07:59 pm
नवरात्र : उत्सव शक्तीचा,  जागर स्त्रीशक्तीचा

नवरात्र म्हटले की सर्वप्रथम डोळ्यांसमोर येते ती देवीची मूर्ती. घराघरांत होणारी घटस्थापना, मंदिरांमध्ये होणारी आरती, फुलांची सजावट, दिव्यांचा प्रकाश, उपवास, भजन-कीर्तन आणि उत्साहाचे वातावरण यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय होऊन जातो. नऊ दिवस देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते. प्रत्येक रूपामागे एक वेगळी शक्ती, एक वेगळा गुण आणि एक वेगळा संदेश आहे. पौराणिक कथांमध्ये महिषासुराचा वध करण्यासाठी देवीने धारण केलेल्या दुर्गारूपाचे वर्णन येते. देवतांच्या शक्ती एकत्र आल्या आणि त्या शक्तीतून आदिशक्तीचा जन्म झाला. तिने महिषासुराचा पराभव करून अधर्मावर धर्माचा विजय मिळवला म्हणूनच नवरात्र आपल्याला एक मूलभूत सत्य सांगते वाईट कितीही मोठे असले, तरी सत्य आणि चांगुलपणाची शक्ती त्यापेक्षा मोठी असते.

मात्र या पौराणिक कथेकडे आजच्या काळाच्या संदर्भातून पाहिले तर त्याचा अर्थ आणखी व्यापक होतो. आजची स्त्रीही अनेक प्रकारच्या संघर्षांना सामोरी जाते. घर सांभाळतानाच नोकरी, व्यवसाय, शिक्षण, कुटुंब आणि स्वतःची स्वप्ने यांचा समतोल साधणारी स्त्री आपल्याला प्रत्येक क्षेत्रात दिसते. कधी ती आईच्या रूपात कुटुंबाला आधार देते, कधी मुलीच्या रूपात घराचे स्वप्न पूर्ण करते, कधी शिक्षिका बनून अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य घडवते, तर कधी डॉक्टर, अभियंता, अधिकारी, शेतकरी, उद्योजिका, कलाकार किंवा समाजसेविका म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण करते. तिच्या चेहऱ्यावर दिसणाऱ्या हसऱ्या भावांमागे कित्येक संघर्ष लपलेले असतात. अनेकदा ती स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवून कुटुंबासाठी जगते. परिस्थिती कितीही कठीण असली तरी ती खंबीरपणे उभी राहते. म्हणूनच आजच्या काळात देवीच्या मूर्तीतील शक्ती शोधण्याबरोबरच आपल्या आजूबाजूच्या स्त्रीतील शक्ती ओळखणे अधिक महत्त्वाचे आहे.

आपण देवीला फुले वाहतो, आरती करतो, तिच्यासमोर नतमस्तक होतो. पण त्याच वेळी एखाद्या मुलीच्या स्वप्नांना आपण थांबवत नाही ना? एखाद्या स्त्रीच्या निर्णयाचा आदर करतो का? तिच्या शिक्षणाला, करिअरला आणि स्वावलंबनाला प्रोत्साहन देतो का? तिच्या सुरक्षिततेची जबाबदारी केवळ तिचीच आहे असे मानत नाही ना? हे प्रश्न नवरात्राच्या निमित्ताने स्वतःला विचारणे गरजेचे आहे. देवीची पूजा करणे सोपे आहे, पण स्त्रीचा सन्मान करणे ही खरी परीक्षा आहे.

आज नवरात्र हा केवळ धार्मिक उत्सव नसून गरबा आणि उपक्रमांमुळे एक सामाजिक पर्व बनला आहे. तरुणाईच्या मोठ्या सहभागामुळे हा उत्सव समाजप्रबोधनाचे प्रभावी माध्यम ठरू शकतो. स्त्रीसन्मान, मुलींचे शिक्षण, पर्यावरण संवर्धन आणि रक्तदान यांसारखे उपक्रम जोडल्यास उत्सवाचे महत्त्व अधिक वाढेल. देवीसमोरचा दिवा मंदिर उजळवतो, पण शिक्षणासाठी दिलेली मदत आयुष्य उजळवते. परंपरा जपताना ध्वनिप्रदूषण व प्लास्टिक टाळून निसर्गरक्षण करणे हीच खरी शक्तीपूजा ठरेल.

नवरात्रातील उपवास अन् पूजाविधी केवळ श्रद्धेपुरते नसून आत्मसंयमाची संधी देतात. बाहेरच्या वाईटाशी लढण्यापूर्वी मनातील राग, मत्सर आणि अहंकारावर विजय मिळवणे आवश्यक आहे. खऱ्या अर्थाने नवरात्र म्हणजे अंतस्थ शक्ती जागृत करण्याचा काळ. आर्थिक चणचण, एकटेपणा, अपयश किंवा समाजाच्या अपेक्षांशी लढताना टिकून राहण्याची जिद्द हीच आपली खरी शक्ती आहे. नवरात्र आपल्याला आपल्यातील याच धैर्याची आणि अपराजित आत्मशक्तीची आठवण करून देते.

आजच्या धावपळीच्या जीवनात यश मिळवताना आपण स्वतःची शांती हरवत आहोत. अशा वेळी नवरात्रासारखे सण आपल्याला मुळांशी जोडतात; कुटुंबाला एकत्र आणतात, मंदिरात आरतीच्या निमित्ताने शांतता देतात आणि पुढच्या पिढीला संस्कृतीची ओळख करून देतात. मात्र, केवळ परंपरा नव्हे, तर त्यामागचा विचार पुढे नेणे गरजेचे आहे. यंदा नवरात्रीत देवीकडे सुख-समृद्धीपेक्षा संकटांना सामोरे जाण्याचे धैर्य, अन्यायाविरुद्ध लढण्याची शक्ती, संवेदनशील मन आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक स्त्रीकडे आदराने पाहण्याची दृष्टी मागूया. देवी केवळ मंदिरात नाही, तर ती आई, बहीण, मुलगी आणि संघर्षातून पुन्हा उभ्या राहणाऱ्या प्रत्येक स्त्रीमध्ये आहे. त्यामुळे यंदा नवरात्रीत स्त्रीचा सन्मान, समानता, माणुसकी आणि अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची ताकद आपल्या आचरणात आणण्याचा संकल्प करूया. हीच खरी देवीची खरी आराधना ठरेल.

नवरात्र म्हणजे नऊ दिवसांचा उत्सव नाही, तो मनातील शक्ती जागवण्याचा प्रवास आहे. या नऊ दिवसांत मंदिरातील दिव्यांसोबत आपल्या विचारांमध्येही प्रकाश पडू दे. देवीच्या आरतीसोबत आपल्या मनातील नकारात्मकताही दूर होऊ दे आणि आपल्या मनातील अहंकार, द्वेष, मत्सर आणि अन्यायाचीही राख होऊ दे.

आदिशक्तीच्या चरणी हीच प्रार्थना प्रत्येक घरात सुख असू दे, प्रत्येक मनात शांतता असू दे आणि प्रत्येक स्त्रीला तिच्या सामर्थ्याने जगण्याचे स्वातंत्र्य मिळू दे.

शुभ नवरात्र

जय देवी दुर्गा


- वर्धा विलास हरमलकर

भांडोळ