आपल्या वागण्याचा इतरांवर होणारा परिणाम आपण ओळखतो का?

आत्मपरीक्षणाची सुरुवात “समोरच्याचं काय चुकलं?” या प्रश्नापासून होत नाही.. ती “या परिस्थितीत माझा वाटा काय होता?” हा प्रश्न विचारण्यापासून होते.

Story: मनी मानसी |
16th October, 07:30 pm
आपल्या वागण्याचा इतरांवर होणारा परिणाम आपण ओळखतो का?

एखादी व्यक्ती आपल्याशी अचानक कमी बोलू लागली, किंवा आपल्या बोलण्यावर पूर्वीसारखी प्रतिक्रिया देत नाही, तेव्हा आपण लगेच त्याच्या वागण्याचा अर्थ लावू लागतो. “याला काय झालं?”, “माझ्याशी असं वागण्याचं कारण काय?”, “याला स्वतःबद्दल फारच काही वाटतंय का?” असे प्रश्न मनात येतात. पण याच क्षणी आपण स्वतःला एक प्रश्न विचारतो का, की “माझ्या बोलण्यातून किंवा वागण्यातून समोरच्या व्यक्तीला काही वेगळं जाणवलं असेल तर?”

 समोरच्याच्या वागण्याचं विश्लेषण करणं आपल्याला सहज जमतं पण आपल्या वागण्याचा इतरांवर काय परिणाम झाला, हे तपासणं मात्र अनेकदा अवघड जातं. कारण दुसऱ्याची चूक शोधताना आपल्याला स्वतःच्या वागण्याकडे पाहण्याची गरज राहत नाही. मात्र, नात्यांमधील प्रत्येक दुरावा केवळ समोरच्याच्या स्वभावामुळे निर्माण होतोच असं नाही. कधी कधी आपल्या नकळत केलेल्या एखाद्या कृतीत, बोललेल्या एखाद्या वाक्यात किंवा व्यक्त केलेल्या प्रतिक्रियेतही त्याचं कारण दडलेलं असू शकतं.

 मानसशास्त्रीयदृष्ट्या माणसाला स्वतःच्या वर्तनाचं समर्थन करणं आणि दुसऱ्याच्या वर्तनामागे त्याच्या स्वभावाला कारणीभूत धरणं तुलनेने सोपं जातं. आपण एखाद्याशी उद्धटपणे बोललो, तर त्यामागे आपला ताण, थकवा किंवा परिस्थिती असते. पण दुसऱ्याने आपल्याशी तसंच वर्तन केलं, तर तो उद्धट आहे, असं आपण सहज ठरवतो.

म्हणजे स्वतःच्या वर्तनासाठी आपल्याकडे स्पष्टीकरण असतं मात्र दुसऱ्याच्या वर्तनासाठी मात्र स्पष्ट निकाल तयार असतो.

 उदाहरणार्थ, मित्रांच्या गटात आपण एखाद्याची खिल्ली उडवतो. आपल्याला वाटतं, “अरे, सहज गंमत केली. एवढं मनावर घ्यायचं काय?” पण तीच व्यक्ती पुढच्या वेळी आपल्याशी कमी बोलू लागली, तर आपण तिला गर्विष्ठ ठरवतो. आपल्या विनोदाचा तिच्यावर झालेला परिणाम समजून घेण्याऐवजी तिच्या प्रतिक्रियेचं विश्लेषण सुरू होतं.

 इथे एक महत्त्वाचा फरक लक्षात घ्यायला हवा, आपला हेतू आणि आपल्या वर्तनाचा परिणाम या दोन वेगळ्या गोष्टी आहेत.

 आपला हेतू कुणाला दुखावण्याचा नसला, तरी आपल्या शब्दांमुळे समोरची व्यक्ती दुखावली जाऊ शकते. आपण सहज बोललेलं एखादं वाक्य तिच्यासाठी अपमानास्पद ठरू शकतं. याचा अर्थ आपण वाईट व्यक्ती आहोत असा नाही पण आपला हेतू चांगला होता म्हणून झालेला परिणाम दुर्लक्षित करता येत नाही.

 कधी कधी आपण समोरच्याच्या शांततेलाही चुकीचा अर्थ देतो. एखाद्याने आपल्या टिप्पणीला उत्तर दिलं नाही, तर तो आपल्याला कमी लेखतोय असं वाटतं. पण आपण काय बोललो, कोणत्या संदर्भात बोललो आणि आपल्या शब्दांचा अर्थ समोरच्याला कसा जाणवला असेल, याचा विचार मात्र मागे पडतो. अर्थात, प्रत्येक मौन आपल्याच चुकीचा पुरावा नसतो. समोरच्या व्यक्तीची स्वतःची कारणं असू शकतात. म्हणून आत्मपरीक्षण म्हणजे प्रत्येक वेळी स्वतःलाच दोष देणं नव्हे..तर आपल्याला माहीत नसलेल्या गोष्टींबद्दल लगेच निष्कर्ष न काढणं.

 मनोविश्लेषणाच्या दृष्टिकोनातून पाहिलं, तर कधी कधी स्वतःच्या वर्तनातील अस्वस्थ करणाऱ्या बाजू स्वीकारण्याऐवजी आपण लक्ष समोरच्या व्यक्तीच्या दोषांकडे वळवतो. स्वतःला प्रश्न विचारण्यापेक्षा दुसऱ्याला चुकीचं ठरवलं की मनाला तात्पुरता दिलासा मिळतो. मात्र, त्या दिलाशाच्या बदल्यात स्वतःला समजून घेण्याची संधी आपण गमावू शकतो. म्हणूनच आत्मजाणीव म्हणजे केवळ आपल्या भावना ओळखणं नाही. आपल्या कृतींचा इतरांवर काय परिणाम होऊ शकतो, हे समजून घेण्याची तयारीही आत्मजाणीवेचाच भाग आहे.

 पुढच्या वेळी एखाद्याच्या वर्तनामुळे आपल्याला अस्वस्थ वाटलं, तर लगेच त्याच्याबद्दल निष्कर्ष काढण्याआधी क्षणभर थांबूया.

 मी नेमकं काय बोललो किंवा केलं?

माझ्या वागण्याचा समोरच्या व्यक्तीला काय अर्थ जाणवला असेल?

मला माझा हेतू योग्य वाटतो म्हणून मी त्याच्या परिणामाकडे दुर्लक्ष तर करत नाही ना?

 हे प्रश्न स्वतःला कमी लेखण्यासाठी नाहीत. उलट, स्वतःच्या वर्तनाची जबाबदारी स्वीकारण्याइतका स्वतःवर विश्वास निर्माण करण्यासाठी आहेत. कारण प्रत्येक वेळी समोरच्याला बदलणं आपल्या हातात नसतं. पण आपल्या वर्तनाकडे प्रामाणिकपणे पाहणं नक्कीच आपल्या हातात असतं.

 आत्मपरीक्षणाची सुरुवात “समोरच्याचं काय चुकलं?” या प्रश्नापासून होत नाही.. ती “या परिस्थितीत माझा वाटा काय होता?” हा प्रश्न विचारण्यापासून होते आणि आज स्वतःला एक प्रश्न विचारून पाहा, “माझ्या वागण्यामुळे कुणाला दुखावलं गेलं असेल, तर ते मान्य करण्याची आणि गरज पडल्यास स्वतःमध्ये बदल करण्याची तयारी माझ्यात आहे का?”