आपल्या गावाचे वैशिष्ट्य म्हणजे त्या त्या जागेच्या स्वरूपावरून ग्रामीण संस्कृतीने त्यांना वैशिष्ट्यपूर्ण नावे दिलेली असतात. पाऊलवाट म्हणजेच शेतातून, डोंगरातून चालत चालत पायाने मळून नैसर्गिकरीत्या तयार झालेली वाट; चांदणवाट म्हणजे माळरानातून चंद्राच्या प्रकाशात सहज चालता येईल अशी; शेतवाट, घाट, 'पाणद' म्हणजे दोन शेताच्या किंवा दोन कुंपणांमधून जाणारी वाट, जिथे त्या वाटेवरून पावसात पाणी जाते; मांगर वाट, शिवार वाट, पारववाट, पिंपळवाट, चावडी वाट, देवाची घाटी, गावठाण, आवळ्याचा पेढ, पंदळ, खांबड, पायरीत, देववाट, किंदळीचे मराड, उपराची वाट इत्यादी अशी सांगून न संपणारी वाटांची नावे गावाकडे पाहायला मिळतात.
पूर्वीच्या काळी संपूर्ण व्यवहार-बाजार चालतच होत होते. खेड्यापाड्यांत गाड्या पोहोचल्याच नव्हत्या आणि आमच्या बालपणी गावाकडे गाड्या पोहोचल्या, पण सकाळी एक, दुपारी एक आणि संध्याकाळी एक एवढ्याच...
चतुर्थीला गावी गेले होते. गावावरून आत्याचा मुलगा आमच्या घरी आला व तो पूजेनिमित्त आपल्या घरी मला घेऊन गेला. दुसऱ्या दिवशी मला गावी पोहोचवताना दुपारची एस्. टी. पाच मिनिटांसाठी चुकली. आता संध्याकाळपर्यंत इथे बसून राहायचे...? बापरे! इतका वेळ काय करायचे...?
मी म्हणाले, "चल, सड्याच्या वाटेने चालत जाऊया." तो म्हणाला, "तुला माहीत आहे का वाट?" मला थोडी थोडी माहीत होती. मी म्हणाले, "हो, मलाही माहीत आहे, कारण मे महिन्यात आका, सुबा-सुगंधी आत्यासोबत चालत चालत मी मसुरा बाजारात येते. दोन घाट चढायचे - माळरानातून चालत जायचे - मग दोन घाट उतरायचे. झाले! मग आम्ही पयलाडी पोहोचणार; पयलाडी आमचे घर."
दोघांना थोडी थोडी वाट माहीत होती. गाडीची वाट पाहण्यापेक्षा चालत जाऊ, इथे तरी बसून काय करणार?
झाले! बसस्टॉपकडून सड्याच्या वाटेकडे आलो. घाटी चढलो. मग माळरानावर गेलो. पाहतो तर काय, पायवाटाच पायवाटा! आता कुठल्या वाटेने जायचे? आत्याच्या पाठीमागे जाणे सोपे होते, पण आत्ता काय? शेवटी मी म्हणाले, "आत्या वाकडीतिकडी जात नव्हती, सरळ वाटेने जात होती, तर आपण या सरळ वाटेने जाऊया."
चालता चालता अशा ठिकाणी पोहोचलो की पुढे वाटच नाही, घनदाट जंगल! दोघे घाबरलो. त्याला जरी जंगलाची सवय असली, तरी तो अनोळखी जंगलात पोहोचला होता आणि मी तर पाहुण्यासारखी... गावी आली की, कधीतरी आत्याबरोबर बाजारात चालत जायची.
तसेच मागे परतलो. "आता काय करायचे? आता आपण दुसरी मळलेली वाट धरूया. आता कुठे पोहोचू माहीत नाही, पण कोणत्यातरी गावात पोहोचलो तर बरे होईल, म्हणजे तिथेच बसता येईल किंवा जवळ आपला गाव असेल तर चालत जाता येईल," असे म्हणून दुसरी पायवाट धरली.
चालता चालता वाट संपून संपून संपेना आणि उतरायचा घाट काही मिळेना. नंतर मोठ्या पाण्याचा, धबधब्याचा आवाज येऊ लागला. आता तर अगोदरपेक्षा जास्त भीती वाटली, कारण पुढे पाणीच पाणी असेल आणि त्या पाण्यातून आपण जाऊ शकणार नाही म्हणजे पुन्हा वाट बंद... तरी रस्ता आहे तोपर्यंत चालणं भाग होतं.
चालता चालता धबधब्याचा आवाज कमी होऊन ओहळ दिसला व बाजूला घाट-सड्याची उतरायची वाट दिसली आणि तो घाट उतरता उतरता एक घर दिसलं. घरावर कौल सारखी करणारा माणूस दिसला आणि जीवात जीव आला. कुठल्यातरी गावात पोहोचलो!
"ओ काका! हो खयचो गाव? चांदेरवाडीक जावक वाट खयची?" ते म्हणाले, "हीच चांदेरवाडी... खाली दिसता ता ब्राह्मणाचा देऊळ. तुमका कोणाकडे जावचा हा...?"
हे ऐकताच पोटातून शर्मेचे आणि आनंदाचे उफाळे येत होते, पण गप्प... कोणाकडे जायचं आहे ते पत्ता सांगितला आणि खाली उतरलो.
मंदिरात गेले, देवाला म्हटले, "ब्राह्मण देवा! चुकलेल्या वाटसरूला बरोबर वाट दाखवून तुझ्या दारात आणलेस."
एकच घाटी चढली, दुसरी कुठची घाटी चढायची आणि दोन घाट्या उतरायच्या, काही काही समजले नाही; पण चुकता चुकता पोहोचलो, तेही आपल्याच गावात! आणि ज्या घाटीने चालत आलो, त्या घाटीचे नाव होते "देवाची घाटी", जिथे कधीही मी गेले नव्हते.
"देव अशा चुकलेल्याला वाट दाखवतो" म्हणतात ते खरे... घरी पोहोचलो तेव्हा गाडी पुन्हा परत आली होती, म्हणजे जेव्हा गाडीने आम्ही येणार होतो, त्याच वेळात! मात्र, तेव्हा जाणीव झाली की, पायवाट समजणे तेवढे सोपे नाही.
या गोष्टीला कित्येक वर्षे झाली, पण आम्ही भावंडं जेव्हा भेटतो, तेव्हा चुकलेला रस्ता आठवून "हे तुझ्यामुळे झाले आणि हे तुझ्यामुळे झाले" असे एकमेकांच्या अंगावर घालतो आणि खूप हसतो.



