गणपतीची धावपळ चालू होती. रोज नवीन लिस्ट निघत होती सामानाची. आज हे आणायचं, उद्या ते आणायचं, असं आपलं चालू होतं. आता डेकोरेशनचं सामान वेगळं, नेवऱ्या, लाडूचं सामान वेगळं, भाज्या वेगळ्या, नवीन कपडे वेगळे. म्हणजे म्हणजे पक्के दोन ते तीन दिवस खरेदीतच जाणार म्हणायचे. त्यात बाकी सगळं एका दिवसात झालं असतं, पण कपड्यांची खरेदी म्हणजे नक्कीच एक पूर्ण दिवस जाणार. असो!
मुळात आता मार्केटमध्ये जाऊन सर्व सामान आणायचं म्हणजे गाडी पाहिजे. गाडी आणली तर पार्किंग पाहिजे. नंतर सर्व दुकानं आसपासच आहेत याची खात्री करून घेणं आणि मग खरेदीला सुरुवात. आता मडगावात गाडी पार्क करणं आणि तेसुद्धा बाजारात, म्हणजे एखादी कठीण परीक्षा एकाच फटक्यात पास होण्यासारखं आहे. असो! यावेळीही आम्हा दोघांचं, म्हणजे मी आणि हे, अमुक दिवशी सर्व सामान आणायचं ठरलं. अर्थात, आम्ही सामान घेणार; पण चॉईस मात्र आमच्या कन्यारत्नाचा, हे मात्र ठरलेलं असतं. त्याप्रमाणे तिच्या कानावर घालणं क्रमप्राप्त होतं. दुपारी कॉलेजमधून आल्यानंतर तिला विचारलं. झालं, सरळ समोरून उत्तर आलं, “आई, यावर्षी सर्व वस्तू मी घेणार. तुम्ही फक्त बरोबर यायचं आणि पैसे द्यायचं काम करा.” म्हटलं, चला, आमच्या कन्येने कुठेतरी काहीतरी पाहून ठेवलेलं असावं.
मग एका रविवारी दुपारी आमची वरात निघाली पार वास्को रोडवर. थोड्या वेळाने एका प्रशस्त मॉलसमोर गाडी थांबली. लगेच एक युनिफॉर्मधारी सलाम मारत आला आणि एका सुरक्षित जागी पाच मिनिटांत गाडी पार्क झाली. उतरून भव्य प्रवेशद्वारातून मॉलमध्ये शिरलो. अर्थात, मॉलमध्ये येण्याची ही काही पहिलीच वेळ नव्हती; पण प्रत्येक वेळी वेगळेपणा जरूर जाणवतो. थंडगार वातावरणात खरेदी सुरू झाली एकदा. किराणाचा मजला वेगळा, भांड्यांचा वेगळा, कपड्यांचा वेगळा. होता होता खरेदी संपली. पण जवळजवळ तीन तासांनी आम्ही जी लिस्ट काढली होती, त्यापेक्षा जास्तच खरेदी झाली. भल्यामोठ्या रांगेत परत अर्धा तास उभं राहून पाच आकडी बिल समोर आलं, तेव्हा थोडीशी अंधारी डोळ्यांसमोर आलीच. पण म्हटलं, जाऊ दे. एक तर एकाच ठिकाणी घेतलं सगळं, शिवाय एकाच दिवसात. असू द्या.
या मॉलमध्ये वस्तू भरपूर असतात; पण विक्रेता नसतो. आपलं आपण घ्यायचं. त्यात काय चांगलं, काय वाईट सांगणारा कोणी नाही. जे असतात ते फक्त सामान लावणारे आणि कोणती वस्तू कुठे आहे ते सांगणारे. सगळा व्यवहार कोरडा! नाहीतर आमच्या काकाच्या दुकानात बघा. म्हणजे आम्ही तो म्हातारा असल्याने त्याला काका म्हणतो; पण साधे बासमती तांदूळ घ्यायचे तरी दोन-चार प्रकार असतात. सरळ गोणीत हात घाला, सॅम्पल बघा. शिवाय काकाचा फुकट सल्ला असतोच आणि तो फायद्याचाही असतो.
दुसरं असं की, बारकाईने पाहिलं तर प्रत्येक मॉलमध्ये वस्तू असतात त्या ब्रँडेड जरूर असतात; पण अनेक नावं ऐकलेलीसुद्धा नसतात. बऱ्याचदा आपल्याला हव्या त्या ब्रँडच्या वस्तू तेथे नसतातच. मग आपण नाइलाजाने त्या नको असलेल्या वस्तूही घेतो. सगळ्यात मोठा प्रकार म्हणजे ‘एकावर दुसरी वस्तू फ्री!’ गिऱ्हाईकाला आकर्षित करण्याचा एक जुना, पण दुकानदारांच्या दृष्टीने विश्वासार्ह प्रकार. अशा ठिकाणी झुंबड उडते अगदी! पण कोणी त्या प्रॉडक्टची तारीख, विश्वासार्हता तपासतो का? बाजारात कोथिंबिरीची जुडीसुद्धा निवडून घेणारे आम्ही मॉलमध्ये अनेक गोष्टी अगदी आंधळेपणाने घेतो. बरं, वाणसामानात काही खराब आलं तर हक्काने आपण दुकानातून बदलून आणतो. इथे तीही सोय नाही. अर्थात, बदलून मिळतही असेल; पण का कुणास ठाऊक, कसले दडपण येतं आपल्यावर! मॉलमध्ये एखादी वस्तू चुकीची अथवा खराब निघाली तर आपण बदलायला जातच नाही.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बिलिंग हा प्रकार. एक तर अर्धा-अर्धा तास रांगेत उभं राहायचं. त्यात जे बिल होतं, त्यात अशा काही अगम्य गोष्टी असतात की, नक्की बिल कसं केलं ते कळतच नाही. शेवटी बिलिंग करणाऱ्या सुंदरीच्या सुंदर हास्याकडे पाहत, तिने ऑफर केलेल्या पिशवीत सामान भरत, मोठ्या दिमाखात आपण बिल पे करून बाहेर पडतो. खरं सांगा, किती जण असे आहेत की ते बिल चेक करतात?
मी स्वतः मॉल संस्कृतीच्या विरोधात नाही. नावीन्य हे आयुष्यात अंगीकारावंच लागतं; पण ते आपल्या फायद्याचं असावं, दुसऱ्याचं धन करणारे नको. थंडगार ए.सी.मध्ये फिरून काउंटरवरच्या मोहक स्मितहास्याला भुलून आपलं पाकीट कापून घेण्यापेक्षा, घामेजलेल्या अंगाने चार दुकानं फिरून आपल्याला हवं ते, हव्या त्या किमतीत मिळवणं कधीही फायद्याचं नाही का?



