स्तन तपासणी : मॅमोग्राफी, सोनोग्राफी की बायोप्सी?

स्तनाच्या कर्करोगाचे निदान लवकर झाल्यास उपचार अधिक यशस्वी होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे शरीरातील बदल ओळखणे आणि त्यांची योग्य वैद्यकीय तपासणी करून घेणे महत्त्वाचे आहे.

Story: आरोग्य |
30th October, 08:13 pm
स्तन तपासणी : मॅमोग्राफी, सोनोग्राफी की बायोप्सी?

“ताई, माझ्या स्तनात एक छोटी गाठ जाणवतेय. डॉक्टरांनी मॅमोग्राफी करायला सांगितली आहे. पण मला भीती वाटतेय... ही गाठ कर्करोगाची तर नसेल ना?”

मैत्रिणीचा हा प्रश्न ऐकून रुचाच्या मनातही अनेक विचार आले. काही महिन्यांपूर्वी तिलाही स्तनात गाठ जाणवली होती. भीतीपोटी तिने त्याकडे दुर्लक्ष केले होते. आता मात्र तिने डॉक्टरांची भेट घेण्याचे ठरवले. तपासणीदरम्यान डॉक्टरांनी मॅमोग्राफी, सोनोग्राफी आणि गरज पडल्यास बायोप्सी यांविषयी सांगितले. या तीन तपासण्यांची नावे ऐकून रूचाचा गोंधळ आणखी वाढला.

रूचा ही काल्पनिक व्यक्ती असली, तरी तिच्यासारखी भीती अनेक महिलांच्या मनात असते. स्तनात गाठ जाणवली की लगेच कर्करोगाची शंका येते. बऱ्याचदा डॉक्टरांनी मॅमोग्राफी, सोनोग्राफी किंवा बायोप्सी करायला सांगितले की मनात भीती आणि गोंधळ निर्माण होतो, काही महिला घाबरून तपासणी टाळतात. खरं तर या तिन्ही चाचण्या वेगवेगळ्या कारणांसाठी केल्या जातात व प्रत्यक्षात या तपासण्यांचे स्वरूप आणि उद्देश समजून घेतल्यास अनावश्यक भीती कमी होऊ शकते. चला तर, सोप्या भाषेत समजून घेऊया की या चाचण्या नेमक्या काय आहेत आणि कधी केल्या जातात.

मॅमोग्राफी : स्तनांच्या आतील बदलांचा शोध घेण्यासाठी

मॅमोग्राफी म्हणजे स्तनांचा एक्स-रे. ही स्तनांच्या कर्करोगाचे लवकरात लवकर निदान करण्याची सर्वात प्रमुख व प्राथमिक तपासणी पद्धत आहे. एका विशेष एक्स-रे मशीनमध्ये स्तन थोडे दाबले जातात (कंप्रेस केले जातात) आणि वेगवेगळ्या कोनातून फोटो काढले जातात. यामुळे काही सेकंदांसाठी थोडा असह्य दाब जाणवू शकतो, पण यात तीव्र वेदना होत नाहीत.

स्तनात न दुखणारी गाठ असेल, तर तिचे स्वरूप तपासण्यासाठी केली जाते. हाताला न लागणाऱ्या अत्यंत बारीक गाठी किंवा कॅल्शियमचे कण देखील मॅमोग्राफीमध्ये पकडले जाऊ शकतात. चाळीशीनंतर महिलांना नियमित 'स्क्रीनिंग' म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याने दरवर्षी किंवा दर दोन वर्षांनी ही चाचणी करण्याचा सल्ला दिला जातो. 

सोनोग्राफी : गाठीचे स्वरूप समजून घेण्यासाठी

सोनोग्राफीमध्ये ध्वनिलहरींच्या मदतीने स्तनांच्या आतील रचना तपासल्या जातात. यात क्ष-किरणांचा वापर होत नाही.

स्तनातील गाठ द्रवाने भरलेली पिशवी आहे की घन स्वरूपाची गाठ आहे, हे समजण्यासाठी सोनोग्राफी मदत करते. विशेषतः तरुण महिलांमध्ये गाठीच्या तपासणीसाठी तिचा उपयोग केला जातो. गर्भावस्थेत किंवा स्तनपानाच्या काळातही आवश्यकतेनुसार ही तपासणी करता येते.

मात्र, सोनोग्राफी आणि मॅमोग्राफी या एकमेकींच्या पर्याय नाहीत. काही परिस्थितींमध्ये एकच तपासणी पुरेशी असते, तर काही वेळा दोन्ही तपासण्यांची आवश्यकता भासते.

बायोप्सी : संशयाचे उत्तर देणारी तपासणी

मॅमोग्राफी किंवा सोनोग्राफीमध्ये संशयास्पद बदल आढळल्यास डॉक्टर बायोप्सी सुचवू शकतात. या प्रक्रियेत गाठीतील पेशी किंवा ऊतींचा छोटा नमुना घेऊन प्रयोगशाळेत सूक्ष्मदर्शकाखाली तपासला जातो.

कर्करोगाचे निदान निश्चित करण्यासाठी बायोप्सी महत्त्वाची असते. अनेक प्रकरणांमध्ये स्थानिक भूल देऊन सुईच्या साहाय्याने नमुना घेतला जातो. प्रत्येक वेळी शस्त्रक्रिया करावी लागतेच असे नाही. प्रत्येक गाठीसाठी बायोप्सी करणे आवश्यक नसते. गाठीचे स्वरूप आणि प्रतिमांमधील निष्कर्ष पाहून डॉक्टर निरीक्षण, ठरावीक कालावधीनंतर पुनर्तपासणी किंवा बायोप्सी यांपैकी योग्य पर्याय ठरवतात. मात्र, संशयास्पद गाठीची पुढील तपासणी टाळणे धोकादायक ठरू शकते.

कोणत्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये?

स्तनात नवीन गाठ जाणवणे, आकारात बदल होणे, त्वचा आत ओढल्यासारखी दिसणे, स्तनाग्र आत वळणे किंवा रक्तमिश्रित स्त्राव येणे अशी लक्षणे आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. वेदना नसल्या तरी कर्करोगाची शक्यता पूर्णपणे नाकारता येत नाही. तसेच, प्रत्येक गाठ कर्करोगाचीच असते असेही नाही. स्तनांच्या नेहमीच्या स्वरूपातील बदलांची जाणीव ठेवणे उपयुक्त आहे; परंतु स्वतः तपासणी करूनच कर्करोगाचे निदान करता येत नाही.

भीती नको, जागरूकता हवी!

स्नेहाने अखेर डॉक्टरांचा सल्ला घेतला आणि आवश्यक तपासण्या करून घेतल्या. तिला एक गोष्ट समजली, तपासणी करून घेणे म्हणजे कर्करोग झाल्याची खात्री नव्हे; उलट, आपल्या आरोग्याविषयी योग्य माहिती मिळवण्याचा तो मार्ग आहे.

ऑक्टोबर महिना : गुलाबी फितीचा संदेश

दरवर्षी ऑक्टोबर महिना स्तनाच्या कर्करोगाविषयी जनजागृती करण्यासाठी ओळखला जातो. गुलाबी फीत हे या मोहिमेचे प्रतीक आहे. या उपक्रमाचा उद्देश केवळ कर्करोगाविषयी माहिती देणे नसून, महिलांना स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी आणि आवश्यक तपासण्या वेळेवर करून घेण्यासाठी प्रोत्साहित करणे हा आहे.

स्तनाच्या कर्करोगाचे निदान लवकर झाल्यास उपचार अधिक यशस्वी होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे शरीरातील बदल ओळखणे आणि त्यांची योग्य वैद्यकीय तपासणी करून घेणे महत्त्वाचे आहे.

तर या ऑक्टोबरमध्ये गुलाबी फितीचा संदेश केवळ प्रतीकापुरता मर्यादित ठेवू नका. स्तनांच्या आरोग्याविषयी जागरूक व्हा, गैरसमज दूर करा आणि कोणताही असामान्य बदल जाणवल्यास वैद्यकीय सल्ला घेण्यास विलंब करू नका.