हादगा हा मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात खेळला जाणारा पारंपरिक खेळ. मात्र, आपले भारतीय सण-उत्सव शाळेत खेळताना कित्येक वर्षे मुलांसोबत अनुभवी शिक्षकांनी दिलेली परंपरा चालवत आम्ही 'हादगा' खेळतो. हादग्याचे महत्त्व जाणून घेतले, हादग्याची गीतेही अत्यंत मनाला भावणारी होती. पण... मी हादगा कधी बालपणी खेळले नव्हते किंवा या सणाबद्दल स्वतःचा अनुभव नव्हता.
जे जे चांगले मिळेल ते घरी, सार्वजनिक ठिकाणी अमलात आणण्याचे काम केले आहे. हाच हादगा राष्ट्रसेवा समितीमध्ये बरीच वर्षे खेळतो. आज गोवा मराठी अकादमी संचलित अभिजात सांस्कृतिक केंद्र, पर्वरी आणि राष्ट्रसेवा समिती या दोघांच्या संयुक्त विद्यमाने हादगा सण पर्वरीत एकत्र खेळला जाणार होता; तशा निमंत्रणपत्रिकाही अनेक ग्रुपवर पाठविल्या गेल्या.सूर्य हस्त नक्षत्रात प्रवेश करतो, तेव्हा हा सण सुरू होतो. शेती आणि हस्त नक्षत्रातील पाऊस महत्त्वाचा मानला जातो. शेतीसाठी अतिशय उपयुक्त असा हा पाऊस असतो. या पावसाला गावाकडे ‘हत्तीचा पाऊस’ किंवा हादगा म्हणतात. काही ठिकाणी भोंडलाही म्हणतात.
पाऊस प्रमाणातच पडला तर शेतीला फायदा असतो, नाही पडला तर थोडे नुकसान असते व मुसळधार पाऊस पडला तर अतिशय नुकसान होऊन दुष्काळही येऊ शकतो.
अशा या पावसाला आळवणी घालणारा आणि कापणी सोडली तर बरीचशी कामे उरकून झालेल्या कुटुंबांना वेळही असतो; अशावेळी पाटावर हत्ती ठेवून किंवा हत्तीचे चित्र काढून, रांगोळी, पूजा करून, भोवती फेर धरून, सामूहिकरीत्या हात धरून हादगा खेळला जातो. हा नवरात्रीपासून कोजागिरी पौर्णिमेपर्यंत खेळला जातो. "ऐलमा पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडू दे, करीन तुझी सेवा..." या गीताने खेळ सुरू होतो व अनेक अर्थपूर्ण मजेदार गीते म्हणत शेवटी "आड बाय अडवणी, आडाचे पाणी खरवणी...आडात पडला शिंपला, आमचा भोंडला संपला..." या गीताने संपतो.
सर्वजण खिरापत आणतात. कोड्यात त्याचे वर्णन करतात व इतरांनी ती ओळखणे व शेवटी वाटून खाणे.
असा हा हादगा खेळायचा ठरला. आणि उभा हत्तीच कोणाकडे असेल तर शोधू लागलो. समितीत दाखवायला हत्ती आणला काय आणि इकडे अनन्या, रेश्मा ताईने हत्तीभोवती रिंगण धरून गीत गाईलेच, त्यानंतर हत्तीला असे सजवले की, हत्ती पाहूनच भोंडल्याचा अर्धा आनंद सर्वांना मिळाला. त्यानंतर गीते म्हणायला अनेक सख्या उभ्या झाल्या, ज्यांना बालपणापासून ही गीते मुखोद्गत होती.
हादग्याची गीते म्हणताना आणि फेर धरताना नाचताना एकाएकाचे चेहरे पाहून त्यांची विचारपूस करावीशी वाटली. त्यांना बोलके केले तर गोड आठवणी ऐकायला मिळाल्या.
अगदी मुलात मूल होऊन सखी सुनीता म्हणाली, "आमच्या इथे याला भुलाबाई म्हणतात. आम्ही महिनाभर रोज हा खेळतो. एकदा काय गंमत झाली, मैत्रिणीच्या घरी खिरापत ओळखली, पण खिरापत खाण्यासाठी डबा काही केल्या उघडे ना! शेवटी मैत्रिणीच्या आईला दुसरे खाऊ आम्हाला आणून द्यावे लागले. आमच्याकडे प्रत्येकाच्या घरी भुलाबाई बसतात आणि कोजागिरी पौर्णिमेला चांदण्या रात्री मोठ्या चौकात प्रत्येकाच्या घरातील भुलाबाई आणून ठेवल्या जातात आणि धमाल होते." तिच्या जुन्या स्मृती जागृत होऊन मन माहेरी सैरभैर करून आले. अगणित असा आनंद तिला मिळाला.
तर डॉ. आरती दिनकर अगदी छोट्या मुलांसारख्या मध्ये राहून हा खेळ खेळत होत्या. त्यांच्याशी चर्चा करताना त्या म्हणाल्या, "मी त्यावेळेस नऊ-दहा वर्षांची असेन, माझी एक मैत्रीण दीप्तीकडे भोंडला होता, म्हणून आम्ही मैत्रिणी तिच्याकडे जमलो होतो. भोंडल्याची गाणी म्हणता म्हणता घरी जायला उशीर झाला. आमचा भोंडला इतका रंगला होता की वेळ कळलाच नाही. एकामागून एक गाणी, 'अक्कण माती, चिकण माती', 'नणंदा भावजया'... आम्ही थांबतच नव्हतो. शेवटची खिरापत वाटेपर्यंत अंधार पडला. मी घरी आले तेव्हा आई अंगणातच उभी, मी घाबरले, आता ओरडणार. पण आई मला बघून हसली आणि म्हणाली, 'झाला का हादगा पुरा?' त्या दिवशी मला कळलं, भोंडला म्हणजे फक्त गाणी नाही, तर वेळ विसरून आनंदात जगणं असतं."
रेश्मा ताई म्हणाल्या, "मी ५-६ वीत होते, तेव्हा माझ्या सर्व शाळेच्या मैत्रिणींनी शाळेच्या कार्यक्रमासाठी चांगले ड्रेस विकत आणले होते. मी घरी हट्ट केला, पण आपल्याकडे आहे तोच घालायचा, असे आजीने सांगितले. त्याच वेळी आत्या गावी आली होती, तिच्याजवळ रडून ही सर्व हकिकत सांगितली. तिने मला सिल्कमध्ये छान परकर-ब्लाउज शिवून घेतला, त्यावर टिकलीवर्क केले अन् मी तो ड्रेस घालून शाळेच्या कार्यक्रमात खूप छान दिसले. नंतर तोच ड्रेस मी कितीतरी वेळा दसरा, दिवाळीला नवीन म्हणून घातला."
हा हादगा नव्या नावीन्याने समजून घेत होते. अशावेळी मंजिरी ताई आणि इतर म्हणाल्या, "नव्याने सण समजून घ्यायला मिळाला. खेळाविषयी आत्मीयता निर्माण होऊन एक-दीड तास बालपण अनुभवायला मिळाले आणि जे हा सण साजरा करत आले, पण आता तो इथे होत नाही, ते आनंद लुटत लहान बनून मनसोक्त खेळ खेळले." एकएक चेहरा मी वाचत होते. अनेक आठवणींना साद देत, वयाचे भान हरपून मनाने माहेरी जाऊन नाचत होत्या. हे त्यांच्या चेहऱ्यावरील भाव टिपताना मलाही अमूल्य असे मानसिक सुख मिळाले.

- संतोषी शामसुंदर महाले
पर्वरी (९४२०५९४८५९)


