दिवाळी जवळ आली की शेतालगतच्या झुडपांवर कारटांच्या वेलींची जणू तोरणं लटकलेली असायची. आम्हा मुलांचं काम उड्या मारत ती कारटं जमवायची आणि खराब होऊ नयेत म्हणून शेतात आणून ठेवायची. आपल्याच शेतात पिकलेल्या नव्या नव्या भाताचे पोहे! ती मज्जा काही वेगळीच. रात्रभर भिजवलेल्या त्या भाताचे भले मोठे 'पोटले' घेऊन आई चार किलोमीटर चालत जायची. एक 'इरडभर' (अर्धा दिवस) रांगेत राहून आपला नंबर येईल याची वाट पाहताना तिच्या मनात मात्र गणित सुरू असायचं. एक पायली बाय मावशीला, एक पायली बेबी मावशीचे... नाही नाही तिला दोन पायल्या, तिची मुलं खाणारी! एक पायली मोठ्या मामाला… तिच्या भोवती रेंगाळताना आम्ही वाट पाहायचो ती सुकेच पोहे खिशात भरून मित्रमैत्रिणींसोबत उडरायला जायची. आजच्या बाजाराच्या पोह्यांपेक्षा ते कोरडे पोहे पंचपक्वान्नाहून कमी वाटलेच नाहीत कधी.
एका बाजूला दिवाळीची लगबग तर दुसरीकडे कापणी आणि मळणीचीही लगबग सुरूच असायची. दिवाळीसाठी केलेल्या खळ्यात (अंगणात) आई शेण सारवायची. घरात शेण सारवायची जबाबदारी आमच्यावरच असायची. मग पांढऱ्या शाडूची बोटांनी चितारलेली सुरेख रांगोळी आणि सारवलेल्या शेणाची ती रंगत अजूनही मनात तशीच ताजीतवानी.
बाजारातील आजचे आकाशदिवे किती किती प्रकारचे! पण लहानपणी आकाशदिव्याची सुरुवात व्हायची ती मानग्याची (बांबूची) काठी तोडून आणण्यापासून. भाऊ काठी आणायचा. बाबा आणि भाऊ आकाशकंदिलासाठी त्याच्या योग्य कोयत्याने तासून योग्य आकाराच्या काड्या बनवायचा. कुंबयाच्या दोऱ्यांनी घट्ट बांधून सांगाडा झाला तयार! त्यावर रंगीत फोलींचा भलताच साज. असा हा आकाशकंदील जणू गगनालाच भिडायचा.
नरकचतुर्दशीच्या आदल्या दिवशी तिन्हीसांजेला न्हाणी घरातील मडकीला कारिटाचा पाचू गळ्यात लेवून सज्ज व्हायची पहाटेच्या अभ्यंगस्नानासाठी. पहाटे पहाटे ओल्या नारळाच्या दुधात घरी बनवलेले उटणे अलगद मिसळायचे आणि मग तो सुगंध दरवळत दिवाळी आली! दिवाळी आली! असे झुळकेसारखी सांगत फिरायचा. तुळशीसमोर पिठाच्या रांगोळीवरील पाटावर मग पटापट कारीटे फुटायची. सातींगणाच्या रसाने गोडधोड पचवायला पोट सज्ज. केळीच्या पानावर घरच्या गोड तिखट पोह्यांबरोबर उकडलेली कणगी आणि असलाच एखाद दुसरा खजूर त्याचा वेगळाच शाही थाट. गावच्या कुंभाराकडून भाताच्या बदल्यात आणलेल्या मातीच्या पणत्या मंद प्रकाश देत काळोखाला पळवून लावायच्या. त्या उजळत्या अंगणात मौजमजा करताना ही श्रीमंती हरवेल असा भासही झाला नाही मुळी.
पाडवा म्हणजे शेतकऱ्यांचा मोठा सण कारण त्याची खरी लेकरं म्हणजे त्याची गायी गुरं. त्यांना सजवण्याचा सण! आम्ही मुले गोठ्यात शेणाचा गोठा करण्यात दंग व्हायचो. तुपकाडीच्या (रानफुलं) फुलांचा पिवळा, गुलाबी रंग गोठ्याला भलतीच शोभा द्यायचा. कारिटाची गाय, बैल वासरे आणि चुलीजवळ कारिटाच्या पातेल्यात स्वयंपाक करणारी गवळण, गोठ्याजवळ राखणा. मग एकमेकांचे गोठे पाहायला वाडाभर हिंडणारी आम्ही मुले, चुलीजवळ आंबोळ्या बनवताना घामाने निथळणारी आई आणि बैलांच्या शिंगांना पीठ लावून रंगवणारे घरातील पुरुष आणि मुलगे. बैलांना पंचारतीने ओवाळून आंबोळ्या खाऊ घालताना कृतार्थ डोळ्यांनी पाहणारे आई-बाबा! हाच आमचा पाडवा.भाऊबीजेनंतर तुळशीविवाहापर्यंत शेतात भात कापणी, झोडणी आणि मळणीला ऊत यायचा.
मग गावातल्या वाण्याच्या घरी चुरमुरे पोहचल्याची बातमी वाडाभर मुलांना समजलेली असायची. मग वाण्याकडून भाताच्या बदल्यात चुरमुरे आणायची मोठ्यांपेक्षा मुलांनाच जास्त घाई असायची. त्याबरोबर आणखीन एक गोष्ट आठवते ती म्हणजे शेट चुरमुर्यांसाठी शेतात कापणीच्या वेळी जी भातकुटे जमिनीवर पडतात ती आम्ही मुले कपड्याची छोटी पोटली जमिनीला टेकवून ते दाणे सुपात जमवायचो आणि जमा झालेले भात वाण्याला देऊन शेट चुरमुरे मिळाले की आनंद काही वेगळाच. खिशात चुरमुरे चालून मग खेळ सुरू व्हायचे. तुळशीविवाह लावताना वाड्यातील प्रत्येक घरी फिरत चुरमुरे गोळा करणे ही कोणालाच लाज वाटत नव्हती. अशी आनंदाची दिवाळी. होममेड दिवाळी. आठवणींच्या मोरपंखाखाली जपलेली दिवाळी.

- सीमा कुबल
म्हापसा


