आश्विन-कार्तिक महिना आला घेऊन आनंद, उत्साह,
आता परंपरा जपत साजरा करूया दिवाळीचा सण!
दिवाळी म्हटले की वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, दिवाळी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा, आणि भाऊबीज असे सण एकापाठोपाठ येतात. त्यामुळे प्रत्येकजण उत्साहाने या सणांची तयारी करतो. लहान मुलांना शाळेला सुट्ट्या पडतात आणि मुले आकाशकंदील तयार करण्यासाठी, नरकासुराच्या प्रतिमा बनवण्यासाठी दंग झालेली असतात. दिवाळीच्या सणातील प्रत्येक दिवस काही ना काही उद्देश घेऊन साजरा केला जातो. पूर्वीपासून चालत आलेली ही परंपरा आजही जपली जात आहे.
आश्विन-कार्तिक महिन्यात दिवाळीचा सण येतो. पारंपरिक क्रमानुसार सर्वप्रथम वसुबारस साजरी केली जाते. त्यानंतर धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा आणि भाऊबीज हे सण साजरे केले जातात. या सर्व सणांना अनन्यसाधारण असे महत्त्व असल्याचे दिसून येते.
सर्वप्रथम 'वसुबारस'. या दिवशी गोमातेची म्हणजेच गाईची आणि तिच्या वासराची पूजा केली जाते. या पूजेनंतर दिवाळीची पहिली पणती लावली जाते. वसुबारस साजरी करण्यामागील उद्देश म्हणजे या सणाद्वारे गोमातेविषयी आणि तिच्या वासराविषयी कृतज्ञता व्यक्त करणे. तसेच सर्वांच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना करणे.
दुसरा सण म्हणजे 'धनत्रयोदशी'. या दिवशी भगवान धन्वंतरी यांची जयंती साजरी केली जाते, असे मानले जाते. भगवान धन्वंतरी यांना आरोग्याची देवता मानले जाते. या दिवशी चांगल्या आरोग्यासाठी पूजा-अर्चा केली जाते आणि हा सण उत्साहाने साजरा केला जातो.
त्यानंतर येणारा तिसरा उत्सव म्हणजे 'नरक चतुर्दशी'. भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध करून वाईटावर चांगुलपणाचा विजय मिळवला, अशी पौराणिक कथा आहे. नरकासुर नावाच्या राक्षसाने प्रजेवर आणि स्त्रियांवर प्रचंड अत्याचार केले होते. तेव्हा भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध करून प्रजेला त्याच्या जाचातून मुक्त केले. या घटनेची आठवण म्हणून आजही नरक चतुर्दशी साजरी केली जाते. विशेषतः आपल्या गोव्यात नरकासुराच्या प्रतिमा तयार करून त्यांचे दहन केले जाते.
नरक चतुर्दशीनंतर 'दिवाळी' येते. दिवाळीच्या दिवशी पहाटे लवकर उठून अभ्यंगस्नान करण्याची परंपरा आहे. या दिवशी घराघरांत पणत्या लावून परिसर प्रकाशमय केला जातो. काही ठिकाणी फटाकेही फोडले जातात. त्यानंतर सर्वजण अंगाला उटणे लावून अभ्यंगस्नान करतात. तुळशीसमोर कारीट हे एक कडू फळ पायाने फोडण्याचीही परंपरा आहे. या कृतीतून नरकासुराचा वध आणि वाईट प्रवृत्तींचा नाश झाल्याचे प्रतीकात्मक दर्शन घडते. त्यानंतर घराघरांत पोहे, फराळ आणि विविध गोडधोड पदार्थ बनवून दिवाळी साजरी केली जाते. अशी परंपरा गोव्यात खूप उत्साहात साजरी केली जाते.
त्यानंतर येणारा सण म्हणजे 'लक्ष्मीपूजन'. लक्ष्मीपूजन आश्विन महिन्याच्या अमावास्येला केले जाते. या दिवशी घरात तसेच व्यवसायाच्या ठिकाणी माता लक्ष्मीचे पूजन केले जाते. पौराणिक कथेनुसार, समुद्रमंथनातून संपत्ती आणि समृद्धीची देवी माता लक्ष्मी प्रकट झाली. या दिवशी माता लक्ष्मी पृथ्वीवर भ्रमण करते आणि घराघरांत निवास करते, अशी श्रद्धा आहे. त्यामुळे तिच्या स्वागतासाठी लक्ष्मीपूजन केले जाते. तसेच घरात सुख-समृद्धी नांदावी आणि आर्थिक भरभराट व्हावी, यासाठीही लक्ष्मीपूजन केले जाते.
त्यानंतर येणारा उत्सव म्हणजे 'बलिप्रतिपदा'. कार्तिक शुद्ध प्रतिपदेला बलिप्रतिपदा म्हणजेच दिवाळी पाडवा साजरा केला जातो. या दिवशी राजा बळीचे स्मरण केले जाते. तसेच पती-पत्नी एकमेकांना भेटवस्तू देऊन प्रेम आणि आपुलकी व्यक्त करतात. हा सण दानशूरपणा आणि समृद्धीचा संदेश देतो.
त्यानंतर येणारा सण म्हणजे 'भाऊबीज'. भाऊबीज साजरी करण्यामागे यमराज आणि यमुना या भावंडांची पौराणिक कथा आहे. यमुना आपल्या भावाला म्हणजेच यमराजाला नेहमी आपल्या घरी जेवणासाठी बोलावत असे, परंतु यमराज कामात व्यस्त असल्यामुळे त्याला तिच्या घरी जाणे शक्य होत नसे. मात्र, एके दिवशी कार्तिक शुद्ध द्वितीयेला यमराज यमुनेच्या घरी जेवायला जातात. तेव्हा यमुना अत्यंत आनंदाने त्यांचे औक्षण करून स्वागत करते. यमराज तिला वर मागण्यास सांगतात. तेव्हा यमुना, 'दरवर्षी या दिवशी तू माझ्या घरी यावे आणि जी बहीण या दिवशी आपल्या भावाला ओवाळेल, त्या भावाला दीर्घायुष्य लाभावे,' असा वर मागते. यावर यमराज तिला 'तथास्तु' म्हणतात. तेव्हापासून या सणाची परंपरा जपली जात असून भाऊबीज साजरी केली जाते.
अशा प्रकारे पशुप्राण्यांना महत्त्व देणारे, प्रत्येकाच्या आरोग्यासाठी प्रार्थना करणारे, वाईट प्रवृत्तींचा नाश करून चांगुलपणाचा संदेश देणारे, तेजोमय प्रकाशात परंपरा जपणारे आणि प्रत्येकाच्या कल्याणासाठी प्रार्थना करणारे सण दिवाळीच्या मुहूर्तावर साजरे केले जातात. भाऊ-बहीण या नात्यातील प्रेम आणि जिव्हाळा टिकवून ठेवण्याचे कामही भाऊबीज हा सण करतो. प्रत्येक सण हिंदू धर्माची परंपरा टिकवून ठेवतो. तसेच एकमेकांच्या कल्याणासाठी आणि दीर्घायुष्यासाठी या सणांच्या माध्यमातून प्रार्थना केली जाते.
प्रत्येक सण जसा परंपरा टिकवून ठेवतो, तसाच प्रत्येक व्यक्तीला एकत्र येऊन, मिळून-मिसळून सण साजरा करण्याची संधीही देतो. उदाहरणार्थ, नरकासुराच्या प्रतिमा तयार करण्यासाठी मुले-मुली एक महिनापूर्वीच तयारीला लागतात. त्यामुळे सर्वत्र उत्साहाचे वातावरण असते. दिवाळी जवळ आली की आकाशकंदील तयार करण्याची लगबग सुरू होते. आकाशकंदील तयार करण्यात मुले दंग असतात, तर रांगोळी काढण्यासाठी मुलीही उत्सुक असतात. लक्ष्मीपूजनाच्या वेळी देवीचा आशीर्वाद घेताना मुले चिरमुरे, चॉकलेट आणि गोडधोड खाऊचा आनंद घेतात. तसेच बलिप्रतिपदेला दानशूरपणाचा आणि समृद्धीचा पुरस्कार केला जातो. भाऊबीजेला बहिणीला भावाकडून काहीतरी भेटवस्तू मिळण्याची उत्सुकता असते. अशा प्रकारे दिवाळीच्या निमित्ताने प्रत्येकाला नवनवीन गोष्टी शिकायला मिळतात आणि एकत्रितपणे आनंद साजरा करण्याची संधी मिळते.
म्हणूनच,
परंपरा जपत दिवाळी साजरी करा,
सर्व सणांचे महत्त्व जाणत, प्रत्येक सण आनंदाने साजरा करा!

- पूजा भिवा परब
पालये, पेडणे-गोवा


