दिवा फक्त घरात नको, मनातही हवा!

या दिवाळीत केवळ दिवे लावू नका, तर माणसेही जोडूया. केवळ अंधार दूर करू नका, तर कोणाच्या आयुष्यात प्रकाश बनून जाऊया.


06th November, 08:35 pm
दिवा फक्त घरात नको, मनातही हवा!

दिवाळी आली की घराघरांत दिवे लागतात, अंगणात रांगोळ्या उमटतात, आकाशकंदिलांच्या प्रकाशाने रस्ते उजळतात, फराळाचा सुगंध घरभर दरवळतो, चेहऱ्यांवर आनंद दिसतो, शुभेच्छांची देवाणघेवाण होते. काही क्षणांसाठी का होईना, माणूस आपल्या रोजच्या धावपळीतून बाहेर पडतो. पण या सगळ्या प्रकाशाच्या उत्सवात एक प्रश्न मनाला विचारावासा वाटतो... आपण घरात हजारो दिवे लावतो, पण आपल्या मनातील अंधार दूर करण्यासाठी एखादा दिवा लावतो का?

दिवाळी म्हणजे केवळ अमावस्येच्या रात्रीला उजळवणारा प्रकाश नव्हे. दिवाळी म्हणजे निराशेच्या काळोखात आशेची एक छोटीशी ज्योत पेटवण्याचे धैर्य कारण अंधार हा नेहमी बाहेरच असतो असे नाही. कधी तो एखाद्याच्या डोळ्यांत असतो, कधी एखाद्याच्या परिस्थितीत, तर कधी आपल्या विचारांतही असतो. आपण लक्ष्मीपूजन करतो, धनाची पूजा करतो, घरात सुखसमृद्धी यावी म्हणून प्रार्थना करतो. पण कधी त्या लक्ष्मीच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या गरिबाच्या रिकाम्या हातांकडे पाहतो का? आपल्या घरात फराळाचे ताट भरलेले असताना शेजारच्या घरात चुलीनेही पेट घेतलेला नसेल, तर आपल्या सणाच्या आनंदाला काहीतरी अपूर्णता आहे, असे वाटत नाही का? खरा सण तोच ज्यात आपल्या आनंदाचा थोडासा वाटा दुसऱ्याच्या आयुष्यातही पोहोचतो.

आज माणसाकडे प्रकाश देणारी साधने खूप आहेत. पण दुसऱ्याच्या आयुष्यात प्रकाश बनून जाणारी माणसे कमी होत चालली आहेत. मोबाईलच्या पडद्यावर आपण जगभरातील आनंद पाहतो, पण आपल्या घरातील माणसाच्या चेहऱ्यावरचे दुःख वाचायला विसरतो. हजारो लोकांना शुभेच्छा पाठवतो, पण घरातल्या एखाद्या व्यक्तीला दोन प्रेमाचे शब्द बोलायला वेळ काढत नाही. मग ही दिवाळी नेमकी कोणासाठी? दिवा स्वतः जळतो आणि दुसऱ्याला प्रकाश देतो. त्याच्या वाट्याला अंधार नसतो असे नाही, पण तो अंधाराला शरण जात नाही. माणसाचेही तसेच असावे. आयुष्यात कितीही संकटे आली, अपयश आले, अपेक्षाभंग झाला, तरी स्वतःतील आशेची ज्योत विझू देऊ नये कारण परिस्थिती कितीही कठीण असली तरी प्रयत्न करण्याची इच्छा जिवंत असेल तर नव्या पहाटेची शक्यता कायम असते.

आपण नरकासुराचे दहन करतो. पण आपल्या मनातील अहंकार, मत्सर, द्वेष, राग आणि स्वार्थ या नरकासुरांचे काय? दरवर्षी पुतळा जाळून आपण वाईटाचा अंत साजरा करतो, पण आपल्या वागण्यातून एखाद्याचे मन दुखावणे, कोणाला कमी लेखणे, दुसऱ्याच्या यशाचा मत्सर करणे हे थांबवतो का? खऱ्या अर्थाने नरकासुराचा वध तेव्हाच होईल जेव्हा माणूस स्वतःमधील वाईट प्रवृत्तींवर विजय मिळवेल. दिवाळीच्या निमित्ताने घराची स्वच्छता करताना मनातील कटुता, गैरसमज आणि जुन्या दुःखांचीही स्वच्छता करायला हवी. एखाद्याशी बोलणे बंद केले असेल, तर संवादाची एक छोटीशी सुरुवात करावी. कोणाच्या डोळ्यांत अश्रू असतील, तर ते पुसण्याचा प्रयत्न करावा. एखादा माणूस एकटाच संघर्ष करत असेल, तर त्याच्या पाठीवर विश्वासाचा हात ठेवावा कारण कधी कधी एखाद्याला दिलेला आधार हा हजारो दिव्यांपेक्षाही अधिक प्रकाश देऊन जातो.

मला वाटते, दिवाळीच्या प्रत्येक दिव्याने आपल्याला एक प्रश्न विचारायला हवा की आज मी कोणाच्या आयुष्यात थोडासा आनंद निर्माण केला? आज मी कोणाचे दुःख हलके केले? आज मी माणूस म्हणून थोडा अधिक चांगला झालो का?

दिवाळी वर्षातून एकदाच येते, पण माणुसकीचा उत्सव रोज साजरा करता येतो. त्यासाठी महागडे कपडे, मोठी सजावट किंवा हजारो रुपयांचे फटाके लागत नाहीत. लागते फक्त संवेदनशील मन, मदतीसाठी पुढे येणारे हात आणि दुसऱ्याचे दुःख समजून घेणारे हृदय.

शेवटी एवढेच म्हणेन... घराच्या उंबरठ्यावर लावलेला दिवा काही तासांनी विझेल, आकाशकंदील उतरवला जाईल, रांगोळी पुसली जाईल, फराळही संपेल, पण या दिवाळीत आपण एखाद्याच्या मनात आशेचा दिवा लावला असेल, एखाद्याच्या आयुष्यात आनंदाची छोटीशी जागा निर्माण केली असेल, तर त्या प्रकाशाला कधीच अमावस्या येणार नाही कारण घर उजळवणारा दिवा आपल्याला दिसतो, पण माणसाचे आयुष्य उजळवणारा माणूस इतिहास घडवतो.

चला तर मग, या दिवाळीत केवळ दिवे लावू नका, तर माणसेही जोडूया. केवळ अंधार दूर करू नका, तर कोणाच्या आयुष्यात प्रकाश बनून जाऊया कारण खरी दिवाळी आकाशात नाही, ती माणसाच्या मनात उजाडली पाहिजे.


- वर्धा विलास हरमलकर

भांडोळ