माझं म्हणणं चुकीचं असूच शकत नाही."
"मला कोणी शिकवण्याची गरज नाही."
आपल्या आजूबाजूला कोणी असे उद्गार काढले तर आपण सहजपणे त्या व्यक्तीला अहंकारी ठरवून मोकळे होतो. पण मानसशास्त्राच्या दृष्टिकोनातून अहंकाराकडे पाहिलं, तर त्यामागे केवळ स्वतःला श्रेष्ठ समजण्याची भावना नसते! मग, अहंकार नेमका कोण? मानसशास्त्रात 'Ego' ही संकल्पना सिग्मंड फ्रॉइडच्या अभ्यासात दिसून येते. हा व्यक्तीच्या मनातील वास्तवाशी जुळवून घेणारा भाग. तो आपल्या इच्छा, नैतिक अपेक्षा आणि बाह्य वास्तव यांच्यात समतोल साधण्याचा प्रयत्न करतो. या प्रक्रियेत Ego विविध Defence Mechanisms म्हणजेच मानसिक संरक्षण यंत्रणांचा वापर करतो. उदाहरणार्थ, एखाद्याने आपल्यावर टीका केली आणि ती स्वीकारणं आपल्याला कठीण गेलं, तर आपण लगेच समोरच्याचीच चूक काढू पाहतो. आपलं मन स्वतःला होणारा भावनिक त्रास कमी करण्यासाठी हे करत असतं. पण आपल्या प्रत्येक अहंकारी वर्तनामागे Defence Mechanism असतोच असं नाही.
मग अहंकार विकसित होतो तरी कसा?
लहानपणापासून आपल्याला स्वतःची ओळख तयार करावी लागते. आपलं अस्तित्व, आपल्याला मिळणारं प्रेम, आपुलकी आणि सुरक्षितता या सगळ्यांचा त्यात मोठा वाटा असतो. ज्या व्यक्तीचे सतत इतरांशी तुलनात्मक मूल्यमापन होतं, ज्याला चूक करण्याची मुभा नसते, ज्याचं कौतुक केवळ यश मिळाल्यावर होतं किंवा ज्याच्या भावना वारंवार नाकारल्या जातात, त्याच्या मनात स्वतःची प्रतिमा टिकवून ठेवण्याची तीव्र गरज निर्माण होऊ शकते. आता ही गरज पूर्ण करण्यासाठी विविध नात्यांतून अहंकार कसा डोकावतो ते पाहू...
१. पालक आणि मुलांच्या नात्यात...
"मी तुझ्यापेक्षा जास्त जग पाहिलं आहे."
"मी सांगतेय तसंच व्हायला हवं !"
पालकांचं अनुभवविश्व आणि मुलांचं बदलतं वास्तव यांच्यात संघर्ष होणं स्वाभाविक आहे. परंतु जेव्हा पालकांना मुलांचं स्वतंत्र मत म्हणजे स्वतःच्या अधिकाराला दिलेलं आव्हान वाटू लागतं, तेव्हा तिथे अहंकार डोकावू लागतो. मुलांनी वेगळा करिअर पर्याय निवडणं, जोडीदार निवडणं किंवा स्वतःच्या आयुष्याचे निर्णय घेणं पालकांना कधी कधी स्वतःच्या अपयशासारखं वाटू शकतं. दुसरीकडे, पालकांचं म्हणणं ऐकून घेणं म्हणजे जुनाट विचार स्वीकारणं, अशी मुलांची समजूत होऊ शकते.
२. पती - पत्नीच्या नात्यात...
प्रेमाच्या नात्यात अहंकार सर्वाधिक सूक्ष्म पद्धतीने काम करत असतो. जसं की, भांडण झाल्यावर कोण आधी फोन करणार? माफी कोण मागणार? कोण आधी संवाद सुरू करणार? कोण जास्त झुकतंय? ह्यात त्या दोन व्यक्तींमध्ये प्रेम कमी झालेलं नसतं, पण "मीच का प्रत्येक वेळी समजून घ्यायचं?" या प्रश्नामागे कदाचित वर्षानुवर्षांचा भावनिक थकवा असतो. तर कधी हाच प्रश्न स्वतःचा हट्ट कायम ठेवण्याचं साधन बनतो. अशावेळी आपल्याला समजून घ्यावं ही अपेक्षा योग्य आहे पण समजून घेण्याची जबाबदारी केवळ समोरच्याचीच आहे, असं मानणं हा अहंकार आहे.
३. सासर आणि माहेरच्या नात्यांमध्ये...
इथे अहंकार अनेकदा अधिकार, परंपरा, प्रतिष्ठा आणि अपेक्षांच्या रूपात दिसतो.
"आमच्या घरात असंच चालतं.""माझ्या मुलावर आता माझा अधिकार राहिलाच नाही."
कधी सासरच्या मंडळींना नवीन व्यक्तीचं स्वतंत्र अस्तित्व स्वीकारणं कठीण जातं. कधी सुनेला किंवा जावयाला प्रत्येक सूचना ही स्वतःच्या स्वाभिमानावर केलेली टीका वाटते. तर कधी माहेर आणि सासर यांच्यातील तुलना नात्यांमध्ये अनावश्यक स्पर्धा निर्माण करते. अशा नात्यांमध्ये आपलं स्थान सिद्ध करण्याची गरज तेव्हाच निर्माण होते, जेव्हा आपण समोरच्याला आपल्या बरोबरीने स्वतंत्र व्यक्ती म्हणून स्वीकारू शकत नाही. नातं टिकवण्यासाठी कोणाचं स्थान मोठं किंवा लहान असण्याची गरज नसते. परस्परांचा सन्मान असणं पुरेसं असतं.
४. ऑफिस आणि व्यावसायिक नात्यांमध्ये...
एखाद्या वरिष्ठाला कनिष्ठ कर्मचाऱ्याची चांगली कल्पना स्वीकारणं कठीण जातं. कारण त्याला ती स्वतःच्या अधिकाराला किंवा क्षमतेला दिलेली स्पर्धा वाटते. तर काही कर्मचारी चुका मान्य करत नाहीत, तर काही जण फीडबॅक म्हणजे वैयक्तिक टीका समजतात.
मग अहंकार नेहमीच वाईट असतो का?
नाही! अहंकाराचा सकारात्मक पैलू तेव्हा दिसतो, जेव्हा तो आपल्याला स्वतःची ओळख, आत्मविश्वास आणि स्वायत्तता जपण्यास मदत करतो. पण तोच अहंकार जेव्हा आपल्याला चूक स्वीकारू देत नाही, माफी मागू देत नाही किंवा दुसऱ्याच्या भावना समजून घेऊ देत नाही, तेव्हा तो नात्यांसाठी अडथळा बनतो.
मग अहंकाराला हाताळायचं कसं?
एखाद्याने आपल्याशी असहमती दर्शवली, तर आपल्याला लगेच राग का येतो? टीका ऐकल्यावर आपण बचावात्मक का होतो? माफी मागताना आपल्याला कमीपणा का वाटतो? हे प्रश्न स्वतःला विचारणं प्रथम प्राधान्य होय. स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी उभारलेली ही भिंत आपण इतकी उंच तर करत नाही ना, की तिच्यापलीकडे उभ्या असलेल्या आपल्याच माणसांचं प्रेम, आपुलकी आणि समजूतदारपणाही आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही?



