लागली विल्हेवाट मनुष्याला,
हरवली माणुसकी विकृतीला!
बदलती पिढी संस्कृतीकडे
चालली आहे की विकृतीकडे,
हाच प्रश्न आज सगळीकडे
खरोखरच कधी माणसाला प्रश्न पडला आहे का की, आपण जे काही करतो, ती संस्कृती आहे की विकृती?
सणासुदीच्या नावाखाली संस्कृतीच्या बदल्यात विकृतीलाच समाजात मान मिळत आहे. आधुनिक जगाच्या नावाखाली आज आपले मुख्य सण हरवत चालले आहेत. नव्या पिढ्या विकृतीकडे वळताना दिसत आहेत. नरकासुराच्या नावावर सगळीकडे पसरलेला कल्लोळ ही आपली संस्कृती आहे का?
दिवाळी हा एक पवित्र सण आहे. या सणामध्ये सत्याचा विजय झाला आणि असत्याचा नाश झाला. श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला. मात्र, संस्कृती चेंगरून विकृतीच्या सान्निध्यात हरवून गेलेली दिसत आहे. पवित्र अशा दिव्य सणाची सुरुवात अभ्यंगस्नानाने करण्याऐवजी निद्रावस्थेत होताना दिसते.
दिवाळीत सकाळी होणारी आंघोळ ही अभ्यंगस्नान म्हणून ओळखली जाते. या दिवसाचे नियोजन फराळ आणि दिव्यांच्या रोषणाईप्रमाणेच केले जाते. अभ्यंगस्नानामध्ये अंगाला कोमट तिळाचे तेल लावले जाते आणि त्यानंतर तेलावर उटणे लावून आंघोळ केली जाते. वर्षभर तुम्ही किती वाजता उठता, हे महत्त्वाचे नाही; तर या दिवशीच्या अभ्यंगस्नानाला पुराणकाळापासून विशेष महत्त्व आहे. सत्याचा विजय आणि असत्याचा नाश अशा पवित्र भावनेशी जोडलेल्या या सणाला कुठेतरी विकृतीकडे जाणारी नागमोडी वाट मिळाली आहे आणि त्यात आपला समाजही वाहवत गेला आहे. विकृतीमुळे समाजातील संस्कृती कुठेतरी हरवून गेलेली दिसत आहे.
आपण नरकासुर का करतो? नरकासुराचा वध श्रीकृष्णाने कशासाठी केला? अशा अनेक कथा आहेत; पण लोकांना त्यांची जाणीवच नाही. तसेच हा सण आपण का साजरा करतो, हेही अनेकांना माहीत नाही.
खरे म्हणजे दिवाळी हा सत्याच्या विजयाची सुरुवात दर्शवणारा सण आहे. श्रीकृष्ण संपूर्ण रात्र नरकासुराशी झुंज देत होता. पहाटेची वेळ झाली आणि पहाटे-पहाटे असत्याच्या मार्गावर असलेल्या नरकासुराचा वध करून श्रीकृष्णाचे शरीर रक्ताने पूर्णपणे माखले गेले. तसेच शरीरावर काही ठिकाणी ओरखडेही उठले होते. श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला, म्हणजेच असत्याचा नाश केला. तेव्हाच सत्याचा विजय झाला, म्हणून दिवाळी हा सण साजरा केला जातो.
आयुष्याची तिथेच नवी ज्योत पेटते. म्हणूनच दिवाळीच्या दिवशी घरांचे दरवाजे पहाटे उघडे ठेवून दिवे लावले जातात आणि सत्याच्या विजयाचा उत्साह साजरा केला जातो. असत्याचा पराभव करून नरकासुराचे प्रतीक म्हणून कारीट चिरडले जाते. ही संस्कृती माहीत नसताना आताची पिढी नरकासुराच्या निमित्ताने आपली तरुणाई डीजेच्या तालावर मद्यपान करून झिंगताना, मारामारी करून स्वतःमधील असुराचे प्रदर्शन करताना दिसते.
हेच का आपले संस्कृती जपण्याचे मार्ग? अभ्यंगस्नानाच्या आदल्या रात्री दोन-तीन वाजेपर्यंत जागरण करून पहाटे चार वाजता उठण्याची अपेक्षा करणेच चुकीचे नाही का?
खरीच आपली ही संस्कृती आहे का?
पहाटे-पहाटे होणाऱ्या सत्याच्या विजयाचा उत्सव साजरा करण्याऐवजी नरकासुराचा वध करून मंडळी उत्साह साजरा न करता घरी झोपायला जातात. हा सण आनंदाचा आणि उत्साहाचा आहे. यामध्ये सकाळी लवकर उठून आपण दिवे लावून सत्याचा विजय साजरा करायला हवा. आपण सात्त्विक भावनेतून आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून सण साजरे करू शकत नाही का? माझा नरकासुराला विरोध नाहीच; पण त्यानिमित्ताने व्यक्त होणाऱ्या प्रवृत्तीला विरोध आहे.
वाचकहो, आपण बदलणार कधी? विकृतीने संस्कृतीला संपविण्यापूर्वी, विकृतीने आपल्याला गिळण्यापूर्वी वेळीच सावध व्हा!



