वास्को : ओमानच्या किनारपट्टीजवळ होर्मुझच्या सामुद्रधुनीत ‘तारा गॅस’ या एलपीजीवाहू टँकरवर १७ नोव्हेंबरला झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यातून सडा-वास्को येथील दिलेश चंद्रकांत तेली याने प्रसंगावधान राखत आपला जीव वाचवला. टँकरच्या इंजिनरूममध्ये अडकलेल्या दिलेशने केरळमधील सहकाऱ्यासह समुद्रात उडी घेतली. लाईफ जॅकेट नसतानाही त्याने पोहत किनारा गाठला. मात्र, आगीत होरपळल्याने त्याच्यावर ओमानमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
टँकरवर क्षेपणास्त्र हल्ला झाल्यानंतर जहाजाला भीषण आग लागली. यावेळी ट्रेनी इंजिनीअर म्हणून काम करणारा दिलेश आणि त्याचा केरळमधील सहकारी इंजिनरूममध्ये अडकले. धूर आणि आगीच्या विळख्यातून बाहेर पडण्यासाठी त्यांनी दरवाजे उघडण्याचा प्रयत्न केला. अखेर एक दरवाजा उघडण्यात त्यांना यश आले. मात्र, जहाजाला आगीने वेढल्याने त्यांनी समुद्रात उडी घेण्याचा निर्णय घेतला.
दोघांनीही लाईफ जॅकेटशिवाय समुद्रात उड्या घेतल्या. काही अंतर पोहल्यानंतर दिलेशचा सहकारी बुडू लागला. त्याला वाचवण्याचा दिलेशने प्रयत्न केला. मात्र सहकाऱ्याचा बेल्टही हातातून निसटल्याने तो पाण्यात बेपत्ता झाला. स्वतः होरपळलेला असतानाही दिलेशने पोहत किनारा गाठला.
२४ भारतीय खलाशी सुखरूप; एक बेपत्ता
या टँकरवर २५ खलाशी आणि अधिकारी होते. त्यापैकी २४ जण भारतीय होते. हल्ल्यानंतर जहाज निकामी झाले आणि इंजिनरूमला आग लागल्याने सर्वांना जहाज सोडावे लागले. या घटनेत २४ जण सुखरूप असून, त्यात दोन जखमींचा समावेश आहे. एक भारतीय कर्मचारी अद्याप बेपत्ता आहे. त्याचा शोध घेण्यासाठी केंद्र सरकार जहाज व्यवस्थापन कंपनी आणि प्रादेशिक बचाव प्राधिकरणाशी समन्वय साधत आहे.
दिलेशला गोव्यात आणण्यासाठी प्रयत्न
दिलेशला गोव्यात आणण्यासाठी त्याचे वडील चंद्रकांत तेली यांनी गुरुवारी कृषिमंत्री संकल्प आमोणकर यांची भेट घेतली. मंत्री आमोणकर यांनी गोवा एनआरआय आयुक्त नरेंद्र सावईकर यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर दिलेशला गोव्यात परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.


