पैंगीण : आगामी जनगणना २०२७ मध्ये नागरिकांचा जास्तीत जास्त सहभाग सुनिश्चित करण्यासाठी काणकोण नगरपालिकेने (Canacona Muncipality) पुढाकार घेतला आहे. जनगणनेत नागरिकांना स्वतःच्या मोबाईल फोनवरूनच माहिती नोंदवता यावी, यासाठी काणकोण नगरपालिका सभागृहात विशेष जनजागृती सत्राचे आयोजन करण्यात आले. या सत्रात स्वयं-गणनेची प्रक्रिया समजावून सांगण्यासोबतच प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे प्रशिक्षण देण्यात आले.
या सत्रात क्षेत्र प्रशिक्षक विहार व्ही. एन. देसाई यांनी स्वयं-गणनेचे महत्त्व, तिची कार्यपद्धती आणि फायदे यांविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. देशाची लोकसंख्या, सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती यांची अधिकृत आकडेवारी संकलित करण्यासाठी जनगणना महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले. जनगणना प्रक्रिया यशस्वी होण्यासाठी प्रत्येक नागरिकाचा सहभाग आणि अचूक माहितीची नोंद आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
स्वयं-गणना सुविधेमुळे नागरिकांना मोबाईल फोनचा वापर करून स्वतःची आवश्यक माहिती ऑनलाईन भरता येणार आहे. त्यामुळे पारंपरिक माहिती संकलन पद्धतीसोबतच नागरिकांना जनगणना प्रक्रियेत थेट सहभागी होता येईल. ही प्रक्रिया पूर्ण करताना प्रत्येक टप्पा समजून घेणे आणि अचूक तपशील नोंदवणे महत्त्वाचे असल्याचे प्रशिक्षकांनी नमूद केले.
जनजागृती सत्रानंतर उपस्थितांना मोबाईलवर स्वयं-गणना प्रक्रिया कशी सुरू करावी, आवश्यक माहिती कशी भरावी आणि नोंदणी कशी पूर्ण करावी, याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. सहभागी नागरिकांना स्वतःच्या मोबाईलवर ही प्रक्रिया करून पाहण्याची संधीही देण्यात आली. प्रत्येक टप्प्यावर प्रशिक्षकांनी मार्गदर्शन करून त्यांना स्वयं-गणना स्वतंत्रपणे करण्यासाठी प्रोत्साहित केले.


