म्हादई अभयारण्यात पट्टेरी वाघाचा गाईवर हल्ला; घटना सीसीटीव्हीत कैद

म्हादई अभयारण्य व सुर्ला परिसरात नर वाघाचे फोटो आणि पुरावे मिळाल्याचा दावा राजेंद्र केरकर यांनी केला आहे. गोव्यातील वाघांच्या संवर्धनासाठी राज्य सरकार व वन खात्याने तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी त्यांनी केली.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
19th November, 05:53 pm
म्हादई अभयारण्यात पट्टेरी वाघाचा गाईवर हल्ला; घटना सीसीटीव्हीत कैद

पणजी:  म्हादई अभयारण्य आणि परिसरात पुन्हा एकदा वाघाचा संचार झाल्याचे स्पष्ट करणारे ठोस पुरावे समोर आले असून, गोव्यातील वाघांच्या सुरक्षिततेसाठी आणि संवर्धनासाठी वन खात्याने व राज्य सरकारने तातडीने पावले उचलावीत, अशी जोरदार मागणी ज्येष्ठ पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर यांनी केली आहे. बुधवारी म्हादई अभयारण्य व लगतच्या भागात वाघाच्या अस्तित्वाचे पुरावे आणि फोटो उपलब्ध झाल्याचे त्यांनी नमूद केले असून, गाईवरील हल्ल्याच्या घटनेनंतर वाघाच्या वावरावर शिक्कामोर्तब झाल्याचे त्यांनी सांगितले.




हे जंगल वाघांसाठी पूर्वीपासूनच परिचित आणि प्रसिद्ध आहे. बुधवारी या परिसरात भेट दिल्यानंतर वाघाचे अस्तित्व अधोरेखित करणारे फोटो व पुरावे हाती आल्याचे केरकर यांनी स्पष्ट केले. या छायाचित्रांवरून म्हादई अभयारण्यात पुन्हा एकदा नर वाघ आल्याचे स्पष्ट होते. या वाघाचे रक्षण आणि संवर्धन व्हावे, या उद्देशाने पत्रकार परिषद आयोजित केल्याचे सांगत, गोवा सरकारने योग्य आणि ठोस पावले उचलल्यास वाघांचे प्रभावी संवर्धन होऊ शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.



मागील कालावधीतील नोंदींचा संदर्भ देताना राजेंद्र केरकर यांनी सांगितले की, २००९ ते २०१९ या कालावधीत जवळपास पाच वाघ आढळले होते, तर २०२६ मध्ये पुन्हा एक वाघ मिळाला आहे. अशा प्रकारे २००९ ते २०२६ या कालावधीत एकूण सहा वाघांची नोंद झाल्याचे त्यांनी अधोरेखित केले. वाघांचे संरक्षण आणि संवर्धन करणे ही केवळ केंद्र सरकारचीच नव्हे, तर राज्य सरकारचीही नैतिक जबाबदारी आहे; मात्र राज्य सरकार ही जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.



सत्तरी तालुक्यातील सुर्ला व चरावणे परिसरात वाघाच्या अस्तित्वाचे पुरावे यापूर्वीही सादर केल्याची आठवण करून देत केरकर यांनी सांगितले की, म्हादई अभयारण्यालगतच्या सुर्ला भागात तसेच सुर्ला व कळसा एकत्र येणाऱ्या पट्ट्यात अधिकृत पुरावे मिळाले आहेत. याआधी पगमार्क किंवा वाघाच्या वावराचे इतर पुरावे मिळाले असले, तरी फोटोग्राफिक पुरावा केवळ सुर्ला भागातून प्राप्त झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे राज्य सरकारने व वन खात्याने आपली जबाबदारी ओळखून वाघांच्या संरक्षणासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

हेही वाचा
सर्व पहा