मुख्यमंत्र्यांसह सात आमदार सुरक्षित

‘प्रुडंट मीडिया’चा सर्व्हे : १७ आमदार असुरक्षित, १४ जणांची स्थिती समसमान

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
19th November, 11:38 pm
मुख्यमंत्र्यांसह सात आमदार सुरक्षित

विधानसभा निवडणुका जवळ आल्याच्या पार्श्वभूमीवर ‘प्रुडंट मीडिया’ने ‘तुमचा आमदार किती सुरक्षित?’ तसेच गोव्यातील जनतेचा कल जाणून घेण्यासाठी सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणानुसार सध्याच्या आमदारांपैकी मुख्यमंत्र्यांसह केवळ सात आमदार सुरक्षित असून, १७ आमदार असुरक्षित, तर १४ आमदारांची स्थिती समसमान (५०-५०) आहे. दरम्यान, फोंड्याचे आमदार रवी नाईक आणि ताळगावच्या आमदार जेनिफर मोन्सेरात हे सध्या हयात नाहीत.

गोवा विधानसभेचा कार्यकाळ येत्या मार्च महिन्यात संपणार असून, जानेवारीत निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. निवडणुका जवळ आल्याने कोण जिंकणार, कोण हरणार आणि कोणाची स्थिती किती सुरक्षित आहे, याबाबत अंदाज व तर्कवितर्क लावण्यास सुरुवात झाली आहे. राजकीय पक्ष तसेच इच्छुकांनी निवडणुकीची तयारी सुरू केली असून, उद्घाटनांचे कार्यक्रम आणि योजनांच्या अंमलबजावणीच्या माध्यमातून सत्ताधारी भाजपने प्रचार सुरू केला आहे. प्रत्येक मतदारसंघातील लोकांचा कल काय आहे, याचा अभ्यास करून हे सर्वेक्षण जाहीर करण्यात आले आहे.

‘प्रुडंट मीडिया’च्या सर्वेक्षणानुसार सुरक्षित गटातील सात आमदारांपैकी सहा आमदार भाजपचे, तर एक आमदार मगो पक्षाचा आहे. काँग्रेस, आरजी, गोवा फॉरवर्ड आणि तीन अपक्ष आमदारांपैकी एकही आमदार सुरक्षित गटात नाही. ताळगावच्या आमदार जेनिफर मोन्सेरात हयात नाहीत; मात्र त्यांचा समावेश सुरक्षित आमदारांच्या यादीत असल्याचे सर्वेक्षणात नमूद केले आहे.

सुरक्षित आमदार
  • रोहन खंवटे (भाजप) – पर्वरी
  • बाबूश मोन्सेरात (भाजप) – पणजी
  • डॉ. प्रमोद सावंत (भाजप) – साखळी
  • डॉ. देविया राणे (भाजप) – पर्ये
  • विश्वजीत राणे (भाजप) – वाळपई
  • सुदिन ढवळीकर (मगो) – मडकई
  • दिगंबर कामत (भाजप) – मडगाव

असुरक्षित गटात सत्ताधारी, विरोधकांचा समावेश

सर्वेक्षणानुसार असुरक्षित असलेल्या १७ आमदारांमध्ये भाजपचे १२, काँग्रेसचा एक, आरजीचा एक आणि आपचा एक आमदार आहे. याशिवाय डॉ. चंद्रकांत शेट्ये (डिचोली) आणि आंतोन वाझ (कुठ्ठाळी) हे दोन अपक्ष आमदारही या गटात आहेत. रवी नाईक (भाजप) हयात नसून, त्यांचाही समावेश असुरक्षित आमदारांच्या यादीत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

असुरक्षित आमदार
  • प्रवीण आर्लेकर (भाजप) – पेडणे
  • डॉ. चंद्रकांत शेट्ये (अपक्ष) – डिचोली
  • नीळकंठ हळर्णकर (भाजप) – थिवी
  • जोशुआ डिसोझा (भाजप) – म्हापसा
  • रुडॉल्फ फर्नांडिस (भाजप) – सांताक्रूझ
  • वीरेश बोरकर (आरजी) – सांत आंद्रे
  • राजेश फळदेसाई (भाजप) – कुंभारजुवे
  • सुभाष शिरोडकर (भाजप) – शिरोडा
  • संकल्प आमोणकर (भाजप) – मुरगाव
  • आंतोन वाझ (अपक्ष) – कुठ्ठाळी
  • आलेक्स सिक्वेरा (भाजप) – नुवे
  • उल्हास तुयेकर (भाजप) – नावेली
  • क्रुझ सिल्वा (आप) – वेळ्ळी
  • अल्टोन डिकोस्ता (काँग्रेस) – केपे
  • गणेश गावकर (भाजप) – सावर्डे
  • रमेश तवडकर (भाजप) – काणकोण
  • केदार नाईक (भाजप) – साळगाव

विजय, पराभवाच्या सीमेवर १४ आमदारांची कसोटी

विधानसभेतील १४ आमदारांची स्थिती समसमान (५०-५०) असल्याचे सर्वेक्षणात म्हटले आहे. म्हणजेच हे आमदार सुरक्षितही नाहीत आणि असुरक्षितही नाहीत; ते विजय आणि पराभवाच्या सीमेवर आहेत. या गटात भाजपचे आठ, काँग्रेसचे दोन, मगोचा एक, गोवा फॉरवर्ड आणि आपचा प्रत्येकी एक आमदार असून, अपक्ष आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांची स्थितीही ५०-५० आहे.

जय-विजयाच्या सीमारेषेवर
  • जीत आरोलकर (मगो) – मांद्रे
  • डिलायला लोबो (भाजप) – शिवोली
  • प्रेमेंद्र शेट (भाजप) – मये
  • गोविंद गावडे (भाजप) – प्रियोळ
  • कृष्णा साळकर (भाजप) – वास्को
  • मॉविन गुदिन्हो (भाजप) – दाबोळी
  • आलेक्स रेजिनाल्ड (अपक्ष) – कुडतरी
  • विजय सरदेसाई (गोवा फॉरवर्ड) – फातोर्डा
  • वेंझी व्हिएगस (आप) – बाणावली
  • युरी आलेमाव (काँग्रेस) – कुंकळ्ळी
  • नीलेश काब्राल (भाजप) – कुडचडे
  • रमेश तवडकर (भाजप) – काणकोण
  • मायकल लोबो (भाजप) – कळंगुट
  • कार्लुस फेरेरा (काँग्रेस) – हळदोणा
टीप : सुरक्षित, असुरक्षित आणि ५०-५० अशी वर्गवारी ‘प्रुडंट मीडिया’च्या सर्वेक्षणानुसार देण्यात आली आहे.
हेही वाचा
सर्व पहा