पणजी : येथे ११ ऑक्टोबर रोजी पार पडलेल्या सीजेपीच्या आंदोलनादरम्यान धार्मिक भावना दुखावणारी आणि सामाजिक सलोखा बिघडवणारी घोषणाबाजी केल्याप्रकरणी पणजी पोलिसांनी कायदेशीर पावले उचलली आहेत. या मोर्च्यात 'हिंदुवाद मुर्दाबाद'च्या आक्षेपार्ह घोषणा देणाऱ्या एका महिलेची ओळख व्हायरल झालेल्या एका व्हिडिओ फुटेजच्या आधारे पोलिसांनी पटवली. या प्रकरणी भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या (BNSS) कलम ३५ अंतर्गत रीतसर नोटीस बजावून संबंधित महिलेला येत्या २३ ऑक्टोबर रोजी पणजी पोलीस ठाण्यात चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी आणि मतदार यादीतील कथित त्रुटींवर प्रकाश टाकण्यासाठी हे आंदोलन आयोजित करण्यात आले होते. उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी या मोर्च्याला स्पष्टपणे परवानगी नाकारलेली असतानाही हा जमाव जमला होता. आंदोलनादरम्यान काही तरुण मुलींनी 'हिंदुवाद मुर्दाबाद'सारख्या वादग्रस्त घोषणा दिल्या. या घोषणांचे व्हिडिओ सोशल मीडियावर तीव्र वेगाने व्हायरल झाल्यानंतर राजकीय आणि सामाजिक वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. विविध राजकीय पक्ष आणि संघटनांनी या प्रकाराबद्दल तीव्र संताप व्यक्त करत संबंधितांवर तातडीने कायदेशीर कारवाई करण्याची मागणी पोलीस प्रशासनाकडे केली होती.
पणजी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजयकुमार चोडणकर यांनी दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, या प्रकरणी सुमारे ३०० अज्ञात आंदोलकांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम १९६ आणि २९९ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या घटनेची अत्यंत गंभीर दखल घेत गोव्यातील शांतता, तसेच धार्मिक व सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोणालाही पाठिशी घातले जाणार नाही आणि त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा सज्जड इशारा दिला आहे. पोलिसांकडून सध्या उपलब्ध व्हिडिओ फुटेजचे सखोल विश्लेषण करून इतर आंदोलकांची ओळख पटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
दुसरीकडे, या संपूर्ण प्रकरणाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सीजेपी-गोवातर्फे गुरुवारी, १५ ऑक्टोबर रोजी अधिकृत स्पष्टीकरण जारी करण्यात आले. कोणत्याही धर्माच्या भावना दुखावणारी किंवा कोणाचाही अनादर करणारी वक्तव्ये आणि घोषणांचे पक्ष कधीही समर्थन करत नाही, असे सीजेपीने इन्स्टाग्रामवरील निवेदनात स्पष्ट केले. पक्ष सर्व धर्म, जाती आणि समुदायांचा आदर करतो. हा मोर्चा केवळ निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता आणि लोकशाही मूल्यांच्या जपणुकीसाठी होता. नागरिकांनी या लोकशाही लढ्याला कोणत्याही धार्मिक वादाशी जोडू नये, असे आवाहन करत पक्षाने आपण संवैधानिक मूल्यांसाठी वचनबद्ध असल्याचे म्हटले आहे.


