रॅलीचे अपयश लपवण्यासाठी काँग्रेसकडून आरोप: मंत्री दिगंबर कामत

काँग्रेसची रॅली अपयशी ठरल्याच्या नैराश्यातूनच आपल्यावर खोटे आरोप केले जात असल्याचे पीडब्ल्यूडी मंत्री दिगंबर कामत यांनी स्पष्ट केले असून, मडगावमधील एकाही मैदानाची मालकी आपल्याकडे नसल्याचा पुनरुच्चार केला.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
27 mins ago
रॅलीचे अपयश लपवण्यासाठी काँग्रेसकडून आरोप: मंत्री दिगंबर कामत

मडगाव : काँग्रेस पक्षाचा एवढा मोठा राष्ट्रीय नेता गोव्यात येत असतानाही स्थानिक काँग्रेस नेत्यांना त्यांची सभा एका छोट्या पार्किंग परिसरात घ्यावी लागणे, ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आणि काँग्रेसची खरी शोकांतिका आहे. ही सभा आणि रॅली नियोजनबद्ध पद्धतीने आयोजित करण्यात काँग्रेसला पूर्णपणे अपयश आले आहे. स्वतःचे हेच अपयश झाकण्यासाठी आणि रॅली रद्द झाल्याच्या नैराश्यातून काँग्रेस नेते आपल्यावर बिनबुडाचे आरोप करत आहेत. हे सर्व आरोप पूर्णपणे खोटे असून या प्रकरणात आपला कोणताही हात नाही, असे सडेतोड स्पष्टीकरण सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री दिगंबर कामत यांनी दिले आहे. मडगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर देताना कामत बोलत होते.



मडगावमधील मैदानांच्या मालकी हक्काबाबत वस्तुस्थिती मांडताना मंत्री कामत म्हणाले की, मडगाव क्रिकेट क्लबकडे एमसीसी मैदान, कोस्टा अँड कंपनीकडे कोस्टा मैदान आणि लोहिया मैदान हे मडगाव नगरपालिकेच्या ताब्यात आहे. मडगाव शहरातील एकाही मैदानाची वैयक्तिक मालकी आपल्याकडे नाही. प्रत्येक सार्वजनिक किंवा खाजगी जागेच्या बुकिंगसाठी एक ठराविक कायदेशीर प्रक्रिया असते, ज्यामध्ये आधी रीतसर अर्ज करावा लागतो. 'प्रथम येणाऱ्यास प्राधान्य' या तत्त्वानुसार पैसे भरून जागेचे बुकिंग निश्चित केले जाते. यापूर्वी स्वतः सांस्कृतिक आणि फूड फेस्टिव्हल आयोजित करताना कोस्टा कंपनीकडून ना-हरकत दाखला न मिळाल्याने तो कार्यक्रम एससीसीच्या मैदानावर हलवावा लागल्याची आठवण त्यांनी करून दिली.

आपण सर्वजण लोकशाहीत राहत असून राजकीय सभेत अडथळे आणण्याचे किंवा कोणाला रोखण्याचे काम आपण याआधी कधीही केले नाही आणि यापुढेही करणार नाही, असे कामत यांनी स्पष्ट केले. काँग्रेसच्या रॅलीला लोकांनी न येण्याबाबत आपण लोकांना धमकावल्याचा आरोप केला जात आहे, परंतु जर आपण लोकांना धमकावत असतो तर मडगावच्या जनतेने इतकी वर्षे सतत आपल्याला निवडून दिले नसते, असा टोला त्यांनी लगावला. स्वतःचे अपयश लपवण्यासाठी दुसऱ्यांवर आरोप करणे, अपयश आल्यास आपापसात भांडणे लावणे आणि मूळ विषयाला भलतीकडेच वळवणे ही काँग्रेसची जुनीच नीती आहे. अॅनाफोंत गार्डन येथून होणारी काँग्रेसची रॅली नेमकी का अपयशी ठरली, याचे उत्तर काँग्रेसने स्वतः शोधले पाहिजे.

या पत्रकार परिषदेत कामत यांनी मडगाव पालिकेच्या एका माजी नगराध्यक्षावरही कडक शब्दांत निशाणा साधला. मडगाव पालिकेत नगराध्यक्ष राहिलेल्या एका व्यक्तीकडून विनाकारण प्रसिद्धीसाठी आपल्यावर आरोप केले जात आहेत. त्या माजी नगराध्यक्षांच्या कारभाराच्या सुरस कथा अजूनही मडगावात चर्चिल्या जातात. त्यामुळे त्यांनी आपल्यावर भाष्य करताना विचारपूर्वक आणि सांभाळून बोलावे, असा इशाराही मंत्री दिगंबर कामत यांनी दिला.

हेही वाचा
सर्व पहा