पणजी :मगो-भाजप युतीबाबत सध्या चर्चा सुरू असून, या युतीसंदर्भातील अंतिम निर्णय भाजपचे केंद्रीय नेतेच घेतील, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले. दुसरीकडे, मगोचे नेते दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांच्याशी चर्चा करणार आहेत. त्यानंतर भाजपच्या स्थानिक नेत्यांशी बोलणी होतील, अशी माहिती मंत्री आणि मगोचे आमदार सुदिन ढवळीकर यांनी दिली.
विधानसभा निवडणुका जवळ येत असल्याने राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काँग्रेस, आरजी आणि गोवा फॉरवर्ड यांच्यात आघाडी करण्याच्या दृष्टीनेही हालचाली सुरू आहेत. सध्या राज्यात भाजप-मगो युतीचे सरकार सत्तेवर आहे.
सोमवारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत दोन्ही पक्षांमध्ये युतीसंदर्भात चर्चा झाली. या बैठकीला मगोचे अध्यक्ष दीपक ढवळीकर आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक उपस्थित होते.
मतदारसंघांवरून बैठकीत मतभेद
या बैठकीत मगोने शिरोडा, फोंडा आणि मडकई यांसह अन्य मतदारसंघांवर दावा केला. मात्र, हे मतदारसंघ सोडण्यास भाजपने नकार दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे बैठकीत कोणताही ठोस निर्णय होऊ शकला नाही.
युतीबाबत मुख्यमंत्र्यांना विश्वास
मगो पक्षासोबत भाजपची युती कायम असून, मगो सरकारमध्ये सहभागी आहे. २०२७ च्या विधानसभा निवडणुकीतही दोन्ही पक्षांची युती होईल आणि ही युती बहुमताने सत्तेवर येईल, असा विश्वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला. मगोच्या नेत्यांसोबत युतीबाबत चर्चा सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
काय म्हणाले सुदिन ढवळीकर?
१) युतीसंदर्भात दिल्लीत भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा केली जाईल. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांच्याशी बोलणी होईल.
२) युतीबाबतचा निर्णय केंद्रीय पातळीवर झाल्यानंतर भाजपच्या स्थानिक नेत्यांशी चर्चा केली जाईल. जागावाटपात किती मतदारसंघांची मागणी करायची आणि अन्य कोणत्या अटी मांडायच्या, यावर मगोमध्ये आधी विचारविनिमय होईल.
३) यासाठी पक्षाच्या अनेक बैठका घेतल्या जातील. त्यानंतर दिल्लीतील नेत्यांशी चर्चा केली जाईल.
मगोचा जनसंपर्क अन् सर्वेक्षण
भाजपसोबत युती होणार असली, तरी मगो हा स्वतंत्र पक्ष असल्याने सर्व मतदारसंघांत पक्षाचा जनसंपर्क आणि काम सुरू आहे. फोंडा, मडकई, शिरोडा आणि डिचोली या मतदारसंघांत मगोची स्थिती मजबूत असल्याचा दावा पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी केला.
पक्षाची सद्यस्थिती आणि मतदारांचा प्रतिसाद जाणून घेण्यासाठी सर्वेक्षण सुरू असल्याचेही दीपक ढवळीकर यांनी सांगितले.
भाजपसमोर जागावाटपाचा तिढा
मडकई आणि मांद्रे मतदारसंघ वगळता मगोने दावा केलेल्या इतर मतदारसंघांत भाजपचे आमदार आहेत. त्यामुळे विद्यमान आमदार असलेले मतदारसंघ मगोला सोडण्यास भाजप तयार नसल्याचे समजते.
दोन्ही पक्षांचे नेते युती होणार असल्याचे सांगत असले, तरी जागावाटपाचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. केंद्रीय नेतृत्वाशी होणाऱ्या चर्चेत या मुद्द्यावर काय तोडगा निघतो, याकडे लक्ष लागले आहे.
सात मतदारसंघांवर मगोचा दावा
मगोने सात विधानसभा मतदारसंघांवर दावा केला आहे. त्यामध्ये मडकई, फोंडा, शिरोडा, प्रियोळ, डिचोली, मांद्रे आणि पेडणे या मतदारसंघांचा समावेश आहे.
मडकईमधून मगोचे सुदिन ढवळीकर, तर मांद्रेमधून जीत आरोलकर आमदार आहेत. शिरोडा, प्रियोळ आणि पेडणे येथे भाजपचे आमदार आहेत. डिचोलीचे अपक्ष आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मडकई मतदारसंघात भाजपकडे उमेदवार नसल्याने ही जागा मगोला सोडण्याची तयारी भाजप दाखवत असल्याचे समजते. मात्र, इतर मतदारसंघांतील विद्यमान आमदारांच्या जागा सोडण्यास भाजप तयार नसल्याने जागावाटपाचा प्रश्न अधिक गुंतागुंतीचा होण्याची शक्यता आहे.


