पणजी : देशातील अन्य राज्यांच्या तुलनेत गोव्यात कामाच्या ठिकाणी जाण्या-येण्यासाठी होणारा प्रवास खर्च अधिक असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. गोव्यात हा खर्च मासिक सरासरी १,८७४ रुपये असून, या बाबतीत गोव्याचा देशात दुसरा क्रमांक आहे. देशाची राष्ट्रीय सरासरी ७८५ रुपये आहे. केंद्रीय सांख्यिकी खात्याच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे.
केंद्रीय सांख्यिकी खात्याने १५ वर्षांवरील व्यक्तींसाठी देशभरातील सुमारे ४.९१ लाख कुटुंबांचे सर्वेक्षण केले. यामध्ये गोव्यातील शहरी आणि ग्रामीण भागांतील ८०० कुटुंबांचा समावेश होता. या अभ्यासानुसार, गोव्यात ग्रामीण भागातील व्यक्तींचा कामावर जाण्या-येण्याचा मासिक प्रवास खर्च शहरी भागापेक्षा अधिक आहे. ग्रामीण भागात हा खर्च २,०९८ रुपये, तर शहरी भागात १,७४८ रुपये आहे.
सर्वाधिक प्रवास खर्च असलेल्या राज्यांमध्ये अरुणाचल प्रदेश प्रथम स्थानी असून, तेथील मासिक खर्च २,१६५ रुपये आहे. त्यानंतर गोव्याचा क्रमांक लागतो. गोव्यानंतर मिझोराममध्ये १,५०७ रुपये, केरळमध्ये १,४१५ रुपये, सिक्कीममध्ये १,३७७ रुपये आणि हरियाणामध्ये १,२१२ रुपये मासिक प्रवास खर्च आहे. मध्य प्रदेशात हा खर्च सर्वांत कमी म्हणजेच ४२८ रुपये आहे. केंद्रशासित प्रदेशांमध्ये दिल्लीतील मासिक प्रवास खर्च २,०३८ रुपये, तर चंदीगडमधील खर्च ५९६ रुपये आहे.
देशभरात कामावर जाण्या-येण्यासाठी प्रामुख्याने दुचाकीचा वापर केला जातो. याची राष्ट्रीय सरासरी ४१.५ टक्के आहे. गोव्यात मात्र तब्बल ७८ टक्के लोक कामावर जाण्यासाठी दुचाकी वापरतात. हे प्रमाण देशात सर्वाधिक असल्याचे अहवालात नमूद केले आहे.
याशिवाय, गोव्यातील १२.२ टक्के लोक कामासाठी कारचा वापर करतात. देशात कार वापरणाऱ्यांची राष्ट्रीय सरासरी केवळ १.६ टक्के आहे. देशभरात पायी प्रवास करणाऱ्यांचे प्रमाण ३१.२ टक्के, सायकल वापरणाऱ्यांचे १५.६ टक्के, ऑटो रिक्षा वापरणाऱ्यांचे ४.७ टक्के, तर बसने प्रवास करणाऱ्यांचे प्रमाण ४.४ टक्के आहे.
राज्यात प्रवासासाठी वापरले जाणारे वाहन
| वाहनाचा प्रकार | प्रमाण (टक्के) |
|---|---|
| दुचाकी | ७८ |
| चारचाकी | १२.२ |
| पायी | १.७ |
| बस | ८.५ |
| ऑटो रिक्षा | ०.३ |


