प्रथमदर्शी व्यक्तीने भांडण थांबविले असते तर संजयचा वाचला असता जीव

सीसीटीव्ही फुटेजवरून नागरिकांचा तर्क

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
25th October, 11:56 pm
प्रथमदर्शी व्यक्तीने भांडण थांबविले असते तर संजयचा वाचला असता जीव

काणकोण : लोलये येथील चिकन विक्री केंद्रावर संजय नाईक यांचा झालेला खून प्रत्यक्षदर्शी व्यक्तींनी वेळीच सतर्कता दाखवली असती, तर टाळता आला असता, अशा प्रतिक्रिया आता समोर येऊ लागल्या आहेत.

संजय नाईक आणि संशयित एडवर्ड यांच्यात चिकन विक्री केंद्रावर भांडण सुरू असताना एका प्रत्यक्षदर्शी व्यक्तीने हा प्रकार पाहिला होता. मात्र, संबंधित व्यक्तीने भांडणात हस्तक्षेप केला नाही. त्यावेळी हस्तक्षेप करून दोघांमधील वाद मिटवला असता, तर संजय यांचा जीव वाचू शकला असता, अशी चर्चा सुरू आहे. त्यामुळे भांडणाच्या वेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या सर्व प्रत्यक्षदर्शींची पोलिसांनी चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.

दरम्यान, या प्रकरणातील प्रत्यक्षदर्शी अनिल नाईक आणि उमेश नाईक या दोघा बंधूंचे जबाब काणकोण पोलिसांनी नोंदवून घेतले आहेत. संशयित आरोपी एडवर्ड याची प्रकृती बिघडल्याने त्याच्यावर मडगाव येथील जिल्हा इस्पितळात उपचार सुरू होते. मात्र, तेथील डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याला पुढील उपचारांसाठी अन्यत्र हलविण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपअधीक्षक निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक तेर्रान डिकॉस्टा करत आहेत.

हेही वाचा
सर्व पहा