मडगाव : राय येथील सांतेमळ परिसरात कथित बेकायदेशीरपणे गोमांसापासून तुपासारखा पदार्थ तयार करणाऱ्या कारखान्यावर दक्षिण गोवा जिल्हा प्राणी क्रूरता प्रतिबंधक सोसायटी (डीएसपीसीए) आणि मायणा-कुडतरी पोलिसांनी संयुक्त छापा टाकला. या कारवाईत सुमारे १०० किलो गोमांस आणि मांसाच्या चरबीपासून तयार केलेल्या तुपासारख्या पदार्थाचे ३० डबे जप्त करण्यात आले. जागेचा मालक हैदर बेपारी याला पोलिसांनी प्रतिबंधात्मक अटक केली.
सासष्टीतील बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी हा प्रकार उघडकीस आणल्यानंतर कारवाई करण्यात आली. छाप्यावेळी गोमांसापासून चरबी काढण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे आढळले. तयार केलेला पदार्थ डब्यांमध्ये साठवून ठेवण्यात आला होता.
हैदर बेपारी यांच्या या कथित बेकायदा कत्तलखान्यावर आणि गोदामावर यापूर्वी दोनदा कारवाई करण्यात आली होती. त्यानंतरही हा प्रकार सुरू असल्याने सखोल चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी केली.
जप्त पदार्थांची निर्मिती, साठवणूक आणि संभाव्य वापराबाबत अन्न व औषध प्रशासनाकडून चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली. अन्न व औषध प्रशासनाने गोमांस आणि तुपासारख्या पदार्थाचे डबे ताब्यात घेतले असून मायणा-कुडतरी पोलीस पुढील चौकशी करीत आहेत.


