पेडणे : मोरजी येथील ग्रीनव्ह्यू गेस्ट हाऊसमधून २२२.९२ ग्रॅम कोकेन जप्त केल्याप्रकरणी मांद्रे पोलिसांनी एका महिलेसह नायजेरियन नागरिकाला अटक केली आहे. यापूर्वी दोन सेनेगाली नागरिकांना अटक करण्यात आली होती. त्यामुळे या प्रकरणातील अटकेतील संशयितांची संख्या चार झाली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, २२ ऑगस्ट रोजी मांद्रे पोलीस आणि फॉरेनर्स रिजनल रजिस्ट्रेशन ऑफिसच्या संयुक्त पथकाने ग्रीनव्ह्यू गेस्ट हाऊसच्या खोलीची तपासणी केली होती. यावेळी बौबा सांबा (३१) आणि अलीऊ मुस्तफा (३१) या सेनेगाली नागरिकांकडून कोकेन जप्त करण्यात आले. त्याची किंमत २२.२९ लाख रुपये असून, १०.८५ लाखांची रोकड आणि अन्य साहित्यही जप्त करण्यात आले. एकूण मुद्देमालाची किंमत सुमारे ३३.१४ लाख रुपये आहे.
चौकशीदरम्यान अमली पदार्थांच्या कथित व्यवहारातून मिळालेली रक्कम विविध बँक खात्यांत जात होती आणि या रकमेचा पुढे अमली पदार्थांच्या व्यवहारासाठी वापर होत असल्याचा संशय पोलिसांना आला. त्यानुसार या आर्थिक व्यवहारांप्रकरणी हळदोणा-नाचनोळा येथील एव्हिली जॉन परेरा (३२) हिला अटक करण्यात आली.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक गिरेंद्र नाईक आणि पोलीस उपनिरीक्षक परेश काळे करीत असून, उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता (आयपीएस) आणि पेडणेचे उपविभागीय पोलीस अधिकारी आशीष शिरोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई सुरू आहे.
दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेशात तपास
तपासाची व्याप्ती गोव्याबाहेर वाढवत मांद्रे पोलिसांचे पथक दिल्ली, हरियाणा आणि उत्तर प्रदेश येथे पाठविण्यात आले. या तपासात विल्यम उगोचुक्वू इझुचुक्वू या नायजेरियन नागरिकाला उत्तर प्रदेशातील सूरजपूर येथून ताब्यात घेऊन २३ ऑक्टोबर रोजी मांद्रे पोलीस स्थानकात आणून अटक करण्यात आली. या प्रकरणी अमली पदार्थविरोधी कायदा १९८५च्या कलम २१(क) आणि २९ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.


