अल्पवयीन मुलीच्या लैंगिक छळप्रकरणी ५१ वर्षीय संशयिताला अटक

मडगाव न्यायालयाकडून १० दिवसांची न्यायालयीन कोठडी

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
27th October, 11:51 pm
अल्पवयीन मुलीच्या लैंगिक छळप्रकरणी ५१ वर्षीय संशयिताला अटक

मडगाव : १३ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून लैंगिक छळ करणे, तिचा वारंवार पाठलाग करणे आणि धमकावल्याच्या आरोपावरून फातोर्डा पोलिसांनी मोहम्मद झियाउल शेख (५१, रा. चंद्रावाडा, फातोर्डा) याला अटक केली आहे. संशयिताला मडगाव येथील न्यायालयात हजर केले असता, त्याला १० दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ ऑक्टोबर रोजी सकाळी ७.३०च्या सुमारास चंद्रावाडा येथे ही घटना घडली. संशयिताने मुलीचा विनयभंग करून तिचा लैंगिक छळ केल्याचा आरोप आहे. त्यानंतर त्याने दुचाकीवरून तिचा पाठलाग केला. तसेच, तिला हॉटेलमध्ये येण्यासाठी दबाव आणून शाळेच्या बसथांब्यावर धमकावल्याचे तक्रारीत नमूद आहे. मुलीच्या घराचा दरवाजा वारंवार ठोठावून घरात प्रवेश करण्याचाही प्रयत्न केल्याचा आरोप संशयितावर आहे.

पीडित मुलीचा जबाब नोंदवून तिची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी संशयिताला अटक केली. वैद्यकीय तपासणीनंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. दक्षिण गोवा पोलीस अधीक्षक आणि मडगाव उपअधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली फातोर्डा पोलीस निरीक्षकांच्या देखरेखीखाली ही कारवाई करण्यात आली. उपनिरीक्षक रामराय नाईक, हेड कॉन्स्टेबल रोहन नाईक आणि कॉन्स्टेबल अनुप कावरेकर यांच्या पथकाने कारवाईत सहभाग घेतला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुखदा प्रभुदेसाई करत आहेत.
पोक्सोसह विविध कलमांखाली गुन्हा दाखल

पीडित मुलीच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीवरून फातोर्डा पोलिसांनी गुन्हा नोंद केला. याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम ७४, ७५, ७८ व १२६(२), पोक्सो कायद्याच्या कलम ८ व १२ आणि गोवा बाल कायद्याच्या कलम ८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा
सर्व पहा