पणजी : समाज कार्यकर्ते रामा काणकोणकर यांच्यावरील प्राणघातक हल्ला प्रकरणातील उर्वरित पाच संशयितांना मेरशी येथील सत्र न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. मनीष हडफडकर, अँथनी नदार, फ्रान्सिस नदार, मिंगेल आरावजो आणि फ्रांको डिकॉस्टा अशी त्यांची नावे आहेत. प्रत्येकी एक लाख रुपये आणि इतर अटींवर हा जामीन मंजूर करण्यात आला. न्यायमूर्ती विजया आंब्रे यांनी हा आदेश दिला.या प्रकरणात पोलिसांनी काणकोणकर यांचा जबाब नोंद केला असता, त्याला मारहाण करताना हल्लेखोरांनी ‘गावडा’ आणि ‘राखणदार’ म्हणून हिणवण्याचा प्रयत्न केला, असा दावा त्यांनी केला. त्यानुसार, या गुन्ह्यात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याची कलमेही जोडण्यात आली होती.
पोलिसांनी आरोपपत्र दाखल केल्यानंतर न्यायालयाने संशयितांविरोधात आरोप निश्चित करण्याचा आदेश दिला होता. या प्रकरणातील जेनिटो कार्दोज, सुरेश नाईक आणि साईराज गोवेकर यांना यापूर्वीच जामीन मंजूर झाला होता. या तिघांना मिळालेल्या जामिनाचा आधार घेत उर्वरित मनीष हडफडकर, अँथनी नदार, फ्रान्सिस नदार, मिंगेल आरावजो आणि फ्रांको डिकॉस्टा या पाच संशयितांनी जामिनासाठी अर्ज केला होता. त्याची दखल घेऊन सुनावणीनंतर न्यायालयाने त्यांनाही प्रत्येकी १ लाख रुपये व इतर अटींवर सशर्त जामीन मंजूर केला. त्यामुळे या प्रकरणातील सर्व आठ संशयितांना जामीन मिळाला आहे.
करंझाळे येथे झाला होता हल्ला
करंझाळे येथे १८ सप्टेंबर २०२५ रोजी रामा काणकोणकर यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता. या प्रकरणी पणजी पोलिसांनी गुन्हा दाखल करून मुख्य संशयित जेनिटो कार्दोज याच्यासह अँथनी नदार, फ्रान्सिस नदार, मिंगेल आरावजो, मनीष हडफडकर, सुरेश नाईक, फ्रांको डिकॉस्टा व साईराज गोवेकर या आठ जणांना अटक केली होती.


