पणजी : माझे घर योजनाच भाजपला विजयी करेल. काँग्रेसकडे लक्ष न देता येत्या ११० दिवसात भाजप कार्यकर्त्यांनी समर्पितपणे कार्य केल्यास येत्या निवडणुकीत भाजपचा विजय निश्चित आहे. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला घाबरण्याचे कोणतेही कारण नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Chief Minister Dr. Pramod Sawant) यांनी भाजप कार्यकारिणीला संबोधित करताना केले.
भारतीय जनता पक्षाची (Bharatiya Janta Party BJP)) राज्य कार्यकारिणी बैठक मंगळवारी सकाळी सुरू झाली. प्रदेश भाजप अध्यक्ष दामू नाईक यांचे अध्यक्षीय भाषण झाले. यानंतर डॉ. प्रमोद सावंत सरकारचे अभिनंदन करणारा ठराव संमत झाला. दुपारी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांच्या आगमनानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे भाषण झाले.
काही वर्षांपूर्वी गोव्यात काँग्रेसचे (Congress Party) डबल इंजिन सरकार होते. काँग्रेस डबल इंजिन सरकारच्या काळात राज्याला केवळ अडीच हजार कोटींचा निधी मिळाला होता. भाजपच्या डबल इंजिन सरकारच्या काळात राज्याला २५ हजार कोटींचा निधी मिळाला आहे. कर्मचारी भरती आयोगामार्फत सरकारी नोकर भरतीत पारदर्शकपणा आलेला आहे. माझे घर योजना तसेच विविध कल्याणकारी योजनामुळे अंत्योदत तत्वावर विकास होत आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
उमेदवार नव्हे, कमळ पाहून काम करा
आगामी निवडणुकीत उमेदवार कोण आहे हे न पाहता कार्यकर्त्यांनी कमळ पाहून काम करावे. राज्यात भाजपचे ४.५ लाख सदस्य आहेत. आपआपसातील भांडणे व हेवेदावे विसरून प्रत्येकाने कार्य केल्यास येत्या निवडणुकीत भाजपला निश्चितपणे बहुमत मिळेल, असा विश्वास प्रदेश भाजप अध्यक्ष दामू नाईक यांनी व्यक्त केला.


