पणजी : पत्रादेवी आणि मोले येथील अबकारी खात्याच्या नाक्यांवर भ्रष्टाचार प्रतिबंधक पथकाने अचानक छापे टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईदरम्यान दोन्ही नाक्यांवरून एकूण १३ हजार ७० रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली असून, संबंधित कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू आहे.
सध्या देशभरात २६ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत 'दक्षता जागरूकता सप्ताह २०२६' साजरा केला जात आहे. याचाच एक भाग म्हणून ही कारवाई करण्यात आली. एसीबीचे अधीक्षक राजन निगळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली. मोले येथील अबकारी नाक्यावर निरीक्षक सतीश गावडे यांनी, तर पत्रादेवी येथील अबकारी नाक्यावर निरीक्षक प्रज्योत फडते यांनी आपल्या पथकासह ही अचानक धडक दिली.
या अचानक केलेल्या तपासणीमध्ये मोले अबकारी नाक्यावर १०,५७० रुपये, तर पत्रादेवी नाक्यावर २,५०० रुपये रोख रक्कम सापडली. या प्रकरणी घटनास्थळी उपस्थित असलेल्या संबंधित कर्मचाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले असून, एसीबीकडून चौकशी सुरू आहे.


