‘येंडू गुंडू’ संबोधत मुख्यमंत्र्यांकडून कन्नड भाषेचा अपमान; माफी मागावी : काँग्रेस

भाषेेवरील वक्तव्यावरून घेरले; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कन्नड भाषेबाबत केलेल्या ‘येंडू गुंडू’ वक्तव्यावरून कुठ्ठाळीतील काँग्रेस नेते महेश नडार यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यामुळे कन्नड भाषेचा अपमान झाल्याचा दावा करत, झुआरीनगरमधील रहिवाशांची माफी मागण्याची मागणी त्यांनी केली आहे.

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
35 mins ago
‘येंडू गुंडू’ संबोधत मुख्यमंत्र्यांकडून कन्नड भाषेचा अपमान; माफी मागावी : काँग्रेस

 वास्को : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कन्नड भाषेबाबत केलेल्या ‘येंडू गुंडू’ वक्तव्यावरून कुठ्ठाळीतील काँग्रेस नेते महेश नडार यांनी  त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यामुळे कन्नड भाषेचा अपमान झाल्याचा दावा करत, झुआरीनगरमधील रहिवाशांची माफी मागण्याची मागणी त्यांनी केली आहे.

कुठ्ठाळी भाजपमध्येही कन्नड भाषिक सदस्य आहेत. त्यामुळे या सदस्यांनी मुख्यमंत्र्यांच्या वतीने झुआरीनगरमधील कन्नड भाषिक रहिवाशांची माफी मागावी, असे आवाहन महेश नडार यांनी केले.

कन्नड ही लाखो लोकांची मातृभाषा असून, भाषेचा आदर राखणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. सार्वजनिक पदावर असलेल्या व्यक्तींनी भाषेबाबत वक्तव्य करताना अधिक संवेदनशीलता दाखवली पाहिजे, असे नडार म्हणाले. मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यामुळे कन्नड भाषिकांच्या भावना दुखावल्या गेल्याचा दावा करत, भाजपने या प्रकरणी आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

 झुआरी नगरचे ‘गार्बेज’ नगर

महेश नडार म्हणाले की, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत झुआरीनगर येथे उद्घाटनाच्या कार्यक्रमाला आले असता; त्यांनी ‘येंडू गुंडू’ असा उल्लेख करीत कन्नड भाषेचा अपमान केला. यापूर्वी निवडणूक प्रचारासाठी कर्नाटकात गेले असता, मुख्यमंत्री कन्नड भाषेत बोलले होते व कन्नड भाषा आपल्याला समजते. मात्र, बोलता येत नसल्याचे म्हणाले होते. मात्र, झुआरीनगर येथे येऊन त्यांनी कन्नड भाषेवर बोलत त्यांनी या भाषेचा अपमान केला.

मला वाटले होते ते झुआरीनगर येथे येऊन येथील समस्यांवर भाष्य करणार, झुआरी नगरचे ‘गार्बेज’ नगर झाले त्याच्यावर भाष्य करणार. मात्र, त्यांनी हे सर्व टाळून कन्नड भाषेवर बोलत तिचा अपमान केला. मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी अशी आपली मागणी असल्याचे महेश नडार म्हणाले. 

हेही वाचा
सर्व पहा