लंडन येथील इसमाला एएनसीने केली होती अटक
गोवन वार्ता
प्रतिनिधी
म्हापसा : अमली पदार्थ विरोधी पोलिसांनी (एएनसी) (Anti Narcotic cell ANC) ड्रग्ज प्रकरणी अटक केलेल्या ५५ वर्षीय ब्रिटीश नागरिकाने पोलीस कोठडीत गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. जॉन पार्किन्सन (रा. सध्या शिवोली व मूळ लंडन, यूके) असे या संशयित आरोपीचे नाव आहे.
हणजूण येथे गेल्या २१ ऑक्टोबर रोजी अमली पदार्थ विरोधी पोलिसांनी विदेशी नागरिकाला अटक केली होती. त्यानंतर संशयिताला पर्वरी पोलीस (Porvorim Police) कोठडीत ठेवण्यात आले होते. तिथे संशयिताने अंगावरील शर्टचा वापर करून गळफास लावण्याचा प्रयत्न केला.
मात्र, कोठडीच्या बाहेर गस्तीवर असलेल्या पोलिसांना हा प्रकार निदर्शनास येताच लगेच संशयिताला वाचवले. त्याला आत्महत्या करण्यापासून रोखण्यात आले. संशयितावर गोमेकॉत उपचार करण्यात आल्यानंतर पुन्हा त्याची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे.
दरम्यान, संशयिताकडून पोलीस कोठडीत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस येताच एएनसी तसेच पर्वरी पोलिसांची धावपळ उडाली. पोलिसांनी वेळीच संशयिताला वाचवल्याने संबंधित पोलिसांवरील कारवाईचा बडगा टळला आहे.
दरम्यान, संशयित जॉन याच्याकडून सुमारे ३ लाख रूपये किंमतीचा विविध प्रकारचा ड्रग्ज जप्त करण्यात आला होता. यामध्ये हायड्रोपोनिक गांजा, केटामाइन, एलएसडी मेथाम्फेटामाइन या ड्रग्जचा समावेश आहे. शिवाय पोलिसांनी संशयिताकडील पेडणे नोंदणीकृत दुचाकी, रोख रक्कम व मोबाईल फोनही हस्तगत केला होता.


