पणजी : ऑनलाईन गुंतवणुकीच्या आमिषाने २७ लाख ५४ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गोवा सायबर गुन्हे शखेच्या (Cyber Crime Police Station-Goa Police) पोलिसांनी महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर येथून रमेश राजाराम वरुडे (वय ४७) या संशयिताला अटक केली आहे.
या प्रकरणात पोलिसांनी १२ लाख ६१ हजार ३३० रुपये गोठवून सुरक्षित केले असून, ही रक्कम पीडितेला परत मिळवून देण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. याप्रकरणी जोकीम कॉलिन यांच्या तक्रारीवरून गोवा सायबर गुन्हे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता. ऑनलाईन गुंतवणूक करण्याच्या बहाण्याने २७.५४ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद केले होते.
तपासादरम्यान पोलिसांनी आर्थिक व्यवहारांचा मागोवा घेतला. त्यातून उल्हासनगर, ठाणे, महाराष्ट्र येथील रमेश राजाराम वरुडे याचे नाव समोर आले. फसवणुकीच्या व्यवहारांतून त्याला आठ लाख रुपये मिळाल्याचे तपासात निष्पन्न झाले.
त्यानंतर गोवा सायबर गुन्हे पोलिसांचे विशेष पथक महाराष्ट्रात रवाना झाले. तपासातून मिळालेल्या महत्त्वपूर्ण माहितीच्या आधारे संशयिताचा शोध घेऊन त्याला अटक करण्यात आली. पुढील तपासासाठी त्याला गोव्यात आणण्यात आले आहे. या कारवाईदरम्यान फसवणुकीशी संबंधित १२,६१,३३० रुपये गोठवण्यात पोलिसांना यश आले.
ही रक्कम पीडितेला देण्यात येणार आहे. पोलीस निरीक्षक सुजय कोरगावकर, उपनिरीक्षक खुशाली नाईक, हवालदार विराज नार्वेकर, हवालदार करोल शेख आणि पोलीस कॉन्स्टेबल लक्ष्मण च्यारी यांच्या पथकाने ही कारवाई केली.
सायबर गुन्हे शाखेचे अधीक्षक जीवबा दळवी आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्रीदेवी बी. व्ही. यांच्या देखरेखीखाली तपास सुरू आहे. गोव्याचे पोलीस उपमहानिरीक्षक वेद प्रकाश सूर्या यांच्या मार्गदर्शनामुळे आंतरराज्यीय समन्वय आणि सायबर गुन्ह्यांच्या तपासाला बळ मिळाल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.


