कारवार : गोव्यातून कारवारमार्गे कर्नाटकाच्या किनारपट्टीकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाच्या असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ ला जोडणाऱ्या अंकोला येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५२ वरील बाळेगुळी क्रॉस ते मास्तिकट्टा दरम्यानच्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. काही महिन्यांपूर्वी दुरुस्ती करूनही रस्ता पुन्हा खराब झाल्याने वाहनचालक आणि नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याच्या मागणीसाठी जनशक्ती वेदिका, जिल्हा ट्रक मालक संघटना आणि स्थानिक नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी खड्ड्यांत प्रतीकात्मक पिंडदान करून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा निषेध करण्यात आला.
जनशक्ती वेदिकेचे जिल्हाध्यक्ष माधव नायक म्हणाले की, रस्त्याच्या दुरुस्तीला मंजुरी मिळाल्याचे सांगितले जात असले, तरी अद्याप कामाचा आदेश जारी झालेला नाही. केवळ मंजुरीने नागरिकांच्या समस्या सुटणार नाहीत. प्रत्यक्ष काम तातडीने सुरू करून गुणवत्तापूर्ण दुरुस्ती करावी आणि कामावर अधिकाऱ्यांनी देखरेख ठेवावी, अशी मागणी त्यांनी केली.
काँग्रेस नेते गोपाळकृष्ण नायक यांनी हे पक्षविरहित आंदोलन असल्याचे सांगितले. खराब रस्त्यामुळे दुचाकीस्वार आणि रिक्षाचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. वाहनांच्या दुरुस्तीचा खर्च वाढत असून, रिक्षाचालकांच्या व्यवसायावरही परिणाम होत आहे. त्यामुळे आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या स्थानिक नागरिकांवर अतिरिक्त भार पडत असल्याचे त्यांनी नमूद केले.
रस्त्याच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधण्यासाठी जिल्हा राज्योत्सव पुरस्कारप्राप्त शिवानंद नायक, सुरेश वेर्णेकर आणि अन्य मान्यवरांनी गाण्यांच्या माध्यमातून निषेध नोंदवला. यावेळी जि.पं.चे माजी सदस्य जी. एम. शेट्टी, जिल्हा ट्रक मालक संघटनेचे अध्यक्ष गणपती मुलेमने, भाजप नेते भास्कर नार्वेकर, उद्योजक तुळशीदास कामत, वकील उमेश नायक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
अधिकाऱ्यांना धरले धारेवर
रस्त्याच्या दुरुस्तीला मंजुरी मिळण्यास होत असलेल्या विलंबाबाबत लोकप्रतिनिधींना माहिती दिली आहे का, असा सवाल गोपाळकृष्ण नायक यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता पी. राजेंद्र यांना केला. यावर राजेंद्र यांनी नकारार्थी उत्तर दिल्याने नायक संतप्त झाले. त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत त्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले. उपस्थित नागरिकांनीही महामार्ग प्राधिकरणाच्या निष्क्रियतेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.


