मुख्यमंत्र्यांच्या ‘येंडू गुंडू’ वक्तव्यावरून कुठ्ठाळीत भाजप-काँग्रेसमध्ये कलगीतुरा

मारियानो रॉड्रिग्ज यांच्या वक्तव्यानंतर भाजपची टीका

Story: गोवन वार्ता । प्रतिनिधी |
26th October, 11:19 pm
मुख्यमंत्र्यांच्या ‘येंडू गुंडू’ वक्तव्यावरून कुठ्ठाळीत भाजप-काँग्रेसमध्ये कलगीतुरा

वास्को : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या ‘येंडू गुंडू’ या वक्तव्यावरून कुठ्ठाळी विधानसभा मतदारसंघात भाजप आणि काँग्रेस पदाधिकाऱ्यांमध्ये जोरदार कलगीतुरा रंगला असून, दोन्ही पक्षांकडून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्यात येत आहेत. काँग्रेसचे स्थानिक नेते मारियानो रॉड्रिग्ज यांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केल्यानंतर, भाजप कुठ्ठाळी मंडलाने प्रतिवार करत रॉड्रिग्ज यांच्या राजकीय इतिहासाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
काही दिवसांपूर्वी ‘गोंय राखोण यात्रे’प्रसंगी कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार झुआरीनगर येथील जाहीर सभेला आले होते. त्यांनी त्या सभेत कानडी व इंग्रजी भाषेत भाषण केले होते. यावर प्रतिक्रिया देताना, कुठ्ठाळी येथील भाजप कार्यालय उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी, येथे कोणी ‘येंडू गुंडू’ केले, म्हणून त्यांना मते मिळणार नाहीत, असा टोला डी. के. शिवकुमार यांना लगावला होता.
मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्याचा निषेध करताना काँग्रेस नेते मारियानो रॉड्रिग्ज यांनी, गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी इतरांचा सन्मान करण्याची गरज असल्याचे म्हटले होते. मुख्यमंत्र्यांनी आपल्याला कानडी मते नको आहेत, असे जाहीर करावे, असे आव्हान त्यांनी दिले. तसेच, कुठ्ठाळी मतदारसंघात गेल्या १० वर्षांत कोणताही विकास झालेला नाही, असा दावा करत त्यांनी झुआरीनगर येथील मार्केट संकुल ढासळत असल्याचे निदर्शनास आणले. तसेच डी. के. शिवकुमार यांनी कर्नाटकात विकास केल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी त्याचा आढावा घ्यावा, असे म्हटले होते.
या सर्व वादावर प्रत्युत्तर देताना कुठ्ठाळीचे भाजप प्रभारी दीपक नाईक म्हणाले की, संबंधित व्यक्तीने मुख्यमंत्र्यांना दिलेले आव्हान योग्य नसून, त्या व्यक्तीची सखोल चौकशी करून कारवाई करण्यात यावी. गेल्या दशकात मतदारसंघात झालेल्या विकासाचा लेखाजोखा त्यांनी मांडला.
तसेच जिल्हा पंचायत सदस्य सुनील गावस यांनी मारियानो रॉड्रिग्ज यांच्यावर गंभीर आरोप केले. संबंधित व्यक्तीने मुख्यमंत्र्यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याचा निषेध करत, माजी जिल्हा पंचायत सदस्य आणि माजी पंच असलेल्या त्या व्यक्तीने आपल्या कार्यकाळात कोणता विकास केला, हे सांगावे, असे आव्हान त्यांनी दिले. त्या व्यक्तीविरोधात कानडी लोकांना मारहाण केल्याप्रकरणी तब्बल ११ गुन्हे दाखल असल्याचे गावस यांनी नमूद केले. तसेच, डी. के. शिवकुमार हे नुकतेच जूनमध्ये मुख्यमंत्री झाले असून, अवघ्या तीन महिन्यांत त्यांनी कोणता विकास केला, हा एक विनोदच असल्याचे ते म्हणाले.
जयंत जाधवांचा टोला
या वादात भाजप प्रवक्ते जयंत जाधव यांनीही उडी घेत रॉड्रिग्ज यांच्या वक्तव्याची खिल्ली उडवली. नवी दिल्ली येथील एका आंदोलनादरम्यान राहुल गांधी यांनी डी. के. शिवकुमार यांची कॉलर मागे खेचल्याची आठवण त्यांनी करून दिली. तसेच, डी. के. शिवकुमार गोव्यात आले खरे, पण त्यांनी म्हादई प्रश्नावर चकार शब्दही काढला नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.    

हेही वाचा
सर्व पहा