मडगाव : रस्ते अपघातात डावा हात गमावलेल्या २० वर्षीय युवकाला दक्षिण गोवा मोटर अपघात दावा न्यायाधिकरणाने (Motor Accident Claims Tribunal, South Goa) ४३ लाख २३ हजार ५६० रुपयांची भरपाई मंजूर केली आहे. न्यायाधिकरणाचे सदस्य राम प्रभूदेसाई यांच्या न्यायालयात ही सुनावणी झाली. भरपाईच्या रकमेवर दावा दाखल केल्याच्या तारखेपासून वार्षिक ६.८० टक्के दराने व्याजही देण्याचे निर्देशही दिलेले आहेत.
सावर्डे येथील रहिवासी हुसेनबाशा अमीनासाब जनतकान हा २४ मे २०२४ रोजी वयाच्या अठराव्यावर्षी टँकरवर क्लिनर म्हणून काम करत होता. टँकरची चाचणी करताना पंचवाडी परिसरात समोरून येणार्या टिप्पर ट्रकने टँकरला धडक दिली. या अपघातात टँकर उलटल्याने हुसेनबाशा गंभीर जखमी झाला. प्राण वाचवण्यासाठी त्याचा डावा हात कोपराच्या वरून कापावा लागला.
या अपघातामुळे त्याच्या शारीरिक क्षमतेवर, भविष्यातील रोजगाराच्या संधींवर आणि वैयक्तिक आयुष्यावर गंभीर परिणाम झाला. तो कर्नाटकातील शिरूर येथील महाविद्यालयात इयत्ता अकरावीच्या समकक्ष प्रथम वर्ष पीयूसीचे शिक्षण घेत होता. अपघातामुळे त्याची शारीरिक कार्यक्षमता ७० टक्क्यांनी कमी झाल्याचे न्यायाधिकरणाच्या निरीक्षणात नमूद करण्यात आले.
हुसेनबाशा यांनी भरपाईसाठी दावा दाखल केला होता. अपघात दोन्ही वाहनांच्या चालकांच्या निष्काळजीपणामुळे झाल्याचे न्यायाधिकरणासमोर स्पष्ट झाले. त्यामुळे रिलायन्स जनरल इन्शुरन्स आणि बजाज अलायन्स या दोन्ही विमा कंपन्यांना संयुक्तपणे भरपाई देण्याचे निर्देश देण्यात आले.
न्यायाधिकरणाने भविष्यातील उत्पन्नाच्या नुकसानीपोटी ३५ लाख ९८ हजार ५६० रुपये, शारीरिक यातना व मानसिक त्रासासाठी ३ लाख रुपये, आयुष्यातील रस गमावल्याबद्दल अडीच लाख रुपये, विवाहाच्या शक्यतांवर झालेल्या परिणामासाठी दीड लाख रुपये आणि रुग्णालय व इतर खर्चासाठी २५ हजार रुपये, अशी एकूण ४३ लाख २३ हजार ५६० रुपयांची भरपाई मंजूर केली. ही रक्कम स्टेट बँक ऑफ इंडिया, मडगाव येथील जिल्हा न्यायालयाच्या खात्यात एनईएफटीद्वारे जमा करण्याचे आदेश न्यायाधिकरणाने दिले आहेत.


