मडगाव : सांगे तालुक्यातील शेळपे येथील १०० एमएलडी क्षमतेचा साळावली जलशुद्धीकरण प्रकल्प ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजल्यापासून १ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत २४ तासांसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. या काळात मडगाव, फातोर्डा, केपे, कुंकळ्ळी, कुडतरीसह दक्षिण गोव्यात काही प्रमाणात पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे.
साळावली येथील १०० एमएलडी क्षमतेच्या विद्यमान जलशुद्धीकरण प्रकल्पाला अतिरिक्त १०० एमएलडी क्षमतेच्या जलशुद्धीकरण प्रकल्पाशी जोडण्याचे काम करण्यासाठी हा प्रकल्प बंद ठेवण्यात येणार आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता हर्ष काकोडकर यांनी यासंदर्भात नोटीस जारी केली आहे. प्रकल्प बंद राहणार असल्याने याचा परिणाम दक्षिण गोव्यातील बहुतांश भागावर होणार आहे. या पाणीपुरवठा बंदचा परिणाम नेत्रावळी, जांबावली, रिवण, गुड्डेमळ, शिरोडा, केपे, बाळ्ळी पंपिंग स्टेशन, गुडी, मडगाव, फातोर्डा, राय, फतेपूर, लोटली, कासावली, नागोवा, कुंकळ्ळी, कुडतरी, नुवे आणि कुठ्ठाळी या भागांवर होणार आहे. दरम्यान, कुठ्ठाळी, दाबोळी, वास्को आणि मुरगाव मतदारसंघातील जलवाहिनीच्या शेवटच्या टोकावरील भागांत पाणीपुरवठा पूर्णपणे पूर्ववत होण्यासाठी प्रकल्प सुरू केल्यानंतर पाणी पुरवठा सुरळीत होण्यासाठी आणखी दोन दिवस लागू शकतात, असे खात्याने स्पष्ट केले आहे.
या कालावधीत साळावली येथील १६० एमएलडी क्षमतेचा दुसरा जलशुद्धीकरण प्रकल्प सुरू राहणार आहे. तरीही संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा आणि आवश्यक पाणीसाठा करून ठेवावा, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम खात्याने केले आहे.


