वास्को : वास्को शहरात गुरुवारी रात्री दोन वेगवेगळ्या ठिकाणी लागलेल्या भीषण आगीच्या घटनांमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली. शहरातील संडे मार्केट परिसर आणि टिळक मैदानाच्या मागील बाजूस असलेल्या एका कार अॅक्सेसरीजच्या दुकानाला ही आग लागली. अचानक भडकलेल्या या आगीमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, टिळक मैदानाच्या मागील बाजूस असलेल्या कार अॅक्सेसरीजच्या दुकानाला अचानक आग लागली. काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केल्याने संपूर्ण दुकान जळून खाक झाले. या आगीची झळ दुकानाबाहेर उभ्या असलेल्या दोन चारचाकी वाहनांनाही बसली असून, त्यात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. दुसरीकडे, संडे मार्केट परिसरातही आगीची दुसरी घटना घडल्याने शहरात एकाच वेळी धावपळ सुरू झाली.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान बंबांसह दोन्ही घटनास्थळी तातडीने दाखल झाले. पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेत गर्दीवर नियंत्रण मिळवले आणि मदतकार्यात सहकार्य केले. अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवल्याने पुढील मोठा अनर्थ टळला.
आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, कार अॅक्सेसरीजच्या दुकानातील आग शॉर्टसर्किटमुळे लागली असावी, असा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. या आगीत दुकानातील साहित्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, नुकसानीचा नेमका आकडा पंचनाम्यानंतरच स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि वास्कोचे आमदार कृष्णा (दाजी) साळकर यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला, तसेच संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या.


