कोलवाळ येथे हिट अँड रन अपघात; दोन पादचारी युवती गंभीर जखमी

अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा नोंद

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
28th October, 11:49 pm
कोलवाळ येथे हिट अँड रन अपघात; दोन पादचारी युवती गंभीर जखमी

म्हापसा : मुशीरवाडा, कोलवाळ येथे राष्ट्रीय महामार्गावर ‘हिट अँड रन’ अपघातात अनामिका गुरव (२३) आणि रुपाली वैदरडे (२३) या मूळ महाराष्ट्रातील दोन पादचारी युवती गंभीर जखमी झाल्या. जखमी युवती या कोलवाळ औद्योगिक वसाहतीमधील एका कंपनीच्या कामगार असून पोलिसांनी अज्ञात कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

अपघात बुधवार, २८ रोजी सकाळी ६.३० वा. सुमारास पंजाबी धाब्यासमोर राष्ट्रीय महामार्गावर घडला होता. दोघी युवती नेहमीप्रमाणे मुशीरवाडा येथील भाड्याच्या खोलीवरून कोलवाळ औद्योगिक वसाहतीमधील एका कंपनीमध्ये चालत जात होत्या.

यावेळी करासवाडा ते धारगळच्या दिशेने भरधाव जाणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या एका अज्ञात कार चालकाने या दोघींना जोरदार धडक दिली. त्यानंतर सदर कार चालकाने गाडीसह घटनास्थळावरून पोबारा केला.

अपघातात दोन्ही युवती गंभीर जखमी झाल्या. त्यांना रुग्णवाहिकेतून म्हापसा जिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले. जखमींची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना नंतर बांबोळी येथील गोवा वैद्यकीय इस्पितळात पाठवण्यात आले. तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळताच कोलवाळ पोलिसांनी इस्पितळात जखमी युवतींची भेट घेऊन त्यांचा जबाब घेतला. या युवतींनी त्या वाहनाची क्रमांकपट्टी पाहिली नव्हती. मात्र, ती कार पांढऱ्या रंगाची असल्याचे त्यांनी सांगितले.

कोलवाळ पोलिसांनी या अपघात प्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा नोंद केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संजीत कांदोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत. 

हेही वाचा
सर्व पहा