मडगाव : वास्को मार्केटमध्ये भीषण आगीत दीडशेपेक्षा जास्त दुकाने बघता बघता भस्मसात झाली. सुरक्षाविषयक उपाययोजना आणि आवश्यक खबरदारी न घेतल्यास काय आपत्ती ओढावू शकते, हे या घटनेतून दिसून आले. राज्यातील पणजी, म्हापसा, मडगावसह अनेक मोठ्या बाजारपेठांच्या सुरक्षेबाबत आताच पावले उचलणे आवश्यक आहे.
मडगाव शहरातील जुन्या असलेल्या न्यू मार्केट आणि गांधी मार्केट परिसरात अग्निसुरक्षेचा प्रश्न गंभीर असतानाही केवळ आग लागल्यानंतरच यावर चर्चा होते. बाजारपेठांमध्ये घडलेल्या आगीच्या घटनांनंतर अग्नी सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी समोर आलेल्या होत्या. आता अग्निसुरक्षा सुविधांचे ऑडिट होण्याची गरज भासत आहे.
मार्केटच्या कमी जागेत दाटीवाटीने उभारलेली दुकाने, अरुंद गल्ल्या, रस्त्यावरील पार्किंग व फिरते विक्रेते यामुळे वाढती वाहतूक कोंडी, प्रत्येक दुकानातून अग्निशामक यंत्रांचा अभाव आणि आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी आवश्यक प्रशिक्षणाची कमतरता यामुळे मोठी आग लागल्यास परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे आव्हान निर्माण होऊ शकते.
न्यू मार्केट परिसरात सुमारे ४०० ते ५०० दुकाने आणि स्टॉल्स असल्याने आगीचा धोका जास्त आहे. एखाद्या दुकानात आग लागल्यास जवळच्या दुकानांपर्यंत ती पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. बाजारपेठेतील दुकानांची दाटी, ज्वलनशील साहित्य आणि अरुंद रस्ते यामुळे आग विझविण्याच्या कामात अडथळे निर्माण होऊ शकतात. त्यामुळे बाजारपेठेतील अग्निसुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम करण्याची गरज व्यक्त होत आहे.
मडगावच्या बाजारपेठेतील अनेक अंतर्गत रस्ते आणि गल्ल्या अरुंद आहेत. त्यातच काही ठिकाणी दुकानांबाहेर ठेवलेले सामान, स्टॉल्स आणि रस्त्यांवरील अतिक्रमण यामुळे ये-जा करण्यासाठी उपलब्ध जागा कमी होते. अशा परिस्थितीत आग लागल्यास अग्निशामक दलाच्या मोठ्या वाहनांना घटनास्थळापर्यंत पोहोचणे कठीण होऊ शकते. मार्केटकडील फिरत्या विक्रेत्यांसह अतिक्रमणाविरोधात काही दिवसांपूर्वीच गांधी मार्केटच्या विक्रेत्यांनी पालिकेवर मोर्चा आणला होता. पण, अद्यापही संडे मार्केट रस्त्यावर भरते व अतिक्रमणासह फिरत्या विक्रेत्यांवर ठोस कारवाई झालेली दिसत नाही.
आगीच्या घटनांमध्ये सुरुवातीची काही मिनिटे अत्यंत महत्त्वाची असतात. या काळात अग्निशामक वाहनांना प्रवेश मिळाला नाही, तर आग अधिक वेगाने पसरून मोठे नुकसान होण्याची शक्यता असते. त्यामुळे बाजारपेठेतील आपत्कालीन मार्ग निश्चित करणे, रस्त्यांवरील अडथळे दूर करणे आणि अग्निशामक वाहनांना सहज प्रवेश मिळेल याची खात्री करणे आवश्यक आहे. यासाठी बैठकांतून चर्चा नाही तर प्रत्यक्ष घटनास्थळी पाहणी व कृती गरजेची आहे.
७९ लाख रुपये खर्चून १५ फायर हायड्रंट
बाजारपेठेतील अग्निसुरक्षा सुधारण्यासाठी सुमारे ७९ लाख रुपये खर्चून १५ नवीन फायर हायड्रंट्स उभारण्यात आल्या आहेत. यांची चाचणी घेण्यात आली असून, आग लागल्यास पाण्याचा पुरवठा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
पाण्याच्या टाकीचे बांधकाम बाकी
फायर हायड्रंट सुविधांची उभारणी झाली असली तरी पाण्याचा आवश्यक दाब उपलब्ध होण्याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आग विझवण्यासाठी पुरेशा दाबाने पाणी मिळणे महत्त्वाचे असते. दाब कमी असल्यास जलजोडण्यांचा प्रभावी वापर करण्यात अडचणी येऊ शकतात. त्यामुळे पाण्याचा दाब वाढवण्यासाठी बूस्टर पंप यंत्रणा बसवण्याची प्रक्रिया सुरू आहे. तसेच पाण्याच्या टाकीसाठी जागा पाहण्यात आली होती परंतु, टाकी बांधकामाचे काम पुढे गेलेले नाही. जलजोडण्यांची नियमित तपासणी, पाणीपुरवठ्याची खात्री आणि आपत्कालीन परिस्थितीत त्या कार्यरत राहतील यासाठी देखभाल व्यवस्था मजबूत करणेही आवश्यक आहे.
दुकानांमध्ये अग्निशामक यंत्रांचा अभाव
दोन्ही मार्केटमधील अनेक दुकानांमध्ये प्राथमिक आग नियंत्रणासाठी आवश्यक असलेली अग्निशामक यंत्रे उपलब्ध नसल्याचे संबंधित सर्वेक्षणातून समोर आले. प्रत्येक दुकानात योग्य प्रकारचे अग्निशामक यंत्र उपलब्ध असणे आणि ते वापरण्याची माहिती दुकानदारांना असणे आवश्यक आहे. लहान स्वरूपाची आग सुरुवातीलाच नियंत्रणात आणता आली, तर मोठे नुकसान टाळता येऊ शकते. मात्र, अग्निशामक यंत्रे नसल्यास किंवा ती कशी वापरायची याची माहिती नसल्यास आग वेगाने पसरण्याचा धोका वाढतो. त्यामुळे बाजारपेठेतील प्रत्येक दुकानदाराने अग्निसुरक्षेच्या नियमांचे पालन करणे आणि आवश्यक उपकरणे उपलब्ध ठेवणे महत्त्वाचे आहे.
प्रशिक्षणाचा अभाव ही चिंतेची बाब
अग्निशामक जलजोडण्या उभारणे हा सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा असला, तरी आग लागल्याच्या सुरुवातीच्या काळात त्यांचा वापर कसा करायचा, याचे प्रशिक्षणही आवश्यक आहे. बाजारपेठेतील व्यापारी, कर्मचारी आणि मडगाव पालिकेच्या संबंधित कर्मचार्यांना अग्निसुरक्षेचे अधिकृत प्रशिक्षण दिले गेले आहे का, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
आग लागल्यास तातडीने अग्निशामक दलाला माहिती देणे, नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढणे, प्राथमिक अग्निशमन उपकरणांचा वापर करणे आणि अग्निशामक जलजोडण्यांद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्याची प्रक्रिया समजणे आवश्यक आहे. यासाठी नियमित प्रात्यक्षिके आणि मॉक ड्रिल आयोजित केल्यास आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्याची तयारी वाढू शकते.
प्रशासनासमोर उपाययोजनांचे आव्हान
बाजारपेठेतील अग्निसुरक्षा व्यवस्था सक्षम करण्यासाठी केवळ जलजोडण्या उभारणे पुरेसे ठरणार नाही. अग्निशामक वाहनांसाठी मार्ग मोकळे ठेवणे, अतिक्रमणांवर नियंत्रण ठेवणे, दुकानांमध्ये अग्निशामक यंत्रे अनिवार्य करणे, पाण्याचा पुरेसा दाब सुनिश्चित करणे आणि नियमित सुरक्षा तपासणी करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर व्यापारी संघटना, मडगाव नगरपालिका आणि अग्निशामक दल यांच्यात समन्वय असणे गरजेचे आहे. बाजारपेठेतील दुकानदारांना सुरक्षेच्या नियमांची माहिती देऊन त्यांचे पालन करण्यास प्रवृत्त करणेही महत्त्वाचे ठरेल.
मोठ्या दुर्घटनेपूर्वी प्रतिबंधात्मक उपायांची गरज
मडगावच्या न्यू मार्केट आणि गांधी मार्केटमध्ये अग्निसुरक्षेसाठी काही पायाभूत सुविधा उभारण्यात आल्या असल्या, तरी त्यांची परिणामकारकता, देखभाल आणि प्रत्यक्ष वापराची तयारी यावर लक्ष देणे आवश्यक आहे. बाजारपेठांमधील गर्दी आणि मर्यादित जागा लक्षात घेता, आग लागल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा दुर्घटना टाळण्यासाठी आधीच प्रभावी व्यवस्था उभारणे महत्त्वाचे आहे. व्यापारी, ग्राहक आणि परिसरातील नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी उर्वरित त्रुटी दूर करून अग्निसुरक्षा उपायांची नियमित अंमलबजावणी करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

म्हापसा बाजारपेठेच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!
म्हापसा : वास्को येथील बाजारपेठेत घडलेल्या भीषण आग दुर्घटनेनंतर उत्तर गोव्यातील प्रमुख असलेल्या म्हापसा बाजारपेठेच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. २०१० साली म्हापसा मार्केटमध्ये घडलेल्या भीषण अग्नितांडवात १६ दुकाने जळून भस्मसात झाली होती. यात अंदाजे १ कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. त्यापासून गेली १६ वर्षे बाजारपेठेमध्ये आवश्यक पायाभूत सुरक्षात्मक उपाययोजना राबवण्यास सरकार तसेच नगरपालिकेला यश आलेले नाही.
अनियंत्रित पदविक्रेत्यांची संख्या ही बाजारपेठेच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून मोठा अडथळा आहे. या विक्रेत्यांनी बाजारपेठेचे रस्ते व्यापल्यामुळे आपत्कालिन अशा अग्निशमन दल किंवा रुग्णवाहिकेचा मार्ग अडवला गेला आहे. तसेच बेजबाबदार वाहन पार्किंगची व्यवस्था देखील बाजारपेठेच्या सुरक्षेचे कारण ठरत आहे. आग लागल्यास किंवा आपत्कालिन घटना घडल्यास घटनास्थळी पोहोचण्यास पदविक्रेत्यांचे अडथळे तसेच पार्क केलेली वाहने आपत्कालिन यंत्रणांना बाजूला करून पुढे जावे लागत आहेत.
अग्निसुरक्षेतील महत्त्वाचे साधन म्हणून फायर हायड्रंटचा उल्लेख होतो. डिसेंबर २०१० मध्ये घडलेल्या आग दुर्घटनेनंतर म्हापसा मार्केटमध्ये सरकारने फायर हायड्रंन्टची व्यवस्था केली आहे. मात्र, या हायड्रन्टना लागणारी आवश्यक दाबाची (प्रेशर) पाणी जोडणी अजूनही मिळू शकलेली नाही. नगरपालिका, पेयजल पुरवठा (पूर्वीचे साबांखा), अग्निशमन दल आणि जिल्हाधिकारी कार्यालय यांच्यामध्ये समन्वयाचा अभाव असल्याने मार्केटच्या असुरक्षेतील ही समस्या लटकली गेली आहे. पूर्वी बाजारपेठेत विहीर होती. परंतु, ती भाजी मार्केटच्या बांधकामावेळी बुजवली गेली. या विहिरीचा उपयोग फायर डायड्रन्टसाठी करणे शक्य होते. परंतु, प्रशासनाला वर्षभर पाण्याने तुडूंब भरणार्या या विहिरीचा फायदा करून घेतला नाही.
सणासुदीच्या काळात सुरक्षतेच्या दृष्टीकोनातूना फायर डायड्रन्टची चाचणी केली जाते व दरवर्षीप्रमाणे पाणी पुरवठा खात्याला हायड्रन्टला मुबलक पाणी देण्याची सूचना स्थानिक प्रशासकीय यंत्रणेकडून केली जाती. त्यानंतर या सूचनेचा पाठपुरावा कागदपत्रांच्या व्यतिरिक्त प्रत्यक्षात होत नाही. त्यामुळे हे फायर हायड्रन्ट सध्या शोभेची वस्तू बनले असून पदविक्रेत्यांच्या सामानाआड झाकलेले आहे.
पोर्तुगीजकालीन बाजारपेठेची दुर्दशा
पोर्तुगीज राजवटीत या नियोजनबद्ध प्रशस्त बाजारपेठेची उभारणी झाली होती. त्यानंतर लोकनियुक्त सरकारांनी या मार्केटकडे दुर्लक्ष केल्यामुळे बाजारपेठेला बकाल स्वरूप आले. आगीची एखादी घटना किंवा बाजारपेठेतील अतिक्रमणाचा प्रश्न उपस्थित झाल्यास नगरपालिका प्रशासन जागे होते. काही दिवस रात्रीच्यावेळी अतिक्रमण हटाव मोहीम राबवली जाते. रात्रीच्यावेळी बांधून ठेवलेले सामान विनापंचनामा उचलून नेऊन विक्रेत्यांना भीती घातली जाते व त्यानंतर ही कारवाई थांबवली जाते. हाच प्रकार वर्षानुवर्षे सुरू असल्यामुळे म्हापसा बाजारपेठेतील रस्त्यांवरील अडथळा कायम असून ही बाजारपेठेच्या असुरक्षतेची प्रमुख कारणे मानली जातात.
व्यापारी गप्प, प्रशासनही सुस्त!
म्हापसा व्यापारी संघटना आणि व्यापारी वर्ग हे आपल्या दुकानांसदर्भातील विविध समस्या नगरपालिका तसेच सरकार पातळीवर उपस्थित करतात. परंतु बाजारपेठेच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकानातून निर्माण होणारे प्रश्न मांडण्यास ते पुढाकार घेत नसल्याने प्रशासकीय यंत्रणाही याकडे डोळेझाक करत आहेत.

जुनाट आगप्रतिबंधक यंत्रणेमुळे पणजी मार्केट इमारतही असुरक्षित
पणजी : पणजी मार्केट इमारतीत बसविण्यात आलेले बहुतांश फायर हायड्रंट जुने झाले असून, ते बदलण्याची गरज आहे. तसेच, अनेक दुकानांमध्ये फायर एक्स्टिंग्विशर्सचा अभाव आहे. जुन्या अग्निशमन यंत्रणेमुळे पणजी मार्केट इमारतीच्या अग्निसुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर उत्तर गोवा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांसमवेत मार्केट इमारतीची पाहणी करण्यात येणार आहे. यावेळी फायर हायड्रंट, होज रील्स आणि इतर अग्निशमन उपकरणांची तपासणी केली जाणार आहे.
वास्को येथील संडे मार्केटला बुधवारी मध्यरात्री आग लागली. काही अंतराने वेगवेगळ्या ठिकाणी आग लागल्याने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दलासह अन्य यंत्रणांना मोठी कसरत करावी लागली. या आगीत कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याने बाजारपेठांमधील अग्निसुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
पणजी मार्केट इमारतीत ठिकठिकाणी सुमारे १५ ते २० फायर हायड्रंट बसविण्यात आले आहेत. मात्र, या यंत्रणेची शेवटची तपासणी कधी झाली होती, तसेच त्यापैकी किती फायर हायड्रंट प्रत्यक्षात कार्यरत आहेत, याची ठोस माहिती उपलब्ध नाही. बहुतांश फायर हायड्रंट जुने झाल्याने ते बदलणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत आग लागल्यास जुनी किंवा बंद पडलेली यंत्रणा कितपत उपयोगी ठरेल, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
याशिवाय, मार्केटमधील अनेक दुकानांमध्ये फायर एक्स्टिंग्विशर्स नसल्याचे दिसून येते. त्यामुळे एखाद्या दुकानात आग लागल्यास ती शेजारील दुकानांमध्ये पसरण्याचा आणि आगीचा मोठा भडका उडण्याचा धोका आहे. त्यामुळे मार्केटमधील अग्निसुरक्षेच्या उपाययोजनांची तातडीने तपासणी करण्याची गरज व्यक्त होत आहे.
मोठी आग विझविण्यास मर्यादा
पणजी मार्केट इमारतीत ठिकठिकाणी फायर हायड्रंट बसविण्यात आले असून, त्यापैकी बहुतांश कार्यरत आहेत, असे अग्निशमन दलाचे संचालक नितीन रायकर यांनी सांगितले. मात्र, फायर हायड्रंट आणि फायर एक्स्टिंग्विशर्स हे आगीचे स्वरूप लहान असतानाच अधिक प्रभावी ठरतात. आग मोठ्या प्रमाणात पसरल्यानंतर केवळ फायर हायड्रंटच्या मदतीने ती पूर्णपणे विझविणे शक्य होत नाही. पणजी मार्केट इमारतीत अग्निशमन दलाचे बंब नेण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध आहे, असेही रायकर यांनी स्पष्ट केले.
फायर एक्स्टिंग्विशर्स बसविण्यावरून मतभेद
पणजी महापालिकेने मार्केटमधील दुकानदारांना दुकानांमध्ये फायर एक्स्टिंग्विशर्स बसविण्याच्या सूचना केल्या होत्या. अग्निशमन दलानेही सुरक्षेच्या दृष्टीने प्रत्येक दुकानात फायर एक्स्टिंग्विशर्स बसविण्याची शिफारस केली आहे. मात्र, त्यासाठी होणारा खर्च कोण करणार, हा प्रश्न अद्याप कायम आहे.
दुकानदार महापालिकेला भाडे देत असल्याने महापालिकेनेच फायर एक्स्टिंग्विशर्स बसवावेत, अशी त्यांची मागणी आहे. मात्र, या संदर्भातील कार्यवाही अद्याप झालेली नाही. त्यामुळे पणजी मार्केटमधील दुकाने आणि संपूर्ण इमारत अग्निसुरक्षेच्या दृष्टीने पूर्णपणे सुरक्षित असल्याचे म्हणता येत नाही. वास्को येथील आगीच्या घटनेनंतर तरी पणजी मार्केटमधील अग्निशमन यंत्रणा सक्षम करण्यासाठी तातडीने पावले उचलण्याची गरज अधोरेखित झाली आहे.
पणजी मार्केटमधील अग्निशमन यंत्रणा आणि इतर सुरक्षा उपाययोजनांची पाहणी करण्यात येणार आहे. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांसमवेत फायर हायड्रंटसह अन्य उपकरणांची तपासणी केली जाईल. ही उपकरणे कार्यरत आहेत की निरुपयोगी ठरली आहेत, हे तपासणीतून स्पष्ट होईल. त्यानंतर आवश्यक त्या शिफारसी केल्या जातील, असे उत्तर गोवा जिल्हाधिकारी सुरेंद्र नाईक यांनी सांगितले.


