शिगणे-शेळपे येथील आगीत झळालेले घरातील साहित्य.
....
वाळपई : नगरगाव ग्रामपंचायत क्षेत्रातील शिगणे-शेळपे येथे बुधवारी सायंकाळी प्राथमिक शाळेजवळ असलेल्या अश्विनी ए. सुरलकर यांच्या घराला आग लागून सुमारे पाच लाख रुपयांचे नुकसान झाले. वाळपई अग्निशामक दलाने दीड तासाच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले. या कारवाईमुळे सुमारे १० लाख रुपयांची मालमत्ता वाचविण्यात यश आले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
बुधवारी सायं. ४च्या सुमारास घरातून धूर निघत असल्याचे स्थानिकांच्या निदर्शनास आले. त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, आगीने उग्र रूप धारण केल्याने त्यांनी वाळपई अग्निशामक दलाला पाचारण केले. दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाल्यानंतर जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून दीड तासात आग पूर्णपणे आटोक्यात आणली.

या मोहिमेत पथकप्रमुख सतीश नाईक यांच्या नेतृत्वाखाली प्रदीप एस. गावकर, महादेव एस. गावडे, आदित्य एल. गावस आणि गोकुळदास आर. देगवेकर यांनी सहभाग घेतला. अग्निशामक दलाच्या तत्परतेमुळे आगीचा अधिक फैलाव रोखण्यात यश आले.
नुकसानग्रस्त कुटुंबाला मदतीची मागणी
या आगीत कपडे, विद्युत उपकरणे, मौल्यवान वस्तू आणि इतर घरगुती साहित्याचे मोठे नुकसान झाले. प्राथमिक अंदाजानुसार, सुमारे पाच लाख रुपयांची मालमत्ता जळून खाक झाली आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, सुरलकर कुटुंबाचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याने शासनाने त्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.


