मडगाव : वास्को येथील न्यू मॉडर्न म्युनिसिपल मार्केटमध्ये लागलेल्या भीषण आगीच्या पार्श्वभूमीवर आज मुरगाव नगरपालिकेच्या कार्यालयात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्त्वाची उच्चस्तरीय आढावा बैठक पार पडली. या बैठकीमध्ये प्रामुख्याने आगीमुळे झालेल्या नुकसानीचा सविस्तर आढावा घेण्यात आला असून, बाधित व्यापार्यांना तातडीने आर्थिक मदत देण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. बाजारातील अग्निसुरक्षा आणि भविष्यात अशा प्रकारच्या दुर्घटना टाळण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांवरही या बैठकीत चर्चा करण्यात आली.
या बैठकीला आमदार कृष्णा साळकर, आमदार संकल्प आमोणकर, मुख्य सचिव डॉ. व्ही. कांडावेलू, महसूल सचिव संदीप जॅकीस, दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकारी एग्ना क्लीटस, दक्षिण गोव्याचे पोलीस अधीक्षक अक्षत आयुष, अग्निशामक दलाचे संचालक आणि नगरपालिका प्रशासनाचे संचालक यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, नगरसेवक आणि मार्केट समितीचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रशासनाने तातडीने पावले उचलत मदत कार्याला सुरुवात केली होती. दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकारी एग्ना क्लीटस यांनी वास्को संडे मार्केटमधील आगीतील बाधितांच्या नोंदणीचा आढावा घेतला होता, ज्यामध्ये ८९ बाधित व्यापारांनी भरपाईसाठी नोंदणी केली होती. तसेच प्राथमिक पाहणीनुसार, आगीचे नेमके कारण शोधणे, दुकाने व मालमत्तेचे झालेले नुकसान यांचे सर्वंकष मूल्यांकन करणे आणि नुकसानभरपाई निश्चित करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे ठरले होते.
आज दुपारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत बाधित दुकानदारांच्या पुनर्वसनासाठी विविध सरकारी विभागांमध्ये समन्वय साधण्यावर विशेष भर देण्यात आला. भविष्यात अशा दुर्घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी बाजारातील अग्निसुरक्षा व्यवस्थेचा सविस्तर आढावा घेऊन आवश्यक सुरक्षा उपाययोजना प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यावेळी स्पष्ट केले की, बाधित व्यापार्यांच्या हिताला आणि नागरिकांच्या सुरक्षेला सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असून, या मोठ्या संकटकाळात व्यापाऱ्यांना दिलासा देण्यासाठी आणि मार्केटमधील जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी सरकार सर्वतोपरी साहाय्य करेल.


