वास्कोतील न्यू मॉडर्न मार्केट परिसरात प्रवेशाला बंदी, आदेश जारी

आगीमुळे इमारत कोसळण्याची भीती; ५० मीटर परिसर सील, १ नोव्हेंबरपर्यंत निर्बंध

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
just now
वास्कोतील न्यू मॉडर्न मार्केट परिसरात प्रवेशाला बंदी, आदेश जारी

मडगाव : वास्को येथील न्यू मॉडर्न म्युनिसिपल मार्केटला लागलेल्या भीषण आगीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी दक्षिण गोवा जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी एग्ना क्लिटस, आयएएस यांनी मार्केटच्या सभोवतालच्या ५० मीटर परिसरात प्रवेश बंदी आदेश जारी केला आहे. हा आदेश १ नोव्हेंबरपर्यंत लागू राहणार आहे.

वास्को येथे मार्केटमध्ये २८ ऑक्टोबर रोजी रात्री सुमारे ११.४० वाजता आग लागली होती. या आगीत इमारतीचे मोठे नुकसान झाले असून, तिची संरचनात्मक स्थिरता धोक्यात आली आहे. इमारत कोसळण्याची शक्यता तसेच जळालेल्या भागात असलेल्या ज्वलनशील साहित्यामुळे पुन्हा आग भडकण्याचा धोका लक्षात घेऊन प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

आगीने बाधित मार्केटच्या बाह्य सीमेपासून ५० मीटर परिसर पोलिसांनी बॅरिकेड्स लावून बंदिस्त करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. व्यापारी, फेरीवाले, ग्राहक आणि सर्वसामान्य नागरिकांना या परिसरात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली असून, केवळ अधिकृत आपत्कालीन व तांत्रिक अधिकाऱ्यांनाच आवश्यक खबरदारी घेऊन प्रवेश करता येणार आहे.

सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अभियंत्यांनी इमारतीची संरचनात्मक तपासणी करून ती सुरक्षित असल्याचा निर्वाळा देईपर्यंत प्रवेशबंदी कायम राहणार आहे. अग्निशामक दलालाही ज्वलनशील पदार्थांची तपासणी करून आवश्यक खबरदारी घेण्याचे निर्देश दिले आहेत. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायद्यानुसार कारवाई करण्याचा इशाराही जिल्हा प्रशासनाने दिला आहे.

आज होणार संयुक्त पाहणी, पंचनामा

२९ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.३० वाजता उपजिल्हाधिकारी, उपअधीक्षक पोलीस, मुरगाव पालिकेचे मुख्याधिकारी, अग्निशामक दल, फॉरेन्सिक लॅब, सार्वजनिक बांधकाम खाते आणि वीज खात्याच्या अधिकाऱ्यांकडून संयुक्त पाहणी व पंचनामा करण्यात येणार आहे.

हेही वाचा
सर्व पहा