वास्को आगीतील बाधितांच्या पुनर्वसनासाठी दोन-तीन जागा निश्चित : आमदार साळकर

वास्को मार्केटमधील भीषण आगीत व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, सरकारतर्फे पुनर्वसनासाठी जागा निश्चित करण्यात आली आहे. दरम्यान, विक्रेत्यांनी पुनर्वसन करायचे असल्यास त्याच ठिकाणी करावे आणि या घटनेला राज्य आपत्ती घोषित करून उच्चस्तरीय चौकशी करावी अशी मागणी केली आहे.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
just now
वास्को आगीतील बाधितांच्या पुनर्वसनासाठी दोन-तीन जागा निश्चित : आमदार साळकर

वास्को : शहरात दोन वेगवेगळ्या ठिकाणच्या भीषण आगीच्या दुर्घटनेनंतर संपूर्ण गोव्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान आगीचा सर्वाधिक फटका हा वास्कोतील संडे मार्केटमधील लहान मोठ्या विक्रेत्यांना बसला आहे. या दुर्घटनेत १५० पेक्षा अधिक दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहेत. दरम्यान बाधित दुकानदारांच्या पुनर्वसनासाठी सरकारने दोन ते तीन योग्य जागा निश्चित केल्या असल्याची महत्त्वाची माहिती वास्कोचे आमदार कृष्णा उर्फ दाजी साळकर यांनी दिली आहे. 

सरकार पीडित व्यापाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून त्यांना आवश्यक ती सर्व मदत लवकरात लवकर पुरवली जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. एकाच वेळी तीन वेगवेगळ्या ठिकाणी आग लागल्याच्या या अत्यंत दुर्दैवी घटनेची गंभीर दखल घेत मुख्यमंत्र्यांनी तात्काळ पावले उचलली आहेत. या घटनेची माहिती मिळताच त्यांनी मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधला आणि त्यानंतर जिल्हाधिकारी, पोलीस महासंचालक (DGP), अग्निशामक दल तसेच संपूर्ण प्रशासनाच्या समन्वयाने रात्री उशिरापर्यंत आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू होते. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार, मेहनत करून पोट भरणाऱ्या गरीब दुकानदारांना तातडीची मदत देणे आणि त्यांचे पुनर्वसन करणे हे सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे असे साळकर म्हणाले. 

 भीषण आगीत मोठे नुकसान झालेल्या विक्रेत्यांना मदत करण्यासाठी आमदार साळकर यांनी आपले दोन वर्षांचे वेतन देण्याचे जाहीर केले आहे. जेणेकरून बाधित लोकांना तातडीने आर्थिक हातभार लागून त्यांचा व्यवसाय पुन्हा पूर्ववत सुरू होऊ शकेल. या कठीण काळात आगबाधित व्यापाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे मी खंबीरपणे उभा आहे. मतदारसंघाच्या विकासासाठी मी केलेल्या प्रयत्नांना या विक्रेत्यांनी नेहमीच साथ दिली आहे, असे साळकर म्हणाले.  

ऐन दिवाळीच्या सणापूर्वी दुकानदारांनी मोठ्या प्रमाणावर माल भरला होता, ज्याचे अतोनात नुकसान झाले असून मामलेदार, डेप्युटी कलेक्टर आणि व्यापारी असोसिएशनच्या माध्यमातून नुकसानीची सविस्तर नोंद व पाहणी करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. तसेच ही आग नेमकी कशी लागली याचा माग काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी डीजीपींना सर्व बाजूंनी कसून तपास करण्याचे आदेश दिले असून, आगामी दोन ते तीन दिवसांत व्यापाऱ्यांचे पुनर्वसन करून व्यवसाय पुन्हा सुरू करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.


दुसरीकडे, या भीषण आगीमुळे उद्ध्वस्त झालेल्या वास्को मार्केटमधील प्रभावित विक्रेत्यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत या संपूर्ण घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे. आपल्याला इतरत्र कुठेही स्थलांतरित होण्याची अजिबात इच्छा नसून, तीच जुनी बाजारपेठेची जागा पूर्ववत करून ती आम्हाला परत मिळवून देण्यासाठी सरकारने युद्धपातळीवर काम करावे, अशी आर्त विनंती त्यांनी केली आहे. आपले पुनर्वसन किंवा स्थलांतर दुसऱ्या ठिकाणी करू नये असे स्पष्ट करत त्यांनी प्रशासनाला मदतीचे आवाहन केले आहे. या संकटाचे गांभीर्य लक्षात घेता, वास्को मार्केटमधील या आगीच्या घटनेला 'राज्य आपत्ती' (State Disaster) म्हणून घोषित करण्यात यावे, अशी मागणीही संतप्त व्यापाऱ्यांनी केली असून, प्रशासनाकडून येणाऱ्या अधिकृत निर्णयाकडे आणि मदतीकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.


हेही वाचा
सर्व पहा