मडगाव : सासष्टी तालुक्यातील रालोय येथील वसाहतीजवळ २९ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री अज्ञात वाहनाने एका दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दीपिका कुमार (वय २४) यांचा मृत्यू झाला असून, दुचाकीचालक शशी कुमार (वय २६) गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर धडक देणारा वाहनचालक वाहनासह घटनास्थळावरून पसार झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मूळचे बिहारचे रहिवासी असलेले आणि सध्या मायना कुडतरी येथे राहणारे पती-पत्नी यामाहा फॅसिनो दुचाकीवरून मुगाळी येथून चांदरच्या दिशेने जात होते. त्यांच्यासोबत दुचाकीवर दीपिका कुमार यादेखील होत्या.
मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास त्यांची दुचाकी रालोय वसाहतीजवळ आली असता, मागून भरधाव वेगाने आलेल्या एका अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेमुळे दोघेही रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाले.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही जखमींना मडगाव येथील दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात नेले. मात्र, गंभीर मार लागल्याने दीपिका कुमार यांचा इस्पितळात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाला होता. जखमी शशी कुमार यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी मायना कुडतरी पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक आशुतोष नाईक करत आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.


