वाळपई : म्हादई वन्यजीव अभयारण्यातील जळवणे धबधबा परिसरात विनापरवाना प्रवेश केल्याप्रकरणी गोवा वन खात्याने कर्नाटक आणि महाराष्ट्रातील २० पर्यटकांविरोधात गुन्हे नोंदवले आहेत. या कारवाईदरम्यान १६ मोबाईल फोन जप्त करण्यात आले असून, त्यात सात आयफोनचा समावेश आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी गिरीश बैलुडकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
जळवणे धबधबा हा निसर्गसौंदर्यामुळे पर्यटकांना आकर्षित करणारा परिसर असला, तरी तो म्हादई वन्यजीव अभयारण्यातील संवेदनशील परिसरात येतो. त्यामुळे येथे प्रवेशासाठी वन खात्याचे नियम आणि निर्बंध पाळणे आवश्यक आहे. मात्र, पारवाड एपीसी या प्रवेशबिंदूच्या दिशेने प्रतिबंधित क्षेत्रात विनापरवाना प्रवेश केल्याचे आढळल्यानंतर वन खात्याने संबंधित पर्यटकांवर कारवाई केली.
वन खात्याच्या माहितीनुसार, जप्त केलेल्या मोबाईलचा वापर प्रतिबंधित क्षेत्र आणि वन्यजीवांसंदर्भात समाजमाध्यमांवर दिशाभूल करणारी माहिती प्रसारित करण्यासाठी करण्यात आल्याचा आरोप आहे. समाजमाध्यमांवर दृश्यसंख्या मिळवण्यासाठी संवेदनशील वनक्षेत्रात प्रवेश करणे आणि नियमांचे उल्लंघन करणारे व्हिडिओ तयार करणे टाळावे, असे आवाहन वन खात्याने केले आहे.
यापूर्वीही जळवणे धबधब्यावर कारवाई
जळवणे धबधबा परिसरात विनापरवाना पर्यटकांनी प्रवेश करण्याच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत. अशा पर्यटकांविरोधात वन खात्याने कारवाई केली आहे. प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश करू नये, असे आवाहन करूनही काही पर्यटक या भागात जात असल्याने अशा प्रकारांना आळा घालण्याचे आव्हान वन विभागासमोर उभे राहिले आहे.
वन्यजीवांच्या संरक्षणासाठी निर्बंध
जळवणे धबधब्यावर विनापरवाना प्रवेशाच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत. पर्यटकांनी वन्यजीवांचा नैसर्गिक अधिवास आणि पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी वन खात्याच्या नियमांचे पालन करावे. प्रतिबंधित क्षेत्रात अनधिकृत प्रवेश किंवा नियमभंग केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही वन खात्याने दिला आहे.


