मडगाव : रस्ते अपघातात मृत्यू झालेल्या अब्दुल कादर बाशा (२४, रा. शिरवई, केपे) या मेकॅनिकच्या पत्नी आणि एक वर्षाच्या मुलाला ३५ लाख ७३ हजार ६१० रुपयांची भरपाई देण्याचे आदेश मडगाव येथील मोटर अपघात दावा न्यायाधिकरणाने दिले आहेत. भरपाईच्या रकमेवर दावा दाखल केल्याच्या तारखेपासून पूर्ण रक्कम मिळेपर्यंत वार्षिक ६.८० टक्के व्याजही द्यावे लागणार आहे. न्यायाधिकरणाचे सदस्य राम प्रभुदेसाई यांनी हा निवाडा दिला.
२० ऑक्टोबर २०२४ रोजी अब्दुल कादर मित्रांसोबत पेड्डामळ येथील नूर हाऊसजवळ रस्त्याच्या कडेला स्कूटरवर बसले होते. त्यावेळी देउळमळच्या दिशेने येणाऱ्या कारची त्यांच्या स्कूटरला धडक बसली. गंभीर जखमी झालेल्या अब्दुल कादर यांचा रुग्णालयात नेताना मृत्यू झाला. त्यांची पत्नी मुस्कान (२३) आणि मुलगा मुनीर यांनी ७० लाख रुपयांच्या भरपाईसाठी दावा दाखल केला होता.
अब्दुल कादर यांचे मासिक उत्पन्न ३० हजार रुपये असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, उत्पन्नाचा लेखी पुरावा नसल्याने न्यायाधिकरणाने कुशल कामगाराचे १७ हजार रुपये मासिक किमान वेतन गृहीत धरले. भविष्यातील उत्पन्नवाढ, अवलंबित्व आणि कौटुंबिक नुकसान यांचा विचार करून भरपाई निश्चित करण्यात आली. वाहनचालक, वाहनमालक आणि रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी यांनी संयुक्तपणे भरपाईची रक्कम मडगाव येथील जिल्हा न्यायालयाच्या खात्यात एनईएफटीद्वारे जमा करावी, असे आदेशात म्हटले आहे.
चालकाच्या निष्काळजीपणामुळे अपघात
कारचालक झेवियर डायस (२१) याच्याकडे अपघाताच्या वेळी शिकाऊ वाहन परवाना होता. प्रत्यक्षदर्शी सुफयान शेख यांच्या साक्षीनुसार, कारचा वेग अधिक होता. धडकेनंतर कार १० ते १५ मीटर पुढे जाऊन थांबली होती. कार चालकाच्या निष्काळजीपणामुळे अपघात झाल्याचे न्यायाधिकरणाने नमूद केले.


