सिंगापूरच्या नामांकित कंपनीत अस्नोड्याच्या स्नेहाची गरुडभरारी

केपीएमजी कंपनीत असोसिएट डायरेक्टरपदी बढती

Story: गोवन वार्ता। न्यूज डेस्क |
11th October, 08:27 pm
सिंगापूरच्या नामांकित कंपनीत अस्नोड्याच्या स्नेहाची गरुडभरारी

अस्नोडा : अस्नोडा येथील रहिवासी स्नेहा सावंत यांनी जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमाच्या जोरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय यश संपादन केले आहे. सिंगापूर येथील नामांकित बहुराष्ट्रीय केपीएमजी कंपनीत त्यांची असोसिएट डायरेक्टरपदी बढती झाली असून, त्यांच्या या यशामुळे गोव्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
स्नेहा सावंत भोसले यांचे मूळ गाव सावंतवाडी परिसरातील खळणेवाडी, सांगेली हे असून, त्यांचे बालपण गोव्यातील अस्नोडा येथे गेले. त्यांनी गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयातून अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर प्रथमच गोव्याबाहेर पडून पुणे येथे त्यांनी आपल्या व्यावसायिक कारकिर्दीला सुरुवात केली. पुढे अधिक मोठी स्वप्ने उराशी बाळगून त्यांनी सिंगापूर गाठले. परदेशातील नवीन वातावरण, वेगळी संस्कृती आणि व्यावसायिक क्षेत्रातील तीव्र स्पर्धेला सामोरे जात त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला. तंत्रज्ञान क्षेत्रातील दहा वर्षांहून अधिक अनुभवाच्या बळावर डेटा, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, क्लाऊड आणि डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन या अत्याधुनिक क्षेत्रांत त्यांनी विशेष प्रावीण्य मिळविले.

स्नेहाचा संघर्षमय प्रवास 
स्नेहा यांचा जीवनप्रवास संघर्षमय असला तरी प्रेरणादायी आहे. बालपणी आरोग्यविषयक समस्यांसह अनेक अडचणींना त्यांना सामोरे जावे लागले. मात्र प्रतिकूल परिस्थितीपुढे हार न मानता त्यांनी शिक्षण आणि करिअरवर लक्ष केंद्रित केले. मुलगा-मुलगी असा भेदभाव न करता मोठी स्वप्ने पाहण्याची प्रेरणा देणारे त्यांचे वडील आणि शिक्षण, शिस्त व आर्थिक स्वावलंबनाचे महत्त्व पटवून देणाऱ्या शिक्षिका असलेल्या आईचे संस्कार त्यांच्या यशामागील मोठी शक्ती ठरले. सन २०२२ मध्ये वडिलांचे निधन झाल्यानंतरही त्यांच्या शिकवणीला आदर्श मानून स्नेहा यांनी आपली वाटचाल सुरू ठेवली.
      

हेही वाचा
सर्व पहा