पर्यटक पोलिसांकडूनच पर्यटकांची लुबाडणूक

‘सीएमओ’कडे तक्रार : आयआरबी पोलिसांच्या हकालपट्टीची मागणी

Story: गोवन वार्ता । प्रतिनिधी |
12th October, 11:03 pm
पर्यटक पोलिसांकडूनच पर्यटकांची लुबाडणूक

पणजी : कळंगुट व राज्यातील किनारपट्टी भागात पर्यटक पोलीस युनिटमध्ये कार्यरत असलेल्या आयआरबी पोलिसांकडून पर्यटकांची आर्थिक लूटमार आणि छळवणुकीच्या प्रकारांना उधाण आले आहे. नुकतेच एका देशी पर्यटकाने मुख्यमंत्री कार्यालयाकडे या संदर्भात थेट तक्रार दाखल करून किनारपट्टीवर सुरू असलेल्या लुबाडणुकीचा पर्दाफाश केला आहे. तसेच छायाचित्राच्या मुद्द्यावरून एका दक्षता अधिकाऱ्याला अटकेची धमकी दिल्यामुळे सध्या पर्यटक पोलीस आणि पर्यटन खाते यांच्यात ‘शीतयुद्ध’ सुरू झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कळंगुट समुद्रकिनारी एका आयआरबी पोलीस हवालदाराने तक्रारदार चार पर्यटकांच्या गटाकडून ‘सेटलमेंट’च्या नावाखाली दोन हजार रुपयांची वसुली केली. आमची कोणतीही चूक नसताना किंवा कोणताही बेकायदेशीर प्रकार घडलेला नसताना आमच्यावर दबाव आणून व धमकी देऊन ही रक्कम उकळण्यात आली, असा गौप्यस्फोट पर्यटकाने आपल्या तक्रारीत केला आहे. या तक्रारीची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री कार्यालयाच्या सूचनेनुसार पोलीस खात्याने एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याकडे चौकशी सोपवली आहे.
पर्यटक पोलीस युनिटमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून बस्तान मांडून असलेल्या या आयआरबी पोलिसांनी किनारपट्टीत स्वतःची दहशत निर्माण केली आहे. या त्रासाला स्थानिक व्यावसायिक आणि पर्यटक दोघेही वैतागले आहेत. निवडणूक ड्युटी वगळता या पोलिसांची इतरत्र बदलीच होत नसल्याने त्यांचे फावले आहे. देशी पर्यटक आणि फेरीवाल्यांना मारहाण करण्याच्या अनेक तक्रारी यापूर्वीच पोलीस कंट्रोल रूममध्ये नोंद आहेत. काही दिवसांपूर्वी अशाच एका मारहाणीच्या घटनेमुळे मानसिक तणावाखाली आलेल्या फेरीवाल्याला हृदयविकाराचा झटका आला व त्यातच त्याचा मृत्यू झाला होता. त्यामुळे या पोलिसांना पर्यटक युनिटमधून तत्काळ हटवण्यात यावे, अशी मागणी स्थानिक व्यावसायिकांनी केली आहे.
पर्यटन खाते, पर्यटक पोलिसांमध्ये जुंपली
पर्यटन खात्याने समुद्रकिनारी चालणाऱ्या अवैध प्रकारांना आळा घालण्यासाठी काही टेहळणी अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. हे अधिकारी बेकायदेशीर कृत्यांचे फोटो काढून वरिष्ठांना पाठवतात, ज्यामुळे पर्यटक पोलिसांना संबंधितांवर नाइलाजाने कारवाई करावी लागते. अशाच एका छायाचित्राच्या कारणावरून एका आयआरबी पोलीस कर्मचाऱ्याने टेहळणी अधिकाऱ्याला गाठून खोट्या गुन्ह्यात अडकवून अटक करण्याची धमकी दिली. या प्रकारानंतर पर्यटन खात्याच्या वरिष्ठांनी पोलीस प्रशासनाकडे तीव्र नाराजी व्यक्त करत कडक तंबी दिली आहे. या घटनेमुळे आता पर्यटन खाते आणि पर्यटक पोलीस युनिट यांच्यात वाद पेटला आहे.

हेही वाचा
सर्व पहा